Skip to main content
x

मिसर, भास्कर जगन्नाथ

        कायद्याच्या चौकटीत राहून कायदे राबविताना त्यामध्ये लोकसहभाग करून घेण्याचे वेगवेगळे यशस्वी प्रयोग करणारा पोलीस अधिकारी अशी श्री. मिसर यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. मिसर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पिंपळगाव व नाशिक येथे झाले. बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर पुणे येथील आयएलएस लॉ कॉलेज येथून १९६८ साली कायद्याची पदवी घेतली. कायद्याचा अभ्यास करीत असतानाच आय.पी.एस.साठी निवड झाली व त्यांची भारतीय पोलीस सेवेतील कारकीर्द सुरू झाली.

        भारतीय पोलीस सेवेत असताना अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. १९५८ला प्रशिक्षण घेऊन १९५९ साली ते प्रथम अमरावती येथे रूजू झाले. त्यानंतर १९६१ साली ते पुण्यात रूजू झाले. त्यानंतर १९६५ साली उपआयुक्त, तर १९९५ साली ते पोलीस आयुक्त झाले. १९८७ साली पुण्यातच महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या पुण्यातील कारकिर्दीत  पानशेतचा पूर, मंडईची गणपती दंगल, जनरल वैद्य यांचा खून हे महत्त्वाचे प्रसंग आले. सी.आय.एस.एफ.च्या स्थापनेपासून सात वर्षे ते कमांडर होते. नंतर ऑटोमिक कमिशनवर डायरेक्टर सिक्युरीटी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. निवृत्तीच्या शेवटच्या तीन वर्षात ते महाराष्ट्र सचिवालयात प्रधान सचिव होते. तेथेच पोलीस महोसंचालक पद त्यांना मिळाले.

        सेवेत असताना त्यांना १९७५ साली विशेष सेवेसाठीचे भारतीय पोलीस पदक गुणवत्ता पदक व १९८५ साली विशिष्ट सेवा पदक व १९८५ साली विशिष्ट सेवा पदक हे सन्मान प्राप्त झाले.

        त्यांच्या कारकिर्दीतील विशेष उल्लेखनीय कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास पुढील गोष्टी नमूद करता येतील, धुळ्याला श्रमिक संघटनेकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी प्रथमच सौम्य प्रतिबंधक कार्यवाहीचा उपयोग केला. तसेच पुण्याला आयुक्त असताना महिला संरक्षणासाठी कलम ११० (ग) भा.दं.प्र. विधानाचा वापर केला. मुक्तांगण व पोलीस सहकार्याने गर्दचा प्रचार रोखला. औरंगाबादला लाँग मार्चच्यावेळी संभाव्य दंगली व दलितांवरील अत्याचार सौम्य  मार्गाने टाळला. तसेच हिंदू व मुस्लिमांनी परस्परांचा जामीन दिला पाहिजे अशी योजना करून जातीय तणाव टाळला.

         औरंगाबादचे डी.आय.जी. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले.

          ‘माहिती हक्क ही पोलिस यशाची गुरूकिल्ली’ या पुस्तकाचे लेखन तसेच त्यांनी इतरही काही पुस्तके लिहिली आहेत. पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांचे काही अधिकार मिळवून देण्याचा कायदा बनविण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इंटरनॅशनला लाँगिटिव्हिटी सेंटरचे ते सदस्य आहेत. कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, तसेच लोकसहभागाने गुन्हे नियंत्रण व सुकर न्यायदान व्हावे म्हणून निवृत्तीनंतरदेखील भास्कर मिसर आजही कार्यरत आहेत.

- संतोष शिंत्रे

मिसर, भास्कर जगन्नाथ