Skip to main content
x

मोटे, उद्धव निवृत्ती

         कृषी कीटकशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या उद्धव मोटे यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे कृषी महाविद्यालयातून १९६८मध्ये बी.एस्सी.(कृषी) पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली व १९७०मध्ये कृषी कीटकशास्त्र हा विषय घेऊन एम.एस्सी.(कृषी) पदवी प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.त कृमिसूत्रावर (Nematology)  संशोधन करून १९७९मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली व या विषयात प्रथम क्रमांकाचा मानही मिळवला.

         आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस त्यांनी कृषि-अधिकारी म्हणून १९७०मध्ये सुरुवात करून २००४मध्ये ते म.फु.कृ.वि.तून कीटकशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. दरम्यानच्या काळात कीटकशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक (१९७१-७३), सहयोगी प्राध्यापक (१९७३-९८), प्राध्यापक (१९९८-२००१) व विभागप्रमुख (२००१-२००४) अशा विविध पदावर काम करून शैक्षणिक संशोधन व विस्तार कार्यात मोलाचे कार्य केले. या काळात त्यांनी भाजीपाला, डाळींब, ज्वारी, कापूस  व ऊस अशा विविध पिकांना ग्रासणाऱ्या किडींवर संशोधन करून त्यावर प्रतिबंधक उपाय सुचवले. याची महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने नोंद घेऊन शेतकऱ्यांना त्या उपायांची शिफारस केली आहे. डाळींब पिकावरील संशोधनात (shot hole corer), ज्वारीवरील शूट फ्लाय या माशीकरता प्रतिबंधक प्रजाती, ज्वारी, टोमॅटो व डाळींब या पिकांवर आढळणाऱ्या किडींवर परभक्ष्यी व परजीवी कीटकांच्या नवीन प्रजाती व उसावर आढळणारा लोकरी मावा व त्याचा नैसर्गिक शत्रू यांची जगात प्रथमच नोंद करण्याचे श्रेय डॉ.मोटे यांचेकडेच जाते.

         कीटक विभागातील संशोधनाबरोबर उद्धव मोटे यांचे विस्तार विभागातील जैविक व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे कार्यही मोलाचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील आदिवासी भागात कोरडवाहू कापूस व चिक पी (हरभरा) या पिकावर मोठ्या प्रमाणावर (७०० हेक्टर क्षेत्रावर) एकात्मिक कीड व्यवस्थापन योजना राबवून मोटे यांनी सुमारे ६४ लाख रुपयांची भर राष्ट्रीय संपत्तीत टाकली आहे. तसेच २००३-२००४ या काळात शेवगाव तालुक्यातील ७ गावात सुमारे १८०० हेक्टर क्षेत्रावर ही योजना यशस्वीपणाने राबवल्यामुळे कोणतीही गंभीर/नुकसानकारक कीड कापसावर आढळून आली नाही. याच बरोबर उत्पादनही २० ते २५ क्विंटल/हे. स्थिर राहिले.

         मोटे यांनी कटला, राहू, मृगाल, सायप्रीनस, सिल्व्हर कार्प, झिंगे इ. माशांच्या प्रजातींची वाढ करून मत्स्यबीज शेतकऱ्यांना वाटप केले. व्यापारी तत्त्वावर ट्रायकोडर्मा, फुले बगीसाईड इत्यादी जैविक साधनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. बी.एस्सी. व एम.एस्सी. अभ्यासक्रमांत सुधारणा केल्या, ग्रंथालयात अद्ययावत पुस्तके, संशोधनपर नियतकालिके इत्यादींची भर घातली.

         डॉ. मोटे यांनी आतापर्यंत २८ एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांनी १५६ शास्त्रीय निबंध, १३४ संशोधनात्मक नोंदी, १२२ तांत्रिक पत्रके, १४६ लेख व १९ पुस्तके इ.चे लेखन केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ४४ आकाशवाणी, दूरचित्रवाणीवर भाषणेही दिली आहेत. त्यांनी सुमारे ९० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा , परिषदांमध्ये भाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सी.डी.मेहता पुरस्कार, के.डी.पटेल पुरस्कार, कामधेनु पुरस्कार,सीएफटी.आरआय संशोधन पुरस्कार, युजीसी-सीईसी पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर समाज विकास पुरस्कार, गन्ना किसान संस्थान पुरस्कार, राहुडकर मराठी ग्रंथ प्रमोशन पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित केले.

-डॉ. मुकुंद भागवत

मोटे, उद्धव निवृत्ती