Skip to main content
x

मुनीर खाँ ललियानावाले

स्ताद मुनीर खाँ यांचा जन्म मेरठ जिल्ह्यातील ललियाना या खेड्यात झाला. त्यांनी तबल्याचे प्राथमिक धडे त्यांचे वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद काले खाँ, यांच्याकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी फरूखाबाद घराण्याचे संस्थापक उस्ताद हाजी विलायत अली खाँ यांचे सुपुत्र, उस्ताद हुसेन अली खाँ यांचा गंडा बांधला. त्यांच्याकडे पंधरा वर्षे तालीम घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली घराण्याचे उस्ताद खलिफा बोली बक्श यांचे शिष्यत्व पत्करले.

बोली बक्श हे दिल्ली घराण्याचे उस्ताद काले खाँ यांचे पुत्र. बोली बक्श यांचे पुत्र उस्ताद नथ्थू खाँ व मुनीर खाँ हे गुरुबंधू. पुढे मुनीर खाँ यांनी हाजी विलायत अलींचे ज्येष्ठ पुत्र खलिफा उस्ताद निसार अली खाँ यांचेही शिष्यत्व पत्करले. त्यांनी उस्ताद नजर अली खाँ, लखनौ घराण्याचे बडे मुन्ने खाँ, ताज नासर खाँ पखवाजी इत्यादी चोवीस उस्तादांकडून विद्या घेतली असे म्हटले जाते.

त्या काळचे प्रसिद्ध गायक उस्ताद मौला बक्श, घसीट खाँ, नथ्थन खाँ, फैय्याझ खाँ, तसेच अनेक तंतुवाद्यकारांना त्यांनी तबल्याची साथ केली.

त्यांच्या अतुलनीय ज्ञानभांडारामुळे ते ‘कोठीवाले’ तबलिये या नावाने प्रसिद्ध होते. स्वत: एक प्रतिभावंत रचनाकार असल्यामुळे त्यांनी महत्प्रयासाने मिळविलेल्या अगणित बंदिशींमध्ये खूप भर पडली. त्यांनी विविध लयकारींचे उपज अंगाचे मुखडे, मिश्र जातीतील कायदे, अनेक गती व गततुकडे, फर्माइशी व कमाली चक्रदार वगैरे रचना केल्या. ते उत्तम शिक्षक होते. त्यांच्या अभिजात बंदिशींच्या ज्ञानभांडारामुळे आकर्षित होऊन अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांनीही शिष्यांना मुक्तहस्ताने विद्या दिली.

त्यांचे अनेक शिष्य नाणावलेले तबलावादक व रचनाकार म्हणून प्रसिद्धी पावले. मुनीर खाँ यांनी तयार केलेल्या प्रथितयश तबलावादकांची नावे अशी आहेतः त्यांचे भाचे खलिफा अमीर हुसेन खाँ, पुतणे खलिफा गुलाम हुसेन खाँ, अहमदजान थिरकवा, हबीबुद्दिन खाँ, नझीर खाँ पानिपतवाले, अल्लाह मेहेर, सादक हुसेन खाँ, मुश्ताक हुसेन खाँ, अब्दुल रहीम मियाँ, शमसुद्दिन खाँ, बाबालाल इस्लामपूरकर, विलायत हुसेन खाँ, राजा चक्रधर सिंग (रायगड), निसार हुसेन खाँ, हसन खाँ, डॉ. फेैज जंग बहादूर (हैदराबाद), अयूब मियाँ, औलाद हुसेन (खैरागड), अब्दुल रहीम (बुर्‍हाणपूर), विष्णूजी शिरोडकर, माशेलकर, सुब्रावमामा अंकोलेकर वगैरे.

निरनिराळ्या  घराण्यांच्या  सौंदर्यपूर्ण वादनवैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून त्यांनी आपला तबला प्रगल्भ बनवला. त्यामुळे त्यांच्यापासून एका नव्या घराण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांनी  आयुष्याचा बराच काळ मुंबईत व्यतीत केला. त्यामुळे फरूखाबाद घराण्याच्या या शाखेला ‘बम्बई घराना’ असेही संबोधले जाते.

उस्ताद मुनीर खाँ यांचे शिष्य उस्ताद अमीर हुसेन खाँ यांच्या विनंतीवरून त्यांचे शिष्य निखिलज्योती घोष, पंढरीनाथ नागेशकर, आत्माराम थत्ते यांनी १९५३ साली ‘उस्ताद मुनीर खाँ अकॅडमी ऑफ तबला आर्ट’ ही संस्था स्थापन केली. पुढे १९५६ पर्यंत मुनीर खाँ यांच्या ‘बरसी’चा ‘उरूसवजा’ समारोह दरवर्षी नेमाने लक्ष्मीबाग, गिरगाव येथे होत असे. ही जबाबदारी १९५६ पासून अमीर हुसेन खाँचे शिष्य अरविंद मुळगावकर यांनी सांभाळली.

        — अरविंद मुळगावकर

मुनीर खाँ ललियानावाले