Skip to main content
x

महाजन, शकुंतला नागेश

बेबी शकुंतला

अभिनेत्री

 

     बेबी शकुंतला उर्फ शकुंतला नागेश महाजन या बालकलाकार  म्हणून चित्रपटसृष्टीत आल्या. प्रभात फिल्म कंपनीमधल्या विष्णुपंत दामले यांच्या सांगण्यावरून ‘दहा वाजता’ या चित्रपटाद्वारे १९४२ साली त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. या चित्रपटातला त्यांचा अभिनय आणि ‘गोड गुपित कळले मला’ हे गाणे चांगले गाजले. खरे तर या चित्रपटात त्यांची भूमिका नायकाच्या बहिणीची होती, परंतु मुळातील ही नायकाच्या भावाची भूमिका बालकराम नावाचा बालकलाकार करणार होता. त्यांच्यातील चुणचुणीतपणा पाहून ही भूमिका बहिणीची करण्यात आली. या सामाजिक चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालनटीचा बेंगॉल फिल्म असोसिएशनचा पुरस्कार मिळाला. त्याच दरम्यान ‘रामशास्त्री’ (१९४४) चित्रपटातील भूमिकेसाठी बेबी शकुंतला या प्रभातमध्ये आल्या होत्या. या चित्रपटातले ‘दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव....’ हे गाणे बेबी शकुंतला यांच्यावर चित्रित झाले होते. हे गाणे खूपच लोकप्रिय झाले आणि बेबी शकुंतला यांचेही नाव सर्वपरिचित झाले.

     पुढे त्या प्रभात फिल्म्सची कामे सोडून मुंबईला गेल्या. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत काही काळ काम केल्यानंतर पुन्हा ‘सीता स्वयंवर’ (१९४८) चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. ग.दि. माडगूळकर यांनी बेबी शकुंतला यांना डोळ्यासमोर ठेवून सीतेची भूमिका लिहिली. शैशव आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील सीता त्यांनी सहज सुंदर अभिनयाने साकारली. ‘मनोरथा चल त्या नगरीला’, ‘हे वदन तुझे कमळ निळे’ ही चित्रपटातील गीते अतिशय गाजली. १९४९ साली ‘माया बाजार’ या चित्रपटातील वत्सलाची भूमिकाही लोकप्रिय झाली. १९४२ ते १९५५ अशी १३ वर्षे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शांत आणि साात्त्विक चेहरा, सहजसुंदर अभिनयाने आपले स्थान निर्माण केले. पुढे ‘मायाबाजार’ या चित्रपटालाही यश मिळाले. या चित्रपटातील व्यक्तिरेखेचा प्रवास अधिकाधिक परिपूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी राम मराठे यांच्याकडे गाण्याचे आणि पार्वतीकुमार यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. ‘मोठी माणसं’ (१९४९), ‘संत जनाबाई’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘मी दारू सोडली’ (१९५०), ‘श्रीकृष्ण दर्शन’ (१९५०), ‘शारदा’ (१९५१), ‘अखेर जमलं’ (१९५२), ‘चिमणी पाखरं’ (१९५२), ‘माय बहिणी’ (१९५२), ‘अबोली’ (१९५३), ‘औक्षवंत हो बाळा’ (१९५३), ‘संत बहिणाबाई’ (१९५३), ‘सौभाग्य’ (१९५३), ‘बेबी’ (१९५४), ‘संसार करायचा मला’ (१९५४), ‘मूठभर चणे’ (१९५५) अशा अनेक चित्रपटांतील त्यांनी केलेल्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. १९५५ सालचा ‘बिंदिया’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. वयाच्या २२ व्या वर्षी सरदार घराण्यातील बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर बेबी शकुंतला यांनी चित्रपटसंन्यास घेतला. १३ वर्षांची यशस्वी कारकिर्द आणि गृहस्थाश्रमातील समाधानी आयुष्य अशा दोन्ही आघाड्यांवर आनंदाने आयुष्य व्यतीत करणार्‍या बेबी शकुंतला यांचे कोल्हापुरात वास्तव्य आहे. त्यांचा सहजसुंदर अभिनय आणि बोलका सोज्ज्वळ चेहरा या वैशिष्ट्यांमुळे आजही त्या रसिकांच्या आठवणीत आहेत.

 - संपादित

महाजन, शकुंतला नागेश