मसुरकर, विनायक
कृतिशील, अत्यंत जागरूक व प्रखर हिंदुधर्माभिमानी कार्यकर्ते असणाऱ्या विनायक महाराजांच्या मसुराश्रमाचे शुद्धीकरण कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. विनायक महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मसुर या छोट्याशा गावात झाला. बालपणापासून त्यांच्यावर वैदिक धर्म-संस्कार झाले. त्यांनी देव, देश आणि धर्मासाठीच आपले जीवन सत्कारणी लावण्याचा संकल्प घेतला. या कार्यात कोणताही भावबंध, नाते यांचे पाश आडवे येऊ नयेत अशा विचारांनी त्यांनी लग्नमंडपातूनच पलायन केले. त्यांनी कन्याकुमारी ते केदारनाथ-काश्मीर असा उभा देश अनेक वर्षे भ्रमंती करून पाहिला. परधर्माच्या प्रचाराला बळी पडणारा गरीब, अज्ञानी हिंदू समाज त्यांनी जवळून अवलोकन केला. हिंदू समाजातील जातिभेद व अन्य दोष दूर करण्यासाठी त्यांनी शुद्धीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला. त्यांनी १९२० साली हिंदू धर्म रक्षणार्थ ‘मसुराश्रम’ नावाची संस्था स्थापन केली. शेकडो तरुण कार्यकर्त्यांना या आश्रम कार्याची दीक्षा देऊन मसूरकर महाराज यांनी तरुण कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले.
हिंदू धर्म व संस्कृतीसाठी आजीवन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी विशेष प्रकारचे शिक्षण-प्रशिक्षण दिले. धर्मांतर रोखण्यासाठी व परधर्मात गेलेल्यांना शुद्धीकरण करून स्वधर्मात परत घेण्यासाठी ब्रिटीश काळात विनायक महाराजांनी केलेले कार्य अपूर्व आहे. त्यांनी १९२८-२९ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यामध्ये धर्मांतरीत हजारो हिंदू बांधवांना शुद्धीकरण करून स्वधर्मात परत आणले. याबद्दल त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोर्तुगीज सरकारच्या अनेक प्रकारच्या जाचाला सामोरे जावे लागले. हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण, हिंदू धर्मासाठीच आपला जन्म समर्पित आहे, या भावनेने त्यांनी हा सरकारी छळ निर्भयपणे सोसला. या घटनेमुळे देशभर हिंदू समाजात नवी चेतना निर्माण झाली. अनेक ठिकाणी, अनेक राज्यांत तरुणांनी पुढाकार घेऊन शुद्धीकरणाची मोहीम चालवली. शुद्धीकरण मोहिमेचा प्रेरणादाता म्हणून मसुरकर महाराज सर्वत्र प्रसिद्ध झाले. विनायक महाराजांचा भगवद्गीतेचा विशेष अभ्यास होता. त्यांची गीतेवरील प्रवचने देश व हिंदू संस्कृतीच्या गौरवाने भारलेली ओजस्वी व्याख्यानेच असत.
हिंदू समाजातील गिरीजन,वनवासी समाजाला ख्रिश्चन धर्मप्रसारक पैसा व प्रलोभने दाखवून, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत धर्मांतरण करतात हे लक्षात घेऊन वसई, दमण-दीव, नगरहवेली, सातपुडा, डांग या परिसरातील वनवासी समाजांकडे मसुराश्रमाच्या कार्यकर्त्यांनी विशेष दक्षतेने लक्ष दिले. कार्यकर्ते घडविण्यासाठी त्यांनी जागोजागी व्यायामशाळा सुरू केल्या. ‘श्रीकृष्णाचा संदेश’, ‘श्रीरामचंद्रांचा संदेश’, ‘छत्रपती शिवरायांचा बोध’ अशा कार्यशाळा घेऊन एकाच वेळी हिंदू तरुणांची तने व मने सुदृढ करण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. यासाठी ‘दासबोध’ व अन्य प्रेरक साहित्याच्या लाखो प्रती छापून त्यांनी गावा-गावांत, वाड्या, वस्त्यांवर मोफत वाटल्या. श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, शिवाजी महाराज, समर्थ रामदास अशा प्रेरणापुरुषांची, देवतांची लाखो चित्रे छापून घेऊन त्यांनी शाळा-शाळांतून विद्यार्थ्यांना वाटली.
समाज प्रबोधनासाठी नियतकालिकाची गरज लक्षात घेऊन विनायक महाराजांनी ‘दासबोध’ नावाचे मासिक आणि ‘विश्वबोध’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
हिंदू धर्मातील वर्ण व जातिभेद मिटवून समाज एकसंघ, एकजूट करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी ब्राह्मणेतर समाजातील मुलांच्या समंत्र सामुदायिक मुंजी लावल्या. एवढेच नव्हे, तर परधर्मियांनी बाटवलेल्या हिंदू अबला स्त्रियांना त्यांनी स्वधर्मात परत आणले. त्यासाठी त्यांना प्रतिगामी विचारांच्या स्वकीय लोकांशीच जोरदार वैचारिक संघर्ष करावा लागला. मसुराश्रमाच्या हिंदूविषयक कार्यामुळे एकाच वेळी आश्रमाला ब्रिटिशांचा, पोर्तुगीजांचा, ख्रिश्चनांचा व मुसलमानांचा सतत विरोध सोसावा लागला. अनेक संकटे येऊनही अखेरपर्यंत विनायक महाराजांनी मसुराश्रमाचे कार्य जोराने सुरू ठेवले.
१९५५ साली, वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी देह ठेवला. दरवर्षी मुंबईत गोरेगाव येथे रामनवमी ते हनुमान जयंती असा सात दिवस त्यांचा स्मरण सोहळा साजरा होतो.