Skip to main content
x

मराठे, नारायण सदाशिव

             गुरुवर्य केवलानंद सरस्वती म्हणजे पूर्वाश्रमीचे नारायण सदाशिव मराठे, यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील, रोहे तालुक्यातील सुडकोली या गावी झाला. वयाच्या अकराव्या वर्षी अलिबाग येथे काही काळ अध्ययन केल्यावर अठरा वर्षांच्या सुमारास त्यांनी वाई गाठली. वेद, वेदांगे, न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्ययन त्या-त्या शास्त्रातील विद्वानांकडे केल्यानंतर या मननशील मुनींनी आपले सर्व आयुष्य अध्ययन, अध्यापन, विद्याव्यासंग, ध्यानधारणा आणि ईश्वरभक्ती यांत व्यतीत केले.

यांचा विद्याव्यासंग पहाटेपासूनच सुरू होत असे. याचेही दोन भाग असत. एक अध्यापनाचा व दुसरा इतर विषयांच्या वाचनाचा. मराठी व संस्कृत भाषेमधील अन्य विषयांवरील बरेच ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. इंग्रजी शिकण्याची इच्छा असूनही त्यांना फुरसत मिळाली नाही; पण दृष्टी चौफेर असल्याने;  पाश्चात्त्यांचे जग, वेदपुराणांशी ज्याचा संबंध नाही असे आहे; परंतु त्याचे वैशिष्ट्य व महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे पदार्थविज्ञान, जीवविज्ञान, व सामाजिक शास्त्रे यांसंबंधी मराठीत प्रसिद्ध झालेले विद्वानांचे ग्रंथ त्यांनी मन:पूर्वक वाचून काढले. हिंदुस्थानचा व जगाचा इतिहास, आधुनिक खगोल व भूगोल यांची उत्कृष्ट माहिती मिळविली. नव्या सुशिक्षिताला साजेशी बहुश्रुतता संपादन केली. त्यामुळे नव्या जमान्यातील धार्मिक, सामाजिक व राजकीय आंदोलनांचे समग स्वरूप त्यांच्या विचारांच्या कक्षेत सामावले गेलेे.

गुरुवर्यांचा दैनंदिन जीवितक्रम व्रतस्थ व तपस्वी माणसाचा असे. एकांतवास व विद्याव्यासंग यांत कधीही खंड पडला नाही. वाईत आल्यापासून त्यांचा माधुकरीवरच जीवन निर्वाह होता. त्यांनी कसलाही अर्थसंग्रह केला नाही. कारण, त्यांना तशी वासनाच मुळापासून नव्हती. स्वत:ची सर्व कामे स्वत:, अत्यंत वक्तशीरपणे करावयाची. वाणी व शरीर या दोहोंच्या बाबतीत टापटीप व स्वच्छता यांवर त्यांचा फार कटाक्ष होता. कितीही राग आला तरी त्यांच्या तोंडून कधीही अपशब्द आला नाही. स्वभाव प्रेमळ होता; पण त्यांच्या अत्यंत शुचिर्भूत वागणुकीचा एक प्रकारचा दरारा विद्यार्थ्यांवर असे. केवलानंद सरस्वती यांनी लोकांशीही सलोख्याचे संबंध ठेवले. अजातशत्रू या पदवीला ते खर्या अर्थाने प्राप्त झाले.

अध्ययन, अध्यापन यांतच आयुष्य वेचावयाचे हे नारायण मराठ्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षीच निश्चित केले होते. त्यांनी प्रत्यक्ष विधिवत संन्यास वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी घेतला. जुन्या शिक्षण पद्धतीतील तीन गुण त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. अधिक तयारीच्या विद्यार्थ्यास ते ग्रंथातील ठराविक  भाग इतरांस सांगावयास लावत. इतर हेच पाठ अनेक विद्यार्थ्यांना शिकवत. यास ते चिन्तनिकाअसे म्हणत. काही वेळेला गुरुजनांच्या अध्यक्षतेत स्वत:च्या विषयाचा काही भाग सांगण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या सभा घेत. त्यावर काही वेळेला वादविवाद होत. यामुळे विषय स्पष्टपणे समजत असे. प्रतिपादनाची सवय व उपस्थिती हे गुण वाढीस लागत. त्यामुळे उत्तम अध्यापक तयार होत.

आचार्यांनी प्राचीन प्रणालीला धरून शिक्षणपद्धती आखली; पण त्यातील वैगुण्ये व दोषस्थळे लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते बदलही केले. पाठांतराचे फाजील महत्त्व कमी केले. संपूर्ण अमरकोश पाठ न करता तो कसा पाहावा हे शिकविले. पढीकपणा व कर्मठता यांपेक्षा सार व विचार यांचे ग्रहण करणारा सनातनी, पण व्यवहारज्ञ शास्त्री निर्माण करणे हे ध्येय ठरविले. ‘प्राज्ञमठहे नाव त्यांचे गुरू प्रज्ञानंद सरस्वतींच्या स्मरणार्थ दिले गेले.

विद्वत्ता, बुद्धिमत्ता, दूरदर्शीपणा आणि परिस्थितीचे आकलन या अधिष्ठानांवर शोभणारे दोन गुण म्हणजे त्याग व नि:स्पृहता. या ऋषित्वाची छाप श्रीसोमनाथ प्रतिष्ठेच्या वेळी कन्हैयालाल मुन्शी, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यावरही पडली. त्यामुळे स्वतंत्र भारताचे गुरू किंवा सामाजिक क्रांतीचे अध्वर्यू अशी त्यांची सार्थ कीर्ती पसरली. स्व-धर्म व स्व-संस्कृतीच्या ज्ञानासाठी त्यांनी जशी प्राज्ञपाठशालेची स्थापना केली, तशीच संशोधनाची परंपराही स्थिर व अखंडित टिकण्याची व्यवस्था केली. पूर्वमीमांसा व वेदान्त यांवर परिश्रमपूर्वक कोश तयार केले. पूर्वमीमांसापाठाची संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली. १९२४ साली त्यांनी सोनगीर येथे प्रथम वेद हे अपौरुषेय नाहीतअसा पक्ष मांडून जुन्या विचारसरणीला फारच मोेठा धक्का दिला. १९२७ साली अकोला येथे हिंदुधर्मातील सर्व जाती धार्मिक व सामाजिकदृष्ट्या समान आहेत’, अशी घोषणा केली. अशासारख्या अनेक घोषणा ठराव रूपाने मंजूर झाल्या. ‘धर्मनिर्णय मंडळाची भूमिका कधीही हटवादी किंवा उच्छृंखलही नाही. ती इतिहास व प्रत्यक्ष अनुमान यांवरच आधारित आहे,’ असेच केवलानंद सरस्वती म्हणत.

प्राज्ञपाठशाळेची स्थापना व धर्मकोशाचे काम यांबरोबरच त्यांनी विपुल लेखनकार्यही केले :

) ‘मीमांसादर्शनम्’ : चिकित्सक आवृत्ती, पदसूची, सूत्रसूची व अधिकरणसंज्ञांची चर्चा, ) ‘अद्वैतसिद्धीचे मराठी भाषांतर, ) ‘ऐतरेय’ : विषयसूची, ) ‘कौषितकी ब्राह्मण’ : विषयसूची, ) ‘तैत्तिरीय मंत्रसूची’, ) ‘तैत्तिरीय शाखा’ : विषयसूची, ) ‘सत्याषाढसूत्र’ : विषयसूची, ) ‘अद्वैतवेदान्तकोश’, ) ‘मीमांसाकोश’.

याखेरीज त्यांनी शांकरभाष्यपरिभाषाकोश’, ‘नव्यवेदान्तमाला’, ‘ऋक्प्रातिशाख्याचे भाषांतर, ‘ब्राह्मणआरण्यकविषयक कोश, ‘केवलानंदीमीमांसासूत्रवृत्तीइत्यादी अनेक छात्रोपयोगी आणि संशोधनात्मक ग्रंथांची निर्मिती केली.

हेमा डोळे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].