Skip to main content
x

मुळ्ये, शांताराम यशवंत

मुळ्ये मास्तर

        हाराष्ट्राच्या आधुनिक काळातील कलापरंपरेची ओळख करून देणारे संग्रहालय कोकणात, रत्नागिरीत व्हावे असे स्वप्न बघणारे व त्यासाठी धडपडणारे एक चित्रकला शिक्षक म्हणून जुन्या पिढीचे अनेक कलावंत मुळ्ये मास्तरांना ओळखत. ते कोकणातील संगमेश्‍वरजवळच्या ओझरखोल या गावचे रहिवासी होते; पण वडील यशवंत मुळ्ये हे अर्थार्जनासाठी गुजरातमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील बडोदा (वडोदरा) येथे झाले. त्यानंतर चित्रकला शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करून मुळ्ये मास्तर मुंबईत आले. याच काळात त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यातील मणचे गावच्या मंदाकिनी ठाकूरदेसाई यांच्याशी झाला.

मुंबईतील शाळेत ते चित्रकला शिक्षक म्हणून शिकवू लागले, चित्र-शिल्पकलेचा समाजात प्रसार व प्रचार व्हावा म्हणून ते आपल्या विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासोबतच विविध उपक्रमही राबवीत असत. ते गिरगावातील गोरेगावकर लेनमध्येे राहत व त्या काळी गिरगावात व त्या आसपासच्या भागात मुंबईतील अनेक ज्येष्ठ, प्रथितयश व तरुण चित्र-शिल्पकारांचे वास्तव्य होते. मुळ्ये मास्तरांनी त्यांच्याशी ओळखी करून घेतल्या व त्यांच्या कलानिर्मितीत ते रमू लागले. त्यातून कोकणात रत्नागिरीत एक आर्ट गॅलरी किंवा संग्रहालय स्थापन करण्याची कल्पना मुळ्ये मास्तरांना सुचली व त्यात समकालीन चित्र-शिल्पकारांच्या कलाकृती मांडाव्यात हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते आयुष्यभर झटले.

कोकणातील अनेक कलावंत मुंबईत जाऊन नावारूपाला आले; पण त्यांची कला कोकणात जतन केली जावी असा हेतू या कल्पनेमागे होता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात व विशेषत: १९५३ नंतर त्यांनी या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले व परिश्रमपूर्वक चित्र-शिल्पे मिळवण्यास सुरुवात केली. त्यामागे या कलाकृतींचा आस्वाद घेऊन कोकणासारख्या मागासलेल्या भागातील सामान्य माणसांची कलादृष्टी विकसित व्हावी असाही त्यांचा हेतू होता.

हळूहळू त्यांनी त्यांच्या सहवासातील चित्र-शिल्पकारांना आपले हे स्वप्न सांगण्यास सुरुवात केली. प्रत्येक कलावंताने आपली एक कलाकृती दिली तर हे संग्रहालय अल्पावधीतच उभे राहील असा त्यांचा विश्‍वास होता. पण ही गोष्ट सहजसाध्य नव्हती. त्यामुळे प्रसंगी या कलावंतांची मनधरणी करून, त्यांचा पाठपुरावा करून मुळ्ये मास्तरांनी चित्रे जमविण्यास सुरुवात केली. मुळ्ये मास्तरांचे व्यक्तिमत्त्व सात्त्विक, बोलणे आर्जवी होते. स्वच्छ पांढरा सदरा, त्याखाली पांढरेशुभ्र धोतर व डोक्यावर काळी गोल टोपी या वेषात ते भटजीच वाटत.

चित्रकला शिक्षक असणारे मुळ्ये मास्तर कलावंत असो की विद्यार्थी, खांद्यावरच्या झोळीतून मसाल्याची स्वादिष्ट सुपारी काढून त्यांच्या हातावर प्रेमाने ठेवत. कलाविषयक प्रयोग करण्यासाठी ते कायम उत्सुक असत. कलेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या जगात काय नवीन सुरू आहे हे समजून घेण्यासाठी परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षणाचे काम स्वीकारत व त्यामागे अर्थार्जनाचा हेतू नसे. त्यांच्या या तळमळीला प्रतिसाद देणारे काही कलावंत भेटले. सुरुवातीला त्यांना चित्रकार व्ही.एस. गुर्जर व परुळेकर यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक चित्र-शिल्पकारांनी बऱ्याचदा मानधनाची अपेक्षा न करता, तर काहींनी अल्प मोबदल्यात मुळ्ये मास्तरांना चित्रे देण्यास सुरुवात केली. चित्रकला शिक्षकाच्या अल्प उत्पन्नातूनही ते यासाठी खर्च करू लागले. संसाराकडेही त्यांनी या स्वप्नापोटी दुर्लक्ष केले. परिणामी संसाराचा भार त्यांची पत्नीच सांभाळत असे. त्या कलाकुसरीच्या वस्तू व हलव्याचे दागिने करून विकत आणि संसाराला हातभार लावत. आर्थिक ओढगस्त आणि त्यात भर म्हणजे मुळ्ये मास्तरांचे रत्नागिरीतील संग्रहालयाचे वेड, यामुळे घरात मतभेद होत. पण मुळ्येे मास्तर त्याकडे लक्ष देत नसत. मुळये मास्तरांकडील चित्रसंग्रह हळूहळू वाढू लागला. त्यात पेस्तनजी बोमनजी, आबालाल रहिमान, धुरंधर, मुल्लर, हळदणकर यांसारख्या अगदी जुन्या कलावंतांपासून ते आचरेकर, गुर्जर, चिमुलकर, माधव सातवळेकर, आलमेलकर अशा प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे जमली. त्यांत त्या काळी तरुण व प्रसिद्ध असलेल्या दलाल, मुळगावकर, प्र.ग.शिरूर अशा चित्रकारांसह नव्या पद्धतीने चित्रे काढणाऱ्या चित्रकारांचीही भर पडू लागली. गिरगावातल्या लहानशा जागेत ती ठेवणे कठीण होऊ लागले म्हणून त्यांनी रत्नागिरीत, गावाबाहेर एक जागा घेतली व ते स्वत: तिथे चित्रांसह स्थलांतरित झाले. नव्याने चित्रे मिळवण्यासाठी त्यांचे प्रयास सुरूच होते.

त्यांनी रत्नागिरीतील अनेक प्रतिष्ठितांची भेट घेतली. सर्वांना संग्रहालयाची आवश्यकता समजावून सांगितली व १९६४ मध्ये कोकण आर्ट सोसायटीची स्थापना झाली. बॅ. नाथ पै यांना मुळ्ये मास्तरांची ही धडपड कळली व त्यांनी खोलीवर जाऊन मुळ्ये मास्तरांनी जमवलेला हा संग्रह स्वत: बघितला. एका सामान्य चित्रकला शिक्षकाची ही धडपड बघून ते चकित झाले व हा प्रकल्प शासनातर्फे मार्गी लागावा असे त्यांनी प्रयत्न सुरू केले; पण अकस्मात त्यांचे निधन झाले. मुळ्ये मास्तरांना हा मोठाच धक्का होता. निधी उभारणीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले व १९६६ मध्ये गणेशचित्रांचे प्रदर्शन भरविले. त्याच वेळी पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू झाल्यामुळे ब्लॅकआउट व तणावाचे वातावरण होते. तरीही हे प्रदर्शन यशस्वी ठरले.

या काळात आर्थिक अडचणींमुळे ते एकदाच जेवत. चहा, कॉफी, सरबत, काहीही घेत नसत. त्यांना रत्नागिरीतील छाया गेस्ट हाउसचे मालक पैसे न घेता जेवण देत. त्यांना मदत करणार्‍या शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ड्रायव्हरमुळे मुंबई व रत्नागिरी दरम्यानचा प्रवास ते ट्रकने करत. ट्रक रात्री उशिरा माल भरून निघे; पण मुळ्येे मास्तरांचा प्रवास फुकट होऊन त्यांचे पैसे वाचत. याचा परिणाम असा झाला, की त्यांना हृदयविकाराने गाठले. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर १६ डिसेंबर १९७२ रोजी त्यांचे रत्नागिरीतच निधन झाले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आदर असणारी रत्नागिरीतील मंडळी त्यांचे शव घेऊन मुंबईत पोहोचली व त्यानंतर घरच्यांना त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक वार्ता कळली. रत्नागिरीतील त्यांच्या कलासंग्रहाची काळजी घेणारे कोणीच उरले नाही. अखेरीस रत्नागिरीतील मंडळींनी हा मौल्यवान कलासंग्रह मुंबईस स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचवला व तो काही वर्षे माळ्यावरच पडून होता.

अशीच काही वर्षे उलटली व याबाबत काहीतरी करावयास हवे असे कलाप्रेमी उद्योजक व ग्रंथसंग्रहक अरुण आठल्ये यांना मन:पूर्वक वाटू लागले. बालगंधर्व जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’चा विशेषांक १९८६/८७ मध्ये काढणारे हेच ते आठल्ये. ते मुळ्ये मास्तरांचे चिरंजीव अशोक मुळ्ये यांना भेटले. अशोक मुळ्ये यांनी अरुण आठल्ये यांची आपल्या वडिलांच्या या कल्पनेसंदर्भातील तळमळ बघून त्यांना तो चित्र-शिल्पसंग्रह देऊन टाकला.

यानंतर अरुण आठल्ये यांनी त्यात भर घालण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक चित्रकारांना किंवा त्यांच्या कुटुंबांना भेटून त्यांना मुळ्ये मास्तरांप्रमाणेच आवाहन करण्यास आठल्यांनी सुरुवात केली. काही चित्रकारांनी आठल्ये यांना आपली चित्रे देणगीदाखल किंवा कमी रकमेत दिली. अरुण आठल्ये यांच्या प्रयत्नांतून हा कलासंग्रह १९७७ मध्ये देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे महाविद्यालयाच्या वास्तूत प्रदर्शित करण्यात आला. यानंतर अरुण आठल्ये यांचे १९९७ मध्ये निधन झाले व या कलासंग्रहाचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा प्रकल्प मागे पडला.

त्यानंतर २००८ मध्ये देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अधक्ष्यांनी हा सर्व चित्रसंग्रह विकण्याचा निर्णय घेतला. गुप्तपणे सर्व चित्रे रिस्टोरेशन करण्याचे कारण देऊन मुंबईला हलवण्यात आली व परस्पर विक्रीचा व्यवहार होऊन मिळालेली रक्कम संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आली. ही बातमी धक्कादायक होती व त्यामुळे अरुण आठल्ये यांचे तरुण पुत्र अजय आठल्ये संतापले व त्यांनी अभ्यासक डॉ. अरुण टिकेकर आणि चित्रकार सुहास बहुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थाचालकांच्या या कृत्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे ठरविले. न्यायालयीन कारवाई, तसेच वृत्तपत्रे व दूरचित्रवाणीवाहिन्यांच्या माध्यमाद्वारे हे गैरकृत्य उजेडात आणण्यात आले. समाजातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली. परिणामी चित्र विकणाऱ्या व विकत घेणार्‍या मंडळींवर दबाव येऊन पूर्ण झालेला हा व्यवहार रद्द करण्यात आला व त्यातील एक्याण्णव चित्रे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळींच्या ताब्यात द्यावी लागली. अजय आठल्ये, त्यांस मदत करणारे डॉ. अरुण टिकेकर यांना मिळालेले हे फार मोठे यशच म्हणावे लागेल.

या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पित्रे यांनी दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या देणगीतून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पित्रे यांच्या नावाने आता या चित्रसंग्रहाचे संग्रहालयात रूपांतर करण्याचे ठरविले असून मुळ्ये मास्तरांच्या स्वप्नातील व त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रत्यक्षात अरुण आठल्ये यांच्या कल्पनेतील संग्रहालय देवरूखमध्ये लवकरच उभे राहील.

- सुहास बहुळकर

 

मुळ्ये, शांताराम यशवंत