Skip to main content
x

मलानी, नलिनी

         विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या, आपल्या कलाकृतींमधून एका व्यापक अर्थाने राजकीय आशय मांडणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेणाऱ्या नलिनी मालानी एक मान्यताप्राप्त चित्रकार आहेत. त्यांचा जन्म फाळणीपूर्व भारतात कराची येथे झाला. फाळणीनंतर आईवडील त्यांना घेऊन भारतात आले. कराची ते मुंबईपर्यतचा प्रवास त्यांनी बोटीने केला आणि त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळेस त्या फक्त एक वर्षाच्या होत्या. बालवयात निर्वासित म्हणून त्यांना जे अनुभवावे लागले त्याचा प्रभाव त्यांच्या कलानिर्मितीत कायम राहिला. नलिनी मालानी यांच्या दृष्टीने पाकिस्तान म्हणजे दूर राहिलेला, आईच्या जुन्या आठवणींनी बनलेला एक कल्पनेतला प्रदेश होता.

नलिनी मालानी यांचे शालेय शिक्षण दक्षिण मुंबईतील व्हिला थेरेसा आणि वाल्सिंगहॅम स्कूलमध्ये झाले. त्यांनी १९६४ मध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६९ मध्ये फाईन आर्ट विषयातील पदविका प्राप्त केली. जे.जे.मध्ये शिकत असताना १९६४ ते १९६७ या काळात त्यांचा भुलाभाई ममोरियल इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडिओ होता. या संस्थेत चित्रकार, नाटककार, संगीतकार अशा सर्वांचाच राबता होता. त्यामुळे इतर कलाविषयक विचार आणि घडामोडींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांना १९८४ ते १९८९ या काळात भारत सरकारतर्फे कलाविषयातली आर्ट फेलोशिप मिळाली.

त्यांनी अमेरिका, इटली, जपान, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये निवासी चित्रकार म्हणून वास्तव्य केलेले आहे. भारतात आणि परदेशात त्यांची अनेक एकल प्रदर्शने झालेली आहेत आणि समूह प्रदर्शनांमध्ये ‘सिटी ऑफ डिझायर्स’ हे त्यांचे पहिले प्रदर्शन झाले. मुंबईत १९९९ साली भरलेले ‘रिमेम्बरिंग टोबा टेकसिंग’ हे त्यांचे प्रदर्शन विशेष गाजले. व्हिडिओ इन्स्टॉलेशन असलेल्या या प्रदर्शनाचा विषय फाळणीच्या काळातल्या क्लेशदायक आठवणी हा होता. अमेरिकेतल्या पीबॉडी इसेक्स म्युझियममध्ये २००५-०६ मध्ये नलिनी मलानी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘एक्स्पोजिंग द सोर्स’  हे रेस्ट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन भरले होते.

‘लिव्हिंग इन एलिस टाइम’ (२००६), ‘लिसनिंग टू द शेड्स्’ (२००८), ‘कॅसान्ड्रा’ (२००९), ‘स्प्लिटिंग द अदर’ (२०१०) ही त्यांची अलिकडची काही महत्त्वपूर्ण प्रदर्शने आहेत. ‘स्प्लिटिंग द अदर’ हे शीर्षक ५२ व्या व्हेनिस बिनाले आणि लॉसान येथे भरलेल्या १९९२-२००९ या कालखंडातील नलिनी मालानी यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनाला दिलेले समान शीर्षक आहे. या निमित्ताने त्यांच्या कलानिर्मितीची समीक्षा करणारे पुस्तकही इंग्रजीत प्रकाशित झाले.

नलिनी मालानी यांनी मांडणशिल्प, मल्टी प्रोजेक्शन वर्क, व्हिडिओ शॅडो प्ले, नाटक अशा विविध माध्यमांचाही कलानिर्मितीसाठी सातत्याने वापर केलेला आहे. कॅनव्हास आणि रंगापलीकडे चित्रमय अवकाशाचा विस्तार, नवीन माध्यमांबद्दलची ओढ, देश आणि प्रांताच्या संकुचित मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्याची धडपड ही नलिनी मालानी यांची वैशिष्ट्ये आहेत. जातीय दंगे, कामगारांचे जीवन, पर्यावरणाचा नाश, समाजात होणारी स्त्रियांची कुचंबणा अशा सामाजिक विषयांचे चित्रण त्यांच्या कलाकृतींमधून येते. त्यामुळे राजकीय चित्रकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नलिनी मालानी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगतात, ‘त्यांची इच्छा असो वा नसो, सर्व चित्रकार राजकीयच असतात. कलेसाठी कला यावर माझा विश्‍वास नाही. चित्रकार - प्रेक्षक - कलाकृती या त्रिकोणी नात्यामध्ये आपण कलाकृतीच्या माध्यमातून संवादाबद्दलच बोलत असतो.’

लिनी मालानी यांनी आपल्या चित्रांमधून स्त्रीचे चित्रण करण्यासाठी सीता, मेडिआ, एलिस यासारखी भारतीय व ग्रीक पुराणकथा यांमधील मिथके अथवा एलिस सारखी बालसाहित्यातील पात्रे वापरली आहेत. ‘कॅसान्ड्रा’ या अलिकडच्या एका प्रदर्शनात त्यांनी कॅसान्ड्रा या ग्रीक मिथकाच्या आधारे स्त्रीच्या अद्याप पूर्णत्वाला न गेलेल्या क्रांतीबद्दल भाष्य केले आहे. स्त्रीच्या विचारशक्तीची अजूनही म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. तिला कळलेली भविष्यवाणी कॅसान्ड्रा आपल्या पित्याला परोपरीने सांगू पहाते, पण सत्य स्वीकारण्यास तयार नसलेल्या पित्याचा रोषच ती ओढवून घेते. प्रचंड समजशक्ती पण त्याचवेळेस असलेली हतबलता कॅसान्ड्राच्या कथेत आलेली आहे. स्त्रीच्याच नव्हे तर एकूण माणसाच्याच हतबलतेवर ती बोट ठेवते.

‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ या व्हिडिओमध्ये राजा रविवर्मा यांच्या ‘गॅलॅक्सी ऑफ म्युझिशियन्स’ यांच्या चित्राचा वापर केलेला आहे. या चित्रात वेगवेगळ्या प्रांताच्या वेषभूषा असलेल्या अकरा स्त्रिया दाखवलेल्या आहेत. राष्ट्रीय भावनेचा उगम झाला त्या काळातले रविवर्मा यांचे हे चित्र आणि नंतरच्या काळात वाढत गेलेल्या प्रांतीय अस्मिता, जातीय दंगली आणि २००२ मधील गुजरातचा नरसंहार असा एक दृश्यपट या व्हिडिओमध्ये आहे. परीकथेतला अंतर्गत सामंजस्य असलेला देश रक्तपातात न्हाऊन निघतो, असं विदारक सत्य सांगणारा हा व्हिडिओ आहे.

‘स्प्लिटिंग द अदर’ प्रदर्शनात विभाजन ही मध्यवर्ती कल्पना आहे. चौदा पॅनेल्समध्ये विभागलेल्या या चित्रात नलिनी मालानी यांनी महाकाव्यात असतात तसे विविध संस्कृतींचे आणि विविध कालखंडामधले संदर्भ एकत्र आणले आहेत. मानवी आकृती, देवदूत आणि राक्षस, तरंगणारे मेंदू, नाळ आणि भ्रूण, हाडे, दृष्टिहीन डोळ्यांनी पाहणारे विचित्र जीव अशांनी बनलेले विश्‍व या चित्रात येते. या सृष्टीचा निर्माता असलेल्या एका स्त्रीची मोठी प्रतिमा या चित्रामध्ये आहे. या सृष्टीतील सुष्ट आणि दुष्ट, तारक आणि संहारक अशा दोन्ही प्रकारच्या सजीवांना ही स्त्री जीवनरस पुरवते आहे.

नलिनी मालानी यांच्या चित्रांमधून मानवी दुःखाचा सूर अधिक जाणवतो. मिथककथांमधले आदर्श रूप आणि विपरीत वास्तव विरूपीकरणाच्या अंगाने त्यातल्या साऱ्या अंतर्विरोधांसह चित्रांमध्ये येेते. नलिनी मालानी यांच्या कलाकृतींमागच्या मध्यवर्ती कल्पना एकाच वेळेस स्थानिक आणि वैश्‍विक असतात. त्यांना कलासमीक्षकांच्या वर्तुळात मिळालेल्या मान्यतेमुळे त्या ‘क्युरेटर्स आर्टिस्ट’ म्हणूनच ओळखल्या जातात.

अरुण खोपकर यांनी तीन चित्रकारांवर माहितीपट काढला आहे त्यात भूपेन खख्खर, विवान सुंदरम यांच्याबरोबर नलिनी मालानी यांचाही समावेश आहे. त्यांना २०१०मध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे अधिकृत भित्तिचित्र (पोस्टर) करण्याचा मान मिळाला होता. 

- रंजना पोहनकर / दीपक घारे

 

मलानी, नलिनी