Skip to main content
x

मिरचंदानी, टी. बी.

            टी.बी. मिरचंदानी यांचा जन्म पाकिस्तानातील हैदराबाद येथे झाला. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात आले. मिरचंदानी यांनी १९५४ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी आपल्या नोकरीची आरे मिल्क कॉलनीमधून सुरुवात केली. काही वर्षांनंतर शासकीय नोकरी सोडून बूट्स फार्मास्युटिकल कंपनीच्या पशुआरोग्य विभागाचे पणन व्यवस्थापक म्हणून ते काम करू लागले. डॉ. मिरचंदानी यांनी स्वतःची संस्था सुरू करण्याचे ठरवले आणि १९६९मध्ये मुख्य प्रवर्तक आणि संस्थापक म्हणून अ‍ॅरिस अ‍ॅग्रोव्हेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून तहहयात ते या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष होते. पशुखाद्य घटक आणि खाद्यपूरके बनवणारी डॉ. मिरचंदानी यांची मे.अ‍ॅरिस अ‍ॅग्रोव्हेट इंडस्ट्रिज ही एकमेव संपूर्ण भारतीय व्यावसायिक संस्था होती. १९७५मध्ये या संस्थेमध्ये शेती व फळबागांसाठी उपयुक्त सूक्ष्म पौष्टिक घटक व खते बनवण्यास सुरुवात करण्यात आली. २००६मध्ये या संस्थेने शारजा या देशाबाहेरील ठिकाणी उत्पादन सुरू केले. या संस्थेचे २००८मध्ये रूपांतर सार्वजनिक संस्थेत करण्यात आले आणि संस्थेची नोंद राष्ट्रीय शेअर मार्केट आणि मुंबई शेअर मार्केटमध्ये करण्यात आली. सध्या या संस्थेमार्फत भारतात सहा ठिकाणी आणि संयुक्त अरब अमिरातीत दोन ठिकाणी उत्पादन करण्यात येत असून ८० शाखांमध्ये सुमारे २००० कुशल कामगार व तज्ज्ञ काम करीत आहेत. २००८मध्ये उदयोन्मुख भारतीय संस्था हे पारितोषिक या संस्थेला मिळाले आहे. डॉ. टी.बी. मिरचंदानी भारतीय सूक्ष्म खते व घटक उत्पादक संघटनेचे संस्थापक-सदस्य होते. स्वतःचा उत्पादक उद्योग सुरू करणारे डॉ. टी.बी. मिरचंदानी हे कदाचित एकमेव पशुवैद्य असावेत.

- संपादित

मिरचंदानी, टी. बी.