Skip to main content
x

मंत्री, रमेश राजाराम

     विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचे मूळचे नाव, रमेश शंकर कुळकर. त्यांचा जन्म कोकणात, कुडाळ-जवळच्या झाराप या गावी झाला. राजाराम मंत्री यांना दत्तक गेल्यानंतर त्यांचे नाव रमेश राजाराम मंत्री झाले. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. एम.ए. करीत असतानाच त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला तो ‘पुढारी’ दैनिकात ‘सहसंपादक’ या नात्याने. नंतर वृत्तपत्र व्यवसायाचे प्रगत शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.

     १९५८ साली अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी या नात्याने ते वास्तव्यासाठी अमेरिकेत गेले. १९७८ सालापर्यंत ते तिथे होते. त्या काळात देश-विदेशांत त्यांचा भरपूर प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभवांवर त्यांनी प्रवासवर्णने लिहिली. त्यांच्या लेखनाचा झपाटा वाखाणण्याजोगा होता. १९७९ साली एकाच वर्षात ३४ पुस्तके लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. साहित्य व कला क्षेत्रातील अनंत काणेकर, गजानन जहागीरदार, सी.रामचंद्र, ग.वा.बेहरे, श्री.ज.जोशी, वसंत सरवटे, बाळ गाडगीळ, उमाकांत ठोंबरे हे त्यांचे खास स्नेही तर रवीन्द्र पिंगे व प्रमोद नवलकर हे कौटुंबिक मित्र होते.

     रमेश मंत्री यांच्या नावावर १३०हून अधिक पुस्तके आहेत. त्यांतली बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. ‘थंडीचे दिवस’, ‘सुखाचे दिवस’, ‘नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. प्रांजळ, प्रसन्न, दिलखुलास लेखणीतून उतरलेली त्यांची प्रवासवर्णने वाचकांना त्या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतात. ‘आंध्र’, ‘ओरिसा’, ‘एलिझाबेथ टेलर आणि मी’, ‘ओ कलकत्ता’, ‘करीन ती पश्चिम’, ‘दिशांतर’, ‘गांधीजींचा गुजरात’, ‘चार मीनार’, ‘जपानी आटापिटा’, ‘सूर्यपुत्रांचा देश’, ‘बारा लाखांत जगाची सफर’, ‘बंगलोर ते बदामी’, ‘संगमरवरी प्रदेश’, ‘सोमनाथ ते साबरमती’ ह्यासारखी अनेक प्रवासवर्णने त्यांनी लिहिली.

     विनोदी फॅण्टसी हा सर्वस्वी नवा साहित्यप्रकार त्यांनी मराठी वाङ्मयात रूढ केला. त्यातूनच जेम्स बॉण्डच्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली. ‘सह्याद्रीची चोरी’, ‘सचिवालयात हत्ती’, ‘अति झालं नि हसू आलं’, ‘ओठ सलामत तो’, ‘एका हाती टाळी’, ‘झाली काय गंमत’, ‘हसण्याचा तास तिसरा’, ‘थट्टा मस्करी’, ‘चोरांचा सौजन्य सप्ताह’ ह्यांसारखी आणखीही ‘विनोद’ याप्रकारात मोडणारी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘मुलखावेगळी माणसं’, ‘अशी असतात एकेक माणसं’, ‘तुमच्या पायी ठेविले मन’ ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आणि ‘साप्ताहिकी’, ‘चटक चांदणी’, ‘कुंकू’, ‘उत्तरकाल’, ‘उत्तरकांड’, ‘गुजगोष्टी’, ‘चंदेरी’, ‘आटापिटा’ यांसारखी नाट्य, कथा, कादंबरी प्रकारांतील साहित्यनिर्मितीही त्यांनी केली.

     मात्र लेखन करताना समीक्षक काय म्हणतील याची फिकीर करण्याऐवजी हलक्याफुलक्या मजकुराला मनापासून दाद देणारा सामान्य रसिक वाचक डोळ्यांसमोर ठेवूनच ते लिहीत गेले. आपल्या लेखनाशी ते इतके प्रामाणिक होते, की दररोज सकाळी ३-४ तास, सर्व शक्ती एकवटून ते लिहायला बसतच. त्यांचे सर्व लेखन एकटाकी असे.

     मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ हा अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९९२सालच्या कोल्हापूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते. इंग्लंडमध्ये असताना अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग व अभिनेत्री एलिझाबेथ टेलर ह्यांना प्रत्यक्ष भेटण्याची मिळालेली संधी ही त्यांच्यासाठी अतीव समाधानाची बाब होती. आपले एक तरी पुस्तक रशियाचे अध्यक्ष गोर्बाचेव्हला अर्पण करण्याची आणि कर्मयोगी बाबा आमटे यांचे चरित्र लिहिण्याची, अशी त्यांची दोन स्वप्ने जागीच विरली.

     मूर्तिमंत उत्साह, उत्सवप्रियता हा स्वभाव; सहजता, मौलिक, तल्लख विनोदबुद्धी, त्यातून आलेला हजरजबाबीपणा, कोणत्याही गोष्टीतले मर्म चटकन पकडण्याचे कौशल्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. अंतर्गत कठोर शिस्तीचे पालन करणार्‍या रमेश मंत्री यांच्या डोक्यात काळ-काम-वेग यांचे गणित पक्के बसलेले होते. असे सतत कार्यमग्न असणारे चैतन्यमूर्ती रमेश मंत्री हे आयुष्यात कृतकृत्य होते; पण अखेरीस अर्धांगवायूमुळे उजवी बाजू अचेतन झाल्याने त्यांच्या भ्रमंतीला आणि गप्पाटप्पांना खीळ बसली हा दैवदुर्विलास होय.

     - सविता टांकसाळ

मंत्री, रमेश राजाराम