Skip to main content
x

महाराज, शंकर

    महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील, सटाणा तालुक्यातील अंतापूर या गावात चिमणाजी नावाच्या निपुत्रिक शिवभक्ताला दीड तपाच्या पुत्रप्राप्तीच्या अनुष्ठानाचे जणूकाही फळ म्हणून, दृष्टान्ताप्रमाणे एका झाडाखाली दोन वर्षांचे एक अजानुबाहू तेजस्वी बालक सापडले. पति-पत्नींनी या बाळास घरी आणून त्याचे शंकर हे नाव ठेवले व अत्यंत प्रेमाने त्याचा प्रतिपाळ केला. शंकर जन्मतः सिद्धावस्थेत होता, त्यामुळे त्याच्या बाललीलांतून त्याचे दिव्यत्व लक्षात येऊ लागले. चिमणाजी सहकुटुंब पंढरपूरला जात असताना, वाटेत शंकरला प्लेगने गाठले. शंकरने आपले गुरू अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा धावा केल्यावर, स्वामींनी प्रगट होऊन प्लेगच्या गाठी कापून काढल्या. शंकर प्लेगमधून बरा झाला; पण गाठी कापल्यामुळे शरीर मात्र अष्टावक्र झाले. शंकरने घर सोडून विश्वसंचारासाठी निघण्यापूर्वी माता-पित्यांना आपला वियोग जाणवू नये म्हणून पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.

शंकरच्या आशीर्वादाने चिमणाजी दाम्पत्याला दोन जुळे मुलगे झाले. त्यानंतर मात्र शंकरने घर सोडले व हिमालयातील केदारेश्वर, प्रयाग, सातपुड्याच्या डोंगरात काही काळ भ्रमंती करून सोलापुरातील शुभराय मठात येता झाला. तेथील दत्तभक्त महंत जनार्दन स्वामींसमोर उभे राहून ‘अल्लख’ हा पुकारा करताच शंकरच्या जागी श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले. स्वामींनी शंकरसमोर लोटांगण घालून त्यास प्रेमाने मठात ठेवून घेतले. पुढे अक्कलकोट-त्र्यंबकेश्वरमार्गे शंकरचे पुण्यात आगमन झाले.

पुण्यातील संत हजरत बाबाजान यांनी शंकरचा पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केला. इथून पुढे बहुतांशी शंकरचे वास्तव्य पुण्यातच होऊन त्याचे दिव्यत्व लक्षात आल्यामुळे भक्तगण त्यांना ‘शंकर महाराज’ म्हणून संबोधू लागले. भक्तकार्यार्थ महाराजांचा महाराष्ट्रभर संचार होत असे. श्री महाराजांची उंची पाच फुटांच्या आसपास असून ते कायम ‘अवधूतावस्थे’त असत. कधी केस व दाढी अस्ताव्यस्त वाढलेली असे, तर कधी तुळतुळीत गोटा. अंगावर लंगोटीपासून साहेबी थाटाच्या सुटापर्यंत, कोणतेही आणि कोणाचेही कपडे असत. स्मितहास्यापासून सातमजली हास्यापर्यंत सर्व प्रकार दिसून येत, त्यातून शरीर अष्टावक्र! या विक्षिप्त प्रकारामुळे प्रथमदर्शनी सर्वांना ते वेडेच वाटत. स्वार्थी व पाखंडी लोक त्यांच्यापासून लांब राहत व खरे भक्तच टिकत.

महाराजांनी अनेकांना व्यसनमुक्त केले. महाराजांस अठरा सिद्धी वश असून त्यांचा वापर ते भक्तास प्रबोधन, भक्त संकटनिवारण यांसाठीच करीत. लायक व्यक्तींस महाराज स्वतः शोधून त्यांना पारमार्थिक मार्गदर्शन करीत. त्यांना योग्य अवस्थेत नेऊन ठेवत असत, मग ती व्यक्ती आपली भक्त असो वा नसो.

‘अधिकार तैसा करू उपदेश’ या चरणाप्रमाणे महाराजांची बोध करण्याची रीत असे. ते स्वतः फारच कमी बोलत. बोलले तर मुखातून त्यांचे शब्द बोबडे येत. एखाद्या अंतरंगी भक्तास बोध करावयाचा झाला, तर ते ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आणवून, त्यातील अनुरूप ओव्या त्यास दाखवत अथवा, ताईसाहेब मेहेंदळ्यांसारख्या अधिकारी व्यक्तीस स्पर्शाने प्रेरित करून त्यांकरवी बोलत. महाराजांनी सर चुनिलाल मेहता, न्यायरत्न विनोद, ताईसाहेब मेहेंदळे यांसारख्या भक्तांस नुसत्या स्पर्श वा दृष्टीक्षेपाने परमार्थाच्या उच्च अवस्थेत नेऊन ठेवले होते. महाराज दत्तावतारी असले तरी भक्तांच्या बोधासाठी ज्ञानेश्वरीचा वापर करीत. डॉ. धनेश्वरांसारख्या अधिकारी भक्ताला मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून त्यांनी ज्ञानेश्वरीची ओवी अन् ओवी पिंजून घेतली होती. ज्ञानेश्वर माउलींवर महाराजांचे अफाट प्रेम होते. इतके, की कोणी ‘ज्ञानेश्वर माउली’ असा शब्द जरी उच्चारला, तरी तो ऐकताच ते भावावस्थेत जाऊन त्यातून मूळ पदावर येण्यास त्यांना खूप वेळ लागे. या कारणामुळे त्यांचा सत्संग मिळविण्यासाठी आलेले अंतरंगी भक्त चुकूनसुद्धा तोंडाने ज्ञानेश्वर माउली हा शब्द उच्चारत नसत!

महाराज भक्ताला त्याच्या धर्मग्रंथांतील वचने म्हणून दाखवून बोध देत. मग ती भाषा मराठी असो इंग्लिश वा पर्शियन! उपासनेची सुरुवात महाराज आई-वडील व कुलदेवता इथून करावयास सांगत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू पाहणार्‍यांची ते निर्भर्त्सना करीत.

ज्याचा भाव शुद्ध, त्याच्याकडे महाराज आपणहून येत व प्रसंगी मुक्कामही करीत; मग तो सरदार मेहेंदळ्यांचा आलिशान महाल असो वा मामा ढेकणे यांचे जमीन उखडलेले घर असो. सर्व ठिकाणी महाराज सारख्याच आनंदाने राहत. प्रसंगी, महाराज एखाद्या देवस्थानात मुक्काम करून तेथील मंडळींस देवाचा उत्सव, हरिनाम सप्ताह, निरनिराळे याग, ज्ञानेश्वरी-गुरुचरित्र-दासबोध पारायण करावयास सांगून शेवटी मोठा भंडारा घालण्यास उद्युक्त करीत, जेणेकरून आसपासच्या प्रदेशातील मंडळींस परमार्थाची गोडी लागे. अवतार मेहेरबाबा, जे. कृष्णमृर्ती, फकीरबाबा, गोविंदस्वामी उपळेकर यांसारख्या विभूतींना महाराज स्वतः जाऊन भेटत व आपल्या भक्तांसही त्यांचे दर्शन करवीत. महाराजांच्या भक्तांत सर्व थरांतले भक्त असत. ‘देवाला प्रसन्न करून घेण्यापेक्षा माणसाने आपल्यातले सर्व विकार, दोष घालवून स्वतःतले दिव्यत्व प्रगट करावे, मग देवास बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही,’ असे महाराजांचे सांगणे असे. शंकर महाराजांनी पूर्वकल्पना देऊन, सांगून वैशाख शु. अष्टमी, शके १८६९ (इ.स. १९४७) या दिवशी पुणे येथे देह ठेवला. त्यांची समाधी पुणे-सातारा रोडवर स्वारगेटपासून साधारणपणे ४ कि.मी.वर आहे. येथे त्रिकाळ आरती, दर दुर्गाष्टमीला भजनासह पालखी व वैशाख शु. प्रतिपदा ते अष्टमी असा उत्सव भव्य प्रमाणात साजरा होतो.

अविनाश हळबे

महाराज, शंकर