Skip to main content
x

मोरे, दिनकर माधव

         दिनकर माधवराव मोरे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील सरदारवाडी खेड्यात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. १९६६ साली त्यांनी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. १९६६ ते १९६८ हे दोन वर्षं महाराष्ट्रातील उमरगा या ग्रामीण आणि मागासलेल्या भागातील महाविद्यालयात काढली आणि मराठवाडा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वर्षानंतर विद्यापीठात ते अग्रक्रमावर असल्यामुळे त्यावेळच्या नियमाप्रमाणे १९६९ ला पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इलेक्ट्रॉनीक्स आणि टेलिकम्युनीकेशन’ या महत्त्वाच्या शाखेसाठी त्यांची निवड झाली. पुणे येथे एक वर्ष घालविल्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींग शाखेकडे वळून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. १९७२ साली पुणे विद्यापीठातून सर्व विषयातली बक्षीसे घेऊन सुवर्ण पदकांसह प्रथम क्रमांकाने बी.ई. (सिव्हील) ही पदवी संपादन केली. २००६ साठी अभ्यासाचा छंद जोपासून जल विकासाचा इतिहास या विषयात पीएच.डी. पदवी त्यांनी संपादन केली.

         ‘वालचंद हिराचंद’ या नामवंत संस्थेचे ते शिष्यवृत्तीधारक होते आणि कराराप्रमाणे या संस्थेच्या ‘हिन्दुस्थान कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम कंपनीत पदवीनंतर काही काळासाठी सेवा देण्यास ते बांधील होते. निकालाच्यापूर्वीच त्यांना कामावर रुजू होण्यासाठी बोलविण्यात आले. मुंबई येथील मुलाखतीत त्यांनी स्पर्धात्मक परिक्षेच्या माध्यमातून शासनाच्या सेवेत जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या इच्छेला  मान देऊन मुलाखतकाराने त्यांना कंपनीशी केलेल्या करारातून मुक्त केले. पुढे मोरे यांनी नोकरीचा सुरुवातीचा काही काळ यु.पी.एस.सी.च्या माध्यमातून ‘मिलीटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये’ विशाखापट्टणम येथील ‘ड्रायडॉक’ या अतिअवजड व अवघड कामावर घालवून ‘मे १९७६’ मध्ये एम.पी.एस.सी.द्वारे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे (जलसंपदा) विभागात रूजू झाले. भावंडांना मार्गी लावण्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे त्यांनी लक्ष पुरविले.

          डिसेंबर २००५ ला जलसंपदा विभागाचे महासंचालक (संशोधन, संकल्पचित्र, प्रशिक्षण) या सचिव समकक्ष पदावरून सेवानिवृत्त होईपर्यंत वेगवेगळ्या पदांवर सेवारत राहून सचोटी व गुणवत्तेला प्राधान्य देऊन भीमा, पेंच, विष्णुपुरी, भातसा, मांजरा, तेरणा, पेनगंगा, मनार, लेंडी, माजलगांव, बाभळी, कोयना यासारख्या मोठ्या प्रकल्पांबरोबरच अनेक लहान व मध्यम प्रकल्पांवरील वेगवेगळ्या प्रकारची जसे नियोजन, संशोधन, बांधकाम, व्यवस्थापन इत्यादी कामे करून त्यांन आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात पडलेल्या १९८६, १९९२, २००१ ते २००३ दुष्काळामध्ये ग्रामीण, गरीब लोकांना रोजगार निर्माण करत राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या कामात हिरिरीने भाग घेतला. हाताखालील प्रशासकीय यंत्रणेला राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकीच्या विचाराने प्रेरित करून रोहयो योजनेत स्वच्छ प्रतिमेने काम कसे करता येते हे दाखवून दिले. ग्रामीण भागात पक्क्या रस्त्याचं जाळं निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’ची जिल्हा परिषदेसारख्या अभियांत्रिकी पाठबळ नसणाऱ्या व्यवस्थेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून या योजनेचा पाया घालण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोरे यांनी शासनातील अधिकाराच्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना बदल घडविणाऱ्या अनेक बाबी परिपत्रकाच्या माध्यमातून शासनस्तरावरून त्यांनी सूचित केल्या. उपसा सिंचन योजनेसाठी मार्गदर्शक सूचना देताना स्टँड-बाय पंपाचा विचार त्यांनी कालबाह्य ठरविला.

          शासनातील चाकोरी बाहेरच्या वेगळ्या प्रकारच्या कामाची जबाबदारी घेण्यास ते सदैव पुढे असत. प्रसिद्ध विचारवंत व जलतज्ज्ञ डॉ.माधवरावजी चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र जल व सिंचन आयोगा’चे सचिव म्हणून समर्थपणे त्यांनी धुरा सांभाळली आणि राज्याचा ‘जल विकासाचा’ आराखडा दिग्दर्शित करणारा २००० पानांचा पाच खंडात विभागला गेलेला अहवाल (१९९९) प्रसिद्ध करून अलौकिक असे योगदान प्रदान केले आहे. डॉ.मोरे यांना इतिहासाचं प्रेम आहे यातूनच मानवी जीवन, संस्कृती घडविण्यास कारणीभूत ठरणारे दोन ते अडीच हजार वर्षांपासूनचे पाण्याच्या सामाजिक, आर्थिक, तांत्रिक आणि न्यायिक अंगांवर प्रकाश टाकणारे अनेक पदर त्यांनी समाजापुढे उलगडून ठेवले. याचा परिपाक म्हणून विद्यापीठाने त्यांना या विषयातली डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे.

          भीमा जलसेतुसारखी सुंदर वास्तू, विष्णुपुरी प्रकल्पाचे नाविन्यपूर्ण संकल्पचित्र अशा अनेक सुंदर व मजबूत वास्तूंच्या निर्मितीत ते खूप रमले. माकणी येथील तेरणा नदीवरील नदीपात्रातील थांबलेले, कंत्राटदारांनी पाठ फिरविलेले अवघड काम ७-८ महिन्यांच्या (१९८९) कालावधीत शासकीय यंत्रणा व स्थानिक मजूरवर्ग यांना विश्वासात घेऊन ते काम तडीस नेण्याची त्यांची प्रशासकीय व अभियांत्रिकी हातोटी ही वाखाणण्यासारखी होती. हेच कसब त्यांनी (१९९२) पेनगंगा या विशाल प्रकल्पाच्या १० ते १२ वर्षे वयाच्या कालव्यावरील अनेक बांधकामांना पडझडीपासून सावरताना दाखविले. ३०सप्टेंबर१९९३ या किल्लारीच्या भूकंपात स्वयंप्रेरणेने संकटग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांचे अज्ञान व दारिद्य्र, यातून त्यांचे होणारे शोषण आणि पर्यायाने समाज व देश आर्थिकदृष्ट्या दुबळा होणे, हे टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना सक्षम केलं पाहिजे यासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन राज्यभर सिंचन संमेलने, परिषदा भरवून हजारो शेतकऱ्यांना सबल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  ‘महाराष्ट्र सिंचन सहयोग’ व ‘भारतीय जलसंस्कृती मंडळ’ या सेवाभावी संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. खाजगी क्षेत्रातील ताकदीचा विकास कार्यासाठी सहभाग घ्यावा असे त्यांना वाटते. पुण्याजवळ मुठा नदीवर एम.आय.टी., पुणे संस्थेकरवी पूर्णत: खाजगीकरणातून एक धरण उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

          पाण्यासंबंधीच्या चांगल्या लेखनाचे एकत्रीकरण करून त्यांचं ग्रंथ रूपात  संपादन करण्याचे कामपण त्यांनी हाती घेतलेले आहे. सिंचन साधना हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे तर सिंचन चिंतन प्रकाशनाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र  शासनाने (२००७) गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक विकास आणि व्यवस्थापनाचा बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी शासनाचे तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांच्यावर सोपविलेली आहे.

          त्यांना २००४ साली सेटल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते महाराष्ट्र सिंचन सहयोग या शिखर संस्थेचे अध्यक्ष आहेत.

- संपादित

मोरे, दिनकर माधव