Skip to main content
x

महाबळे, त्र्यंबक शंकर

     प्रा. त्र्यंबक शंकर महाबळे यांचे शिक्षण अहमदनगर, नाशिक, हैदराबाद आणि पुणे या ठिकाणी झाले. १९३९ साली त्यांना मुंबई विद्यापीठाची वनस्पति- शास्त्रातली डॉक्टरेट मिळाली. ती पदवी मिळविणारे ते पहिले विद्यार्थी होते.

     त्यानंतर त्यांनी पुण्यात बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व फर्गसन महाविद्यालय आणि त्यानंतर त्या वेळच्या मुंबई इलाख्यातील अहमदाबाद व मुंबई येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले. त्या सुमारास पुणे विद्यापीठाची स्थापना होत होती. महाबळे यांनी तेथे जाणे पसंत केले. नव्यानेच सुरू झालेल्या पुणे विद्यापीठात प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदांवरची त्यांची कारकीर्द वाखाणली जाते. महाबळे यांनी बांधून घेतलेली वनस्पतिशास्त्र विभागाची इमारत ही विद्यापीठातील एक उत्कृष्ट इमारत समजली जाते. अध्यापन आणि संशोधन कार्यात शिस्त, अचूकता, नियमितपणा, सूक्ष्मदृष्टी आणि अचाट स्मरणशक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अत्याधुनिक उपकरणे विभागांत आणून विद्यार्थ्यांना ती वापरण्यास उत्तेजन देणे, यामुळे पुणे विद्यापीठ नव्यानेच सुरू झालेले असूनही त्याच्या वनस्पतिशास्त्र विभागाला लवकरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. इंग्लंड, अमेरिका, रशिया, इजिप्त इत्यादी देशांतून भाषणे देण्यासाठी त्यांना आमंत्रणे येत. त्याचप्रमाणे विविध देशांतील वनस्पती शास्त्रज्ञांचा त्यांच्या विभागांत वावर असे.

     पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे उद्यान हे भारतातील विद्यापीठांच्या वनस्पती उद्यानाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तेथील वनस्पतिजाती संग्रह, जिम्नोस्पर्म व पाम प्रकारच्या झाडांचा संग्रह हे समृद्ध तर आहेतच; पण संशोधनासाठी लागणारी दोन काचगृहे ही प्रा. महाबळे यांची योजकता-दृष्टी दर्शवतात.

     महाबळे यांना फर्गसन महाविद्यालयाचे प्रा. दीक्षित, बंगळुरूचे प्रा. संपतकुमार, लखनौचे प्रा. बिरबल सहानी अशांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या संशोधन विषयांमध्ये विविधता आली. अवघड विषयसुद्धा सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘टर्शरी काळातील वनस्पतिसंपदा’ हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. १९६९ सालच्या चंदीगड येथील इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदावरून महाबळे यांनी दिलेले ‘दख्खनची वनस्पतिसृष्टी’ या विषयावरचे त्यांचे भाषण आजही संदर्भासाठी उपयुक्त समजले जाते. नारळाच्या जातीच्या झाडांचे प्रकार आणि अश्मीभूत अवशेष यांच्यावर संशोधन करून नारळाच्या उत्पत्ती आणि उत्क्रांती यांवर त्यांनी चर्चा केली.

     वनस्पतिशास्त्रातील विविध शाखांमधील त्यांचे संशोधन सुमारे १४० लेखांमधून प्रसिद्ध झाले आहे. ३०-३५ एम.एस्सी./पीएच.डी. विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी या संस्थेचे ते फेलो (एफ.एन.ए.) होते. पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर ते पुण्याच्याच ‘विज्ञानवर्धिनी’ या संस्थेत संशोधन- मार्गदर्शन करीत असत.    

     प्रा. महाबळे ‘वेल्थ ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे उपसंपादक होते. इंडियन बोटॅनिकल सोसायटी, पॅलिओ बोटॅनिकल सोसायटी ऑफ इंडिया या मान्यवर संस्थांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली होती. १९७१ सालच्या मराठी विज्ञान परिषदेच्या सहाव्या वार्षिक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ सालच्या आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल काँग्रेसच्या फ्रान्समध्ये भरलेल्या अधिवेशनात एका परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

      महाराष्ट्रातील मोजक्या आणि भारतातील अग्रगण्य वनस्पती शास्त्रज्ञांत गणले जाणारे प्रा. महाबळे भाषणे देणे, परीक्षा घेणे या कार्यात व्यस्त असत. सकाळच्या डेक्कन क्वीनने मुंबईच्या विज्ञान संस्थेत परीक्षेसाठी आल्यावर त्यांना त्यांचे जुने विद्यार्थी, जे मुंबईतील महाविद्यालयात विभाग प्रमुख होते, ते मार्गदर्शन घेण्यासाठी येत. परीक्षेचे काम संपवून ते संध्याकाळच्या डेक्कन क्वीनने परत जाताना क्रॉफर्ड मार्केटमधून हापूस आंबे न्यायला विसरत नसत. परीक्षेची कामे वेळेवर उरकण्यात त्यांचा हातखंडा असे. गुडघ्यापासून खाली घट्ट तुमान, लांब कोट आणि डोक्यावर काळी टोपी असा वेष असणारे हे ठेंगणे गृहस्थ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर भारतातील आणि भारताबाहेरील विज्ञानप्रेमींच्या परिचयाचे होते. प्रा. महाबळे यांचा संशोधनाचाच काय, पण विचारांचाही आवाका काळाच्या बराच पुढे होता. उद्योगधंद्यांनी संशोधन कक्ष सुरू करणे, कोकणपट्टीतील खार जमिनींच्या समस्या, देशात येऊ घातलेले पाण्याचे दुर्भिक्ष, जंगलतोड, सह्याद्री पर्वतरानातील औषधी वनस्पतींची जोपासना, इत्यादी विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली होती. इतकेच नव्हे, तर आज परवलीचा शब्द झालेल्या एकोटूरिझमची संकल्पना (आजचे शब्द न वापरता) त्यांनी १९७१ साली मांडली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते संशोधन - लेखनकार्यात मग्न होते. कार्यमग्न अवस्थेत संशोधन निबंध तपासत असतानाच त्यांना मृत्यू आला.

प्रा. शरद चाफेकर

महाबळे, त्र्यंबक शंकर