Skip to main content
x

मर्ढेकर, बाळ सीताराम

     बाळ सीताराम मर्ढेकर हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. कवी, कादंबरीकार, नभोनाट्यलेखक, सौंदर्य-शास्त्राचे चिकित्सक-समीक्षक म्हणूनही त्यांचे कर्तृत्व विशेष लक्षणीय आहे.

      त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. त्यांच्या घराण्याचे मूळ उपनाम गोसावी होते. बा.सी. मर्ढेकरांचे चुलत चुलते उपजिल्हाधिकारी होते. त्यांनीच गोसावीऐवजी मर्ढेकर हे उपनाम प्रथम स्वीकारले. पुढे त्यांचे घराणे मर्ढेकर या नावाने ओळखले जाऊ लागले. मर्ढेकरांचे वडील सीतारामपंत हे प्राथमिक शिक्षक होते. शाळा तपासनीस म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला. त्यांच्या खानदेशातील नोकरीमुळे मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहादूरपूर येथे तर इंग्रजी तिसर्‍या इयत्तेपर्यंतचे शिक्षण फैजपूर-सावदे येथे झाले. पुढे धुळे येथील गरुड हायस्कुलात त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

      शालेय जीवनातच त्यांच्यावर भाषेचे आणि वाङ्मयाचे संस्कार झाले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून (१९२४-१९२८) त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी १९२८ साली प्राप्त केली. उप-जिल्हाधिकारी असणार्‍या आपल्या चुलत चुलत्याच्या प्रेरणेने आय.सी.एस. होण्यासाठी म्हणून कर्जाऊ मदत घेऊन ते इंग्लंडला गेले. पण दोन वेळा परीक्षेस बसूनही त्यांना यश मिळाले नाही. आय.सी.एस. परीक्षेत इंग्रजी वाङ्मयाच्या पेपरमध्ये मात्र त्यांनी विक्रम नोंदवला. या काळात इंग्रजी वाङ्मय, मानसशास्त्र, इटालियन, फ्रेंच व स्कँडेनेव्हिअन ह्या भाषांचा व त्यांतील साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांचा वाङ्मयीन व वैचारिक पिंड घडला. प्रा.जेम्स सदरलॅन्ड यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांनी युरोपात चित्रसंग्रहालये पाहिली आणि सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासार्थ इटलीत वास्तव्य केले. सौंदर्याचे स्वरूप व आस्वादनाबद्दलची त्यांची मते त्यातूनच घडली. विलायतेहून परतल्यानंतर त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या मुंबईच्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काही काळ कार्य केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन, जोगेश्वरीच्या इस्माइल, अहमदाबादच्या सिडन्हॅम व धारवाड येथील कॉलेजात त्यांनी अध्यापन कार्य केले.

      १९३८ साली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात कार्यक्रम नियोजक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ १८ वर्षे एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले व आपला ठसा उमटवला. कोलकाता, पटणा, त्रिचनापल्ली, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी कार्य केले.

     मर्ढेकरांचा पहिला विवाह १९४० साली होमाय नल्लाशेठ या त्यांच्या पारशी विद्यार्थिनीशी झाला. पण तो फार काळ टिकला नाही. १९४९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या खात्यातीलच अंजना सयाल यांच्याशी १९५२सााली त्यांनी दुसरा विवाह केला. १० फेबु्रवारी १९५३ रोजी त्यांना पुत्रलाभ झाला. त्याचे नाव राघव असे ठेवले.

     ‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत. ‘रात्रीचा दिवस’ (१९४२), ‘तांबडी माती’ (१९४३), ‘पाणी’ (१९४८) या कादंबर्‍या; ‘कर्ण’ (१९४४), ‘संगम’ (१९४५), ‘औक्षण’ (१९४६), ‘बदकांचे गुपित’ (१९४७) या संगीतिका त्यांनी लिहिल्या. त्यांचा ‘नटश्रेष्ठ व इतर संगीतिका’ हा संगीतिकांचा  संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘आर्ट्स अ‍ॅन्ड मॅन’ (१९३७), ‘वाङ्मयीन महामत्ता’ (१९४१), ‘टू लेक्चर्स ऑन अ‍ॅन इस्थेटिक ऑफ लिटरेचर’ (१९४१), ‘सौंदर्य आणि साहित्य’ (१९५५) या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली.

     मर्ढेकरांच्या ‘शिशिरागम’ या कवितासंग्रहावर रविकिरण मंडळाचा प्रभाव जाणवतो. त्यात माधव जूलियनांचे मर्ढेकर हे चाहते होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव विशेषत्वाने त्यांच्या या सुरुवातीच्या संग्रहातील कवितांवर दिसतो. पुढील संग्रहांतून मात्र मर्ढेकरांनी कवितेची आपली अशी स्वतंत्र वाट चोखाळत आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवली.

     मानवी जीवनातील क्षुद्रतेचे, हीनतेचे, उद्ध्वस्ततेचे भेदक चित्रण करीत असतानाच शाश्वत जीवनमूल्यांविषयी गाढ श्रद्धा त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. यंत्रयुगाने निर्माण केलेली दुःखे आणि वैफल्य यांचा कधी आर्त तर कधी उपहास-उपरोधाच्या साहाय्याने आविष्कार करणारी मर्ढेकरांची कविता वृत्तीने चिंतनशील आहे. आध्यात्मिक मूल्यांबद्दल वाटणारी ओढ हादेखील मर्ढेकरांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष होय. संतवाङ्मयातील कळकळ, लोकवाङ्मयातील आवेश व पाश्चात्त्य वाङ्मयातील प्रतिमानिर्मितीचे सामर्थ्य, आध्यात्मिक व आधुनिक विज्ञान-संस्कृतीतील तात्त्विक विचारधन यांतून प्रतिबिंबित होणारा आशय, दुर्दम्य आशावाद व मांगल्यपूजनाचा अंगभूत गुण यांमुळे मर्ढेकरांची कविता विशेष लक्ष वेधून घेते.

      मर्ढेकरांच्या कवितेवर दुर्बोधतेबरोबरच अनेक आक्षेप सुरुवातीच्या काळात घेण्यात आले. परंतु तिचे महनीयत्व काळाबरोबरच जाणत्या साहित्यरसिकांंनीही नंतर अचूक जोखले. मर्ढेकरांच्या सर्जनशील मनाने तात्त्विक, साम्यवादी जाणिवांचे दर्शन आपल्या कवितेतून घडवले. वर्तमानाला बिनदिक्कतपणे भिडण्याची त्यांच्या कवितेची वृत्ती ही मराठी काव्यपरंपरेला नवी होती. व्यक्तिगत भावानुभवांचे व्यापक आणि व्यापक जीवनजाणिवांचे व्यक्तिगत स्तरावरील आविष्करण हा त्यांच्या सर्जन प्रकृतीचा धर्म होता. व्यामिश्र जाणिवांच्या अभिव्यक्तीसाठी  त्यांनी प्रतिमा, प्रतीक, शीर्षक, प्राक्कथा, भारतीय-अभारतीय संदर्भ, निसर्ग संवेदना यांचा अत्यंत कलात्मक स्तरावर उपयोग करून घेतला. यंत्रयुगातील गतिमानतेत हरपत चाललेल्या सौंदर्याची व माणुसकीची खंत त्यांनी आपल्या कवितांमधून अत्यंत नावीन्यपूर्ण व प्रभावी शैलीत टिपली.

      नव्या शब्दांची घडण, शब्दांची मोडतोड, बहुभाषा संकरातून सिद्ध झालेली भाषा, उपमा, विशेषणे, क्रियाविशेषणे, म्हणी यांचे कलापूर्ण उपयोजन हे त्यांच्या कवितेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. या अभिनव प्रयोगांमुळेही मर्ढेकर टीकेचे धनी झाले. पण, त्यातील कलाप्रत्यय निर्विवाद मोठा आहे. मर्ढेकरांच्या भावानुभवात खिन्नता, क्षोभ, त्वेष, उपरोध असला; तरी संतांची करुणा आणि मांगल्यपूजकता तसेच वैज्ञानिक दृष्टीचे वरदानही आहे.

     मर्ढेकरांच्या कादंबर्‍यांमधून भिन्नभिन्न जीवनसरणी, संमिश्र समाज, ग्रामीण आणि नागरी जीवन, यंत्रयुगाने उद्ध्वस्त झालेले मानवी जीवन, मानवी मनातील गुंतागुंतीचा वेध, जीवनातील अनिश्चितता, असंबद्धता, आभासमयता, अगतिकता, संभ्रम अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला गेला आहे. रेखीव व्यक्तिदर्शने, दांभिकतेचे चित्रण आणि संज्ञाप्रवाहाचे कलात्मक उपयोजन हीदेखील त्यांच्या कादंबरी वाङ्मयातील काही वैशिष्ट्ये होत.

     ‘नटश्रेष्ठ अप्पासाहेब रेळे’ या शीर्षकाची लघुकथाही मर्ढेकरांनी लिहिली. मनोविश्लेषणात्मक स्वरूपाची ही कथा आहे. या लघुकथेवरूनच त्यांनी ‘नटश्रेष्ठ’ हे चार अंकी नभोनाट्य  लिहिले. त्यांनी ‘कर्ण’ ही पहिली संगीतिका लिहिली. त्यामुळे नवकवितेप्रमाणेच नभोनाटिकांचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ‘संगीतिका’ हा नवा वाङ्मयप्रकार त्यांनी मराठीत आणला. आकाशवाणीवरील नोकरीत असताना आकाशवाणीवर कादंबरीवाचनाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. डॉ.ग.य.चिटणीस यांची ‘कुसुम’ ही कादंबरी त्यांनी वाचली. आकाशवाणीवरील अभिवाचनाचा तो एक आदर्श मानला जातो. त्यांनी पार्श्वसंगीताचे वेगवेगळे प्रयोग केले.

     मर्ढेकरांच्या समीक्षात्मक लेखनात सौंदर्यशोध, साहित्यसिद्धान्त आणि प्रत्यक्ष समीक्षा असे त्रिविध स्वरूपाचे लेखन समाविष्ट आहे. त्यांनी ललितकलांचा एकत्रित विचार करून त्या अनुषंगाने साहित्यविषयक चर्चा केली आहे. ‘सौंदर्य हे ललितकलांचे स्वायत्त मूल्य आहे’, हा विचार त्यांनी मांडला. सौंदर्यमूल्य मांडताना त्यांनी सौंदर्यभावनेचे स्वरूपही उलगडून दाखवले आहे. अनुभवातील इंद्रियसंवेदनांच्या गुणधर्माची संगती संवाद-विरोध-समतोल या लयतत्त्वांच्या अनुरोधाने लावली की, सौंदर्याचा अनुभव येतो, असा लयतत्त्वाचा सिद्धान्त त्यांनी मांडला. कलावंताची प्रतिभा ‘भावनानिष्ठ समतानता’ निर्माण करते. असे मत त्यांनी मांडले.

     मर्ढेकरांनी शुद्ध कलावादी भूमिका मांडली. नावीन्य, वाङ्मयीन महात्मता, वाङ्मयीन तादात्म्य या संकल्पना त्यांनी विशद केल्या. बालकवी, माधव जूलियन यांच्या कवितेची त्यांनी समीक्षा केली. ग.दि. माडगूळकर व गंगाधर गाडगीळ यांच्याविषयी लिहिण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. कलाद्रव्य आणि कलामाध्यम यांतील भेद स्पष्ट करताना त्यांनी, ‘शब्द हे साहित्याचे साधन आणि भावनात्मक अर्थ हे साहित्याचे माध्यम होय’, असे म्हटले. ‘सौंदर्य आणि साहित्य’ या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान लाभला.

     मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

     कामाचा अतिरिक्त ताण, रक्तदाब व काविळीची लागण यांमुळे दिल्ली येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

     मराठी कवितेत मूलभूत बदल घडवून आणणारे प्रवर्तक, पृथगात्म अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी भाषासंकराचे प्रयोग करूनही आपले जातिवंत मराठीपण अबाधित राखणारा कवी, मानवी मूल्यांवर गाढ श्रद्धा असणारा कलावंत, मराठी टीकादृष्टीला ‘संस्कारवादी’ दृष्टिकोनाकडून ‘दर्शनवादी’ टीकेकडे नेणारा थोर समीक्षक म्हणून बा.सी. मर्ढेकरांचे स्थान अद्वितीय आहे.

    - प्रा. डॉ. सुहास गोविंद पुजारी

मर्ढेकर, बाळ सीताराम