Skip to main content
x

मुधोळकर, जनार्दन रंगनाथ

     जनार्दन रंगनाथ मुधोळकर यांचा जन्म अमरावतीला झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले, तर उच्च शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. तेथून बी.ए. पदवी संपादन केल्यानंतर ते कायद्याच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या सिडनी ससेक्स महाविद्यालयातून एलएल.बी.पदवी संपादन केली. त्याचबरोबर ते लंडनच्या लिंकन्स इन्मधून बॅरिस्टर झाले. स्वदेशी परत आल्यावर त्यांनी १९२५ ते १९२९ या काळात अमरावती येथे आणि त्यानंतर १९३० ते १९४१ अशी अकरा वर्षे नागपूर येथे वकिली केली. सप्टेंबर १९४१ मध्ये त्यांची नियुक्ती जिल्हा  व सत्र न्यायाधीश म्हणून झाली. जून १९४८ पर्यंत त्यांनी त्या पदावर विविध ठिकाणी काम केले.

      जून १९४८ मध्ये मुधोळकर यांची नियुक्ती तेव्हाच्या नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली.

      १नोव्हेंबर१९५६ रोजी  राज्य पुनर्रचना झाल्यावर ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. ऑगस्ट-सप्टेंबर १९६० मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. ऑक्टोबर १९६० मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ३जुलै१९६६ रोजी मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन ते निवृत्त झाले.

      मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, या दोन्ही न्यायालयांत न्या.मुधोळकर यांचा एकेका अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक खटल्याच्या निर्णयात सहभाग होता. नानावटी प्रकरणातील मूळच्या फौजदारी खटल्यानंतर उद्भवलेल्या घटनात्मक प्रश्नाच्या निर्णयासाठी  मुंबई उच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांचे जे विशेष पूर्णपीठ स्थापन झाले होते, त्याचे न्या.मुधोळकर एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. नंतर सर्वोच्च न्यायालयात संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराच्या व्याप्तीच्या मुद्द्यावरच्या सज्जनसिंह खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचेही न्या. मुधोळकर सदस्य होते. या खटल्यात न्या.मुधोळकर आणि न्या.हिदायतुल्ला यांनी वेगळी निकालपत्रे लिहून काही मुद्द्यांवर बहुमताच्या निर्णयाशी असहमती व्यक्त केली. (बहुमताचे निकालपत्र सरन्यायाधीश प्र.बा.गजेंद्रगडकर यांनी लिहिले होते.)

      न्या.मुधोळकर भारतीय प्रेस परिषदेचे (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) पहिले अध्यक्ष होते.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९६१.
मुधोळकर, जनार्दन रंगनाथ