Skip to main content
x

मोहम्मदी, अल्ताफ अश्रफ

अल्ताफ

सामाजिक जाणिवा व समस्यांच्या अभिव्यक्तीतून संवाद साधणारे चित्रकार अल्ताफ अश्रफ मोहम्मदी यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे वडील अश्रफ  हे व्यापारी होते. त्यांच्या आईचे नाव झैनब होते. अल्ताफ यांची बहीण नफ्रीम मोहम्मदी हीदेखील  एक नामवंत चित्रकार होती.

ग्वाल्हेर येथील ‘सिंदिया स्कूल’मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून १९६१ ते १९६७ या कालावधीत मोहम्मदी यांनी  इंग्लंडमधील सेंट मार्टिन्स, सेंट्रल स्कूल व हेदरली या कलामहाविद्यालयांमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. ते १९६८ मध्ये भारतात परतले व मुंबईस स्थायिक झाले. इंग्लंडमध्ये सात वर्षे घालविल्यामुळे भारतातील वास्तवाशी कलादृष्ट्या जमवून घेणे त्यांना सुरुवातीस जड गेले; परंतु नंतर कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने भारलेल्या क्रियाशील भारतीय तरुणांशी त्यांचा संबंध आल्यामुळे  येथील  समाज आणि सामाजिक व राजकीय वातावरण यांचा अंदाज त्यांना आला. सामाजिक बांधीलकी म्हणून ‘प्रोयोम’ (प्रोग्रेसिव्ह यूथ मूव्हमेंट) या संस्थेच्या साक्षरता वर्ग, फिरती पाळणाघरे इत्यादी उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. या उपक्रमांसाठी लागणारी भित्तिपत्रके, प्रचारफलक इत्यादी त्यांच्या चित्रकलेतून साकारली

खासगी कलादालने काही ठरावीक कलाकारांचीच तळी उचलून धरतात म्हणून सुरुवातीच्या काळात  अल्ताफ यांनी खासगी कलादालनात प्रदर्शने भरविण्याचे टाळले व सेंट झेविअर्स-एल्फिन्स्ट ही महाविद्यालये, कापड गिरण्यांची आवारे, माटुंगा लेबर कँप इत्यादी ठिकाणी सार्वजनिक कलादालनांत आपले सहकारी अंबादास, सतीश पांचाळ, दर्शन यांच्यासमवेत प्रदर्शने भरवून त्यांनी सामान्य माणसांशी कलेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी करत असताना त्यांना स्वतःच्या चित्रकलेकडे पाहिजे तसे लक्ष देता येत नव्हते. याच सुमारास त्यांचा सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील नवज्योत या विद्यार्थिनीशी परिचय झाला. नवज्योतही त्यांच्याबरोबर ‘प्रोयोम’साठी काम करू लागली व १९७२ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. पुढे ‘प्रोयोम’च्या उपक्रमांसाठी चित्रे काढताना केवळ प्रचारकी थाटाची चित्रे काढावी की त्यात कलामूल्येही जपावी याविषयी मतभेद होऊन ते व नवज्योत दोघेही प्रोयोममधून बाहेर पडले व त्यांनी स्वतःच्या कलासाधनेवर लक्ष केंद्रित केले. परंतु अल्ताफ मोहम्मदींना मार्क्सवाद पुरेपूर पटलेला होता हे त्यांच्या चित्रांच्या विषयांवरून स्पष्ट होते.

अल्ताफ यांच्या चित्रांचे विषय हे नेहमी समाजातील घटक व त्यांचा परस्परसंबंध, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व प्रचलित राजकारण यांच्याशी निगडित असत. उदा. ‘हॉस्पिटल’ व ‘वर्कर्स’ या चित्रमालिका. त्यांच्या चित्रातील प्रतिमा नेहमी अस्पष्ट, संदिग्ध असतात व बहुतेक वेळा मंद तर क्वचित भडक रंग चित्रविषयाला अनुसरून वापरलेले दिसतात. चित्राचे रंगरूप व सौंदर्य यापेक्षा चित्राचा आशय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असे व त्यातून संवाद साधला जावा अशी त्यांची अपेक्षा होती.

अल्ताफ यांनी केलेली व्यक्तिचित्रणे ही व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांची प्रातिनिधिक चित्रणे असत व हे साधण्यासाठी त्यांनी बऱ्याचदा प्रतिमांचे विरूपीकरण केलेले दिसते. (उदा. ‘पोट्रेट ऑफ अ‍ॅन इन्ट्रोव्हर्ट’, ‘पोट्रेट ऑफ ए पॉलिटिशिअन’.)

१९७५ पासून अल्ताफ यांच्या चित्रांचे विषय अंतर्मुखतेतून आलेले दिसतात (उदा. ‘फायर’, ‘मॅन अ‍ॅण्ड वूमन’, ‘टरमॉइल्ड रिलेशन्स’). या सुमारास व नंतरही ‘साक्षी’, ‘गिल्ड’ या खासगी कलादालनांतर्फे त्यांची प्रदर्शने आयोजित केली गेली. १९७१ मध्ये त्यांनी फिल्म्स डिव्हिजनसाठी ‘यंग कॅनव्हास’ हा माहितीपट बनविला. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी कावीळ व डेंग्यू तापामुळे त्यांचे निधन झाले.

- डॉ. गोपाळ नेने

मोहम्मदी, अल्ताफ अश्रफ