मणेरीकर, दत्तात्रेय गणेश
दत्तात्रेय गणेश मणेरीकरांचे कऱ्हाडे ब्राह्मण घराणे गोव्याहून महाराष्ट्रात सावंतवाडीच्या महाराजांचा राजाश्रय मिळाल्याने कोकणात स्थायिक झाले होते. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील बांबुळी या गावात मणेरीकरबुवांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यभामा होते. मणेरीकर बुवांचे आजोळकडचे आणि वडिलांकडचे घराणे उच्चविद्याविभूषित होते. चेंदवण हे त्यांचे आजोळ. आजोळी संगीताबरोबर वैद्यकीय व्यवसायाची परंपरा, तर वडिलांकडून संगीत आदी क्षेत्रांतील मातब्बरी. वडील सावंतवाडी संस्थानात प्राथमिक शाळेत संगीत शिक्षक होते. तबलावादनातही ते प्रवीण होते. दत्तात्रेय मणेरीकर यांनी आपले शालेय शिक्षण बांबुळी येथे घेऊन मॅट्रिकची परीक्षा त्यांनी कुडाळ हायस्कूलमधून उत्तीर्ण केली.
मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मुंबईत वास्तव्य केले. मुंबईत त्यांनी हिशेब तपासनीसाचे काम केले. खाजगी शिकवण्याही घेतल्या. पुढे १९४९ साली त्यांचा विवाह उषा या शिक्षिकेशी झाला आणि ते पुन्हा कोकणातच स्थायिक झाले. मणेरीकरबुवांची वाणी अस्खलित, स्वच्छ आणि विद्वत्ताप्रचुर होती. त्यामुळे त्यांनी आपल्यातील कीर्तनकार अचूक हेरला आणि कीर्तनक्षेत्रात व्यवसाय आणि लोकशिक्षणाचा सूर शोधण्याचा यशस्वी निर्णय घेतला.
कीर्तनाचा वापर केवळ चार घटका लोकरंजन करण्याचा नसून त्यातून लोकजागरण, विधायक विचार, कार्याची पेरणी, आध्यात्मिक जीवनशैली साकारण्याचे, मानवी जीवनाला पोषक वातावरण बनविण्याचे हे माध्यम आहे, हाच विचार करून त्यांनी कीर्तन हे क्षेत्र निवडले. त्यासाठी त्यांनी प्रथम तत्कालीन बुजुर्ग कीर्तनकारांची शेकडो कीर्तने पाहिली, ऐकली. कीर्तनकारांशी चर्चा, संवाद केला. सादरीकरणाच्या अनेक छटा शिकून घेतल्या.
कीर्तनकारामधील लेखक, कवी, नट, नर्तक, नकलाकार, तत्त्ववेत्ता या साऱ्या भूमिकांचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी दैनंदिन जीवनातील सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, संदर्भांचा साकल्याने अभ्यास आणि विवेचन करून ते आपल्या कीर्तन सादरीकरणातून समाजापुढे मांडले आणि सकारात्मक, विधायक दृष्टीकोनाची समज श्रोत्यांपुढे उभी केली. त्यामुळेच १९५२ साली त्यांनी नेरूरच्या कलेश्वर मंदिरात सादर केलेले आपले पहिले कीर्तन, पाच दशकांमध्ये चार हजारांवरचा पल्ला गाठून आहे.
त्यांच्या लोकजागरणाची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली आणि कीर्तन या कलाप्रकाराचा उपयोग उत्तम लोक समजवणुकीसाठी होऊ शकतो हे हेरून, त्यांच्या कीर्तनातून साक्षरता उपक्रम, कृषी, विज्ञान, कुटुंब नियोजन, भ्रष्टाचार मुक्ती, व्यसनमुक्ती आदी विषयांचा ऊहापोह आणि लोकशिक्षण साधून कीर्तन या लोककलेला समाजात रुजविले.
दत्तदास मणेरीकरबुवांना, औंधचे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.चिंतोपंत गोखले, तसेच ह.भ.प.रामभाऊ कऱ्हाडकरबुवा, ह.भ.प.डॉ. मेहेंदळे, श्री. घागबुवा, ह.भ.प.आफळेबुवा, ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकरबुवा, ह.भ.प.ढोलेबुवा अशा दिग्गज कीर्तनकारांचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या कीर्तनाविष्काराने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश अशा ठिकाणची राऊळे त्यांनी; श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना भक्ती, वृत्ती, कर्मयोगाच्या नवोन्मेषांमध्ये न्हाऊन दुमदुमविली आहेत.
ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकरबुवांच्या हस्ते, १९७६ साली त्यांचा महासन्मान होऊन त्यांना कीर्तन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कीर्तनभूषण’ पुरस्कार गोवा येथील कवळे या गावी, अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे, १९९१ साली कोल्हापूर येथील कीर्तनकार संमेलनात, आणि १९९२ साली सांगली येथेही कीर्तनकार महासंमेलनात मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या कीर्तन कलेतून केवळ लोकरंजन न होता लोकप्रबोधन व्हावे, हीच त्यांची अपेक्षा आहे.
भारतीय कीर्तनकला या प्राचीन कलाप्रकाराला आपल्या आचार, विचार, अभिव्यक्तीतून उचित न्याय देणारे आणि हा कलाप्रकार समर्थपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे मणेरीकर बुवा यांचा रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. चार चिरंजीव, तीन कन्या, सुना, नातवंडे, जावई यांचा देखणा प्रपंच करीत असतानाच त्यांनी कीर्तनकाराची तुळशीमाळ आपल्या पुढच्या दोन पिढ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांची स्नुषा आणि नातही कीर्तन प्रकाराचा अभ्यास करून आज उत्तम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत.