Skip to main content
x

म्हात्रे, सावळाराम धागोजी

सावळाराम महाराज

     सावळाराम महाराजांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात कोपर येथे, एका सामान्य गरीब कुटुंबात झाला.वडील धागोजी म्हात्रे आणि आई सखुबाई यांचे हे पुत्र.  गरिबीमुळे शिक्षण होऊ शकले नाही. लहानपणी त्यांना गुराख्याचे काम करावे लागले. नंतर चरितार्थासाठी शिधावाटप दुकानात कष्टाची नोकरी करावी लागली. मिळकत अपुरी पडे म्हणून त्यांनी दुधाचा जोडधंदा केला. त्यांच्या पत्नीचे नाव सतुलाबाई. त्यांनी पतीला प्रपंच चालवण्यात चांगली साथ दिली.

सावळाराम यांची ओढ भगवद्भक्तीकडे होती. ते १९६४ पासून आळंदी-पंढरीची वारी करू लागले. वारकऱ्यांचे प्रिय ग्रंथ म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी, भागवत व गाथा. सावळारामांनी त्यांचे पठण केले. मौनव्रत धरून एकाग्र चित्ताने भंडारा डोंगरावर साधना केली. नामस्मरण केल्यावरही त्यांच्या मनाचे समाधान होईना. शेवटी ते पनवेल तालुक्यात तळोजे निवासी सद्गुरू वामनबाबा महाराजांकडे गेले. त्यांच्या कृपेने त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीगुरूंच्या आज्ञेने व मार्गदर्शनाने कीर्तन-सेवेचा आरंभ झाला. अज्ञानी, मागासलेल्या, अंधश्रद्धेत चाचपडणाऱ्या समाजाला ज्ञानाचे अंजन घालून जागे केले. अनाचार, दुष्टरूढी, व्यसनाधीनता, कलहप्रियता यांवर त्यांनी कोरडे ओढले. कीर्तनातून अत्यंत समर्पक दृष्टान्त देऊन परिणाम घडवला.

सावळारामबुवांची गावोगावी सुश्राव्य कीर्तने होत. ते गावातील भांडणे, भाऊबंदकी मिटवीत. गावकऱ्यांना भक्तिमार्गाचा सुलभ रस्ता दाखवीत. सावळाराम महाराजांनी धनिकांकडून मोठ्या देणग्या मिळवून आळंदी-पंढरीच्या वारकऱ्यांसाठी, विशेषत: आगरी समाजासाठी धर्मशाळा बांधल्या. काही ठिकाणी शिक्षणाची सोय नव्हती, तेथे शाळा काढल्या.

बुवांनी कीर्तनाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती साधली. आगरी समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय बुवांना आहे. लोकांनी बुवांच्या कार्याची पावती म्हणून रामनगर, डोंबिवली येथे भव्य-दिव्य मंदिर उभारले. सद्गुरू वामनबाबांच्या १९५८ मधील निर्वाणानंतर  सावळारामबुवांची जबाबदारी वाढली.

सप्ताह, पारायणे, अनुष्ठाने यांद्वारे जनसंपर्क व प्रबोधन सुरूच होते. आता त्यांनी बरेच कीर्तनकार तयार केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, मराठा, आगरी, कोळी आहेत. त्यांचा शिष्यवर्ग विशेषकरून पनवेल तालुक्यात, नाशिकमध्ये इगतपुरी भागात, मुंबईत खार, वांद्रे या ठिकाणी आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू डोंबिवली येथे आहे. महाराजांनी ह.भ.प. विष्णू धोंडू म्हात्रे, गंगाराम राधा ठाकूर, चरू बामा म्हात्रे, सुपुत्र ह.भ.प. वासुदेव महाराज यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवून वयाच्या पासष्टाव्या वर्षी १८ फेब्रुवारी १९९२ रोजी   वैकुंठगमन केले.

वि.ग. जोशी / आर्या जोशी

म्हात्रे, सावळाराम धागोजी