Skip to main content
x

मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी

पेस्तनजी बोमनजी

            पारशी समाजजीवनाचे आपल्या व्यक्तिचित्रांंमधून यथार्थ चित्रण करणारे चित्रकार पेस्तनजी बोमनजी यांचा जन्म मिस्त्री कुटुंबात मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोमनजी व आईचे नाव अवाबाई असे होते. पेस्तनजींचे शिक्षण फोर्ट ब्रँच स्कूलमध्ये व मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असताना त्यांचे अभ्यासात फारसे लक्ष नसे. ते सबंध दिवस वहीमध्ये चित्र काढत बसत. त्यात शिक्षकांचेही चित्र असे. शिक्षकांच्या हे लक्षात येताच ते पेस्तनजींना रागावले व त्यांनी त्यांस मागच्या बाकावर बसवले. यामुळे तर त्यांची सोयच झाली. मग ते शिक्षकांबरोबर सहाध्यायी विद्यार्थ्यांचीही चित्रे काढू लागले. शिक्षकांनी याबद्दल पेस्तनजींच्या वडिलांकडे तक्रार केली तेव्हा ते काही फारसे रागावले नाहीत; कारण त्यांनाही कलेची आवड होती. त्यामुळे पुढे पेस्तनजींना कलेचे शिस्तबद्ध शिक्षण घेण्यासाठी आडकाठी आली नाही.

            पेस्तनजी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी, १८६४ मध्ये दाखल झाले. त्या वेळी ती कलाशाळा बाल्यावस्थेतच होती. त्याचे वर्ग एलाही बागेसमोरील बहार कोर्ट येथे भरत असत. तेसुद्धा सकाळी दोन तासच. तिथे खऱ्या अर्थाने  पेस्तनजी रमले. त्यांची प्रगतीही झपाट्याने होत गेली.

            त्यांनी कलाशाळेत प्रथम जॉन लॉकवुड किप्लिंग यांच्याकडे शिल्पकलेचे धडे घ्यायला सुरुवात केली. (जॉन लॉकवुड किप्लिंग हे प्रसिद्ध लेखक रुडमार्ड किप्लिंग यांचे वडील होते.)

            लॉकवुड किप्लिंग १८७५ मध्ये कलाशाळा सुरू करण्यासाठी लाहोरला निघून गेले, त्यामुळे पेस्तनजींच्या वर्गाला मार्गदर्शकच राहिला नाही. मग त्यांचे चित्रकलेचे शिक्षण जॉन ग्रिफिथ यांच्याकडे सुरू झाले. त्या वेळी त्यांना आधी घेतलेल्या शिल्पकलेच्या शिक्षणाचा उपयोग झाला. ग्रिफिथ हे भारतात राहून काम करणारे एकमेव ब्रिटिश व्हिक्टोरिअन चित्रकार होते. त्यांच्या शैलीची तुलना वॅट्स, पॉन्टर, अल्मा टाडेमा या पाश्‍चत्त्य व ब्रिटिश चित्रकारांशी केली जात असे.

            ब्रिटिश सरकारने अजंठा या औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या ठिकाणच्या गुंफेतील भित्तिचित्रांच्या नकला करून घेण्याची योजना आखली तेव्हा ग्रिफिथ यांना त्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. ग्रिफिथ यांनी या कामासाठी निवडलेल्या कलाविद्यार्थ्यांमध्ये पेस्तनजी होते. एवढेच नाही, तर ते ग्रिफिथ यांच्या गैरहजेरीत समूहाचे नेतृत्व करीत. अजंठ्याच्या भित्तिचित्रांच्या नकला करण्याचे काम सलगपणे नसले तरी बारा वर्षे चालले होते. पेस्तनजींच्या त्या काळातील काही आठवणी आहेत, त्यांवरून तो प्रकल्प किती कठीण परिस्थितीत पूर्ण केला गेला याची कल्पना येते. ती जागा शहरापासून दूर होती व त्या काळात आजच्यासारख्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या.

            चित्रकारांची राहण्याची व्यवस्था एर्डेशपूर या गावात, नदीच्या काठावर असलेल्या एका सरकारी इमारतीत केली होती. नदी सुकल्यावर तिथे पाण्याचा तुटवडा असे. शिवाय संपूर्ण आठवड्यासाठी लागणार्‍या भाज्या, फळे अशा गोष्टी आणण्यासाठी कुणालातरी आळीपाळीने बारा मैलांची पायपीट करत जावे लागे. गुंफेतील कामाची वेळ होती सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची. शनिवारी मात्र अर्धा दिवसच. पेस्तनजींना या नेमून दिलेल्या वेळेचे भान नसे. ते त्यानंतरही मन लावून काम करत राहत. त्यांना प्रत्येक आठवड्याचा अहवाल जे.जे.मध्ये पाठवावा लागे.

            गुंफेत मिट्ट काळोख असे, त्यामुळे केरोसिनचे दिवे बांबूंच्या परातींना बांधलेले असत व त्याचा प्रकाश वाढावा म्हणून त्यामागे आरसा लावलेला असे. हँडमेड पेपरला तेल लावून ते पारदर्शक करून ट्रेसिंगसाठी वापरले जात व ते आकारांनी मोठे करण्यासाठी एकमेकांना जोडलेले असत. परातीवर उभे राहून चित्रकार या कागदांवर भित्तिचित्रांचे ट्रेसिंग (आलेखन) करत.

            अजंठ्याला पेस्तनजींची पत्नी जिलूबाई, विशेष करून थंडीच्या मोसमात येत असे. ‘फीडिंग द पॅरट’ या चित्रातील स्त्री ही त्यांची पत्नीच आहे व ते चित्र अजंठा येथील वास्तव्यात रंगविले असावे; कारण त्यात पार्श्‍वभूमीला अजंठ्याच्या भित्तिचित्रातील काही प्रतिमा आहेत. एकदा पेस्तनजींचे धाकटे बंधू फिरोजशा, कुंवरआणि शिरीन या पेस्तनजींच्या मुलींना घेऊन अजंठ्याला आले होते. त्या वेळी पेस्तनजी फिरोजशाबरोबर आजूबाजूला असलेल्या काही गुंफांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. रस्ता अगदी अरुंद व अडचणीचा होता. त्यामुळे एके ठिकाणी पेस्तनजी पाय घसरून खोल दरीत पडणार होते; पण फिरोजशा यांनी त्यांंना सावरले.

            या अजंठाच्या भित्तिचित्रांच्या केलेल्या नकला साउथ केन्सिंटन, लंडन येथे ठेवल्या होत्या. त्यांतील जवळजवळ सर्वच जळून भस्मसात झाल्या. एवढेच नव्हे, तर लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमधील मेजर गिल यांनी केलेल्या नकलादेखील जळून गेल्या. पुढे ग्रिफिथ यांनी पुन्हा अजंठ्याच्या नकला करण्याविषयी पेस्तनजींना विचारले असता त्यांनी नकार दिला.

            महाराणी व्हिक्टोरियाचा खास चित्रकार व्हॅलेन्टाइन प्रिन्सेप यांना १८७६ मध्ये एका भारतीय चित्रकार मदतनिसाची गरज होती. त्यांना ग्रिफिथ यांनी पेस्तनजींचे नाव सुचविले. प्रिन्सेपच्या हाताखाली त्यांना ज्या तांत्रिक गोष्टी सहा महिन्यांत शिकायला मिळाल्या, त्या इंग्लंडमध्ये शिकायला त्यांना कदाचित पाच वर्षे लागली असती.

            पुढे व्हॅलेन्टाइन प्रिन्सेप भारतात आले असताना पेस्तनजींनी पुन्हा मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रिन्सेपला ग्वाल्हेरचे सिंदिया (शिंदे) यांचे व्यक्तिचित्र करण्याचे काम मिळाले होते. त्या वेळी प्रिन्सेप यांनी पेस्तनजींना नवीन चित्र बांधून आणायला निक्षून सांगितले होते. पण त्यांनी नेमके एक जुने चित्र आणले. या घोटाळ्यामुळे प्रिन्सेपना, आता ते काम करण्याची आपली संधी हुकणार असे वाटले. अनेक दिवसांचा प्रवास करून शेवटी चुकीचे चित्र आणले, त्यामुळे पेस्तनजींची नोकरी गेली.

            पेस्तनजींनी १८७७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रकारीचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी प्रथम स्वत:च्याच घरात स्टूडिओ थाटला. उदरनिर्वाहासाठी त्यांंनी शिकवण्या घेण्याचे काम सुरू केले. त्या वेळी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये बंगाल बँकेचे एजंट मालगी, ए. डब्ल्यू फोर्ड, मिसेस मॅकफोर्लेन, मिसेस ग्रँट अशा प्रतिष्ठित परदेशी व्यक्तीही होत्या.

            पेस्तनजींनी नंतर आपला स्टूडिओ मुंबईमधील काळबादेवी येथे व तिथून मेडो स्ट्रीट येथे हलवला. दोन वर्षांसाठी ते हैद्राबादलाही गेले; पण तिथे त्यांचे बरेच हाल झाले, त्यामुळे ते मुंबईला परतले. त्यानंतर मेट्रो सिनेमाजवळील बास्ताती रेस्टॉरंटजवळील सोडावॉटर बिल्डिंगमध्ये त्यांनी आपला स्टूडिओ सुरू केला. इथे त्यांच्या व्यवसायाला सोनेरी दिवस आले. तिथे त्यांना  जमशेटजी टाटा, फ्रामजी पटेल, सोराबजी पटेल, बापूजी पटेल, फिरोजशा मेहता यांचा पाठिंबा मिळाला. मात्र ही मंडळी गेल्यावर व्यवसायाला पुन्हा उतरती कळा लागली. त्यातून त्यांनी स्वत:ला सावरले व ते काम करीत राहिले.

            पेस्तनजींनी अनेक प्रदर्शनांत भाग घेतला. प्रदर्शनांत भाग न घेतल्यास चित्रकार नामशेष होऊ शकतो याची त्यांना जाणीव होती. कलकत्त्याच्या प्रदर्शनात सर्वोच्च पारितोषिक मिळविणारे ते पहिले भारतीय चित्रकार ठरले. तिथेच १८८३-८४ मध्ये पुन्हा एकदा ‘पारसी लेडी स्युइंग’ या त्यांच्या चित्रास ५०० रुपये बक्षीस मिळाले. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पहिल्या प्रदर्शनात १८८९ मध्ये ‘पारसी टायगर स्लेअर’ ही स्थानिक चित्रकाराची सर्वोकृष्ट चित्रकृती ठरली. ‘पारसी गर्ल’ (१८८७) हे चित्र प्रथम बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात मांडले गेले; पण त्याला पारितोषिक मिळाले नाही. त्यांच्या आत्मव्यक्तिचित्राला १८९८ मध्ये व्हाइसरॉय पारितोषिक मिळाले. १८९३ आणि १८९७  मध्ये त्यांना व्हाइसरॉय सुवर्णपदक मिळाले. त्यांनी १८९४ मध्ये जे.जे. मध्ये अगदी थोड्या काळासाठी उपप्राचार्यपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांंनी १९०५ मध्ये प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स (किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी व्हाइसरॉय, गव्हर्नर्स आणि भारतीय संस्थानिकांची व्यक्तिचित्रे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अल्बमसाठी त्यांनी रंगविली.

            पेस्तनजींनी आपल्या सभोवतालच्या तत्कालीन पारशी समाजाचे भावविश्‍व दैनंदिन व धार्मिक जीवनाच्या यथार्थदर्शी चित्रांतून समर्थपणे मांडले. त्यांतील व्यक्ती या बहुतेक वेळा त्यांचा भाऊ, पत्नी, मुले अशीच होती. चित्रातील वस्तू, व्यक्ती, परिसर यांचे बारीकसारीक तपशिलासकट रेखाटन व संयमित पद्धतीने हळुवारपणे केलेले रंगलेपन हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

            पेस्तनजी स्वभावाने भावनाशील होते. ते म्हणत, ‘‘तुमच्यावर केलेले उपकार तेवढेच तुम्ही स्मरणात ठेवा. तुम्ही दुसर्‍यावर केलेेले नाही.’’ त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ ५० वर्षे सेकंड मरीन स्ट्रीटवरील बँडीवाला चाळ, धोबीतलाव येथे गेली व वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

            पेस्तनजी व जिलूबाई यांना एरकशा व अर्देशीर ही मुले, तर कुंवर, जेर व शिरीन या मुली अशी पाच अपत्ये होती. पेस्तनजी बोमनजी यांचे चिरंजीव इ. पी. बोमनजी व नातू एरुकशा दादी हेदेखील मान्यताप्राप्त चित्रकार होते. दादी एरुकशा यांचे कलाशिक्षण मुंबईत झाले. तिथे ते पेंटिंग आणि म्यूरल डेकोरेशन शिकले. ते लाहोरच्या मेयो महाविद्यालयात कलाशिक्षक होते. ललित कला अकादमीच्या १९६४ च्या आर्टिस्ट डिरेक्टरीमध्ये त्यांचा उल्लेख आहे आणि ते बॉम्बे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सभासद असल्याचीही नोंद आहे. वडील आणि आजोबांपासून चित्रकलेचा वारसा लाभलेले दादी १९३० नंतरच्या काळात बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या महत्त्वाच्या प्रदर्शनांमधून भाग घेत असत. कोकणातील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कलासंग्रहात त्यांचे चित्र आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडला गेलेल्या मोजक्या चित्रकारांपैकी ते एक होते.

            इंग्लंडमधील वेल्स परगणा त्या काळात यंत्रयुगाच्या क्रांतीला प्रेरणा देणारा कोळशाच्या खाणींचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. तेथील पर्वतराजी आणि खेड्यांमधील मोडकळीला आलेली घरे यांचे तपशीलवार चित्रण करणारी ग्रॅफाईट, पेन्सिलमधील रेखाटने त्यांच्या समर्थ रेषेचा प्रत्यय देतात.

 - दिलीप रानडे

मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी