Skip to main content
x

मुन्शी, कन्हैयालाल माणेकलाल

    कन्हैयालाल माणेकलाल मुनशी यांचा जन्म गुजरातमधील भडोच येथे झाला. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी असतानाही त्यांनी कायदेतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून महत्त्वाची कामगिरी केली. गुजराती साहित्यातील ते एक श्रेष्ठ सारस्वत असून ते फर्डे वक्तेही होते. भारतातील साहित्याची व संस्कृतीची ओळख जगाला करून देण्यासाठी त्यांनी भारतीय विद्याभवन ही संस्था स्थापन केली. या संस्थेने आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केली आहे. त्यांनी इंग्लिशमध्येही ग्रंथ लिहिले आहेत.

     कन्हैयालाल हे माणेकलाल व तापीबेन यांचे चिरंजीव होत. वडील मोठे सनदी अधिकारी होते. आधी घरच्या घरी शिकून कन्हैयालाल भडोचच्या खानबहादुर हायस्कूलमधून १९०१मध्ये मॅट्रिक झाले, मग बडोदा महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (१९१०) व एलएल.बी. (१९१६) या पदव्या संपादन केल्या. या महाविद्यालयात अरविंद घोष प्राध्यापक असल्याने कन्हैयालाल क्रांतिकारक चळवळीकडे आकृष्ट झाले होते. मात्र हा प्रभाव काही काळाने कमी झाला. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासतानाच इंग्लिश, फ्रेंच, जर्मन इत्यादी युरोपीय भाषा आत्मसात करून त्यातील साहित्यही अभ्यासले.

      मुनशी यांनी वकिली सुरू केली. त्यासाठी १९१३मध्ये ते मुंबईला आले व तेथेच स्थायिक झाले. मग १९१५मध्ये होमरूल चळवळीचे चिटणीस  म्हणून काम केल्यावर ते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. १९२७ साली विद्यापीठ मतदारसंघातून मुंबई विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. बारदोलीच्या सत्याग्रहात सामील झाल्यावर ते पूर्णपणे गांधीवादी बनले. १९३०-३६ या काळात काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व सरचिटणीस तसेच काँग्रेस मंत्रिमंडळातील मुंबई इलाख्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना ते स्वातंत्र्य आंदोलनातही सहभागी झाले होते. उदा. मिठाचा सत्याग्रह. यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मात्र ‘छोडो भारत’ चळवळीत सहभागी न होता त्यांनी अखंड हिंदुस्थान या संकल्पनेचा भारतभर प्रचार केला. तथापि या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या खटल्यात मुनशींनी त्यांची बाजू विनामूल्य मांडली. दरम्यान मतभेदामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती, पण महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरून १९४६मध्ये ते परत काँगे्रस पक्षात दाखल झाले. तेव्हा ते भारताची घटना तयार करणार्‍या घटनासमितीवरील सदस्य झाले. हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी १९४८मध्ये शासनाने त्यांना एजंट जनरल म्हणून नेमले होते.

      १९५२ साली लोकसभेवर निवड झाल्यावर ते अन्न खात्याचे मंत्री झाले. उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणूनही १९५३-५८ या कालावधीमध्ये त्यांनी काम केले. मतभेदांमुळे पुन्हा काँगे्रस सोडून १९६०मध्ये ते चक्रवर्ती राजगोपालाचारींच्या स्वतंत्र पक्षात सामील झाले. या पक्षाचे ते उपाध्यक्षही झाले होते. मात्र राजकारणाचा कंटाळा आल्यावर त्यांनी त्यातून निवृत्त होऊन सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्याला वाहून घेतले.

       मुनशी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष होते. सन्माननीय डॉक्टरेटसह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. पाचगणीचे संजीवन हायस्कूल (मूळ हिंदू हायस्कूल) त्यांनी स्थापले. १९३९ साली त्यांनी स्थापन केलेली भारतीय विद्याभवन संस्था हेच त्यांचे चिंरतन स्मारक आहे. भारतात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. ‘हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल’ (संपादक रमेशचंद्र मजुमदार १९५८-७७) हा दहा खंडांचा ग्रंथ हे या संस्थेचे मौलिक कार्य आहे. यात भारताचा संपूर्ण इतिहास आला आहे.

      गुजराती व इंग्लिश भाषांत मुनशी यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून वृत्तपत्रातील व नियतकालिकांतील त्यांचे लेखनही व्यापक आहे. याशिवाय त्यांनी गुजरातीत कादंबर्‍या व नाटके लिहिली आहेत. त्यांच्या गुजराती लेखनामुळे त्या साहित्यात मोलाची भर पडली आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक कादंबर्‍या व नाटके त्यांनी लिहिली असून त्यांच्या काही प्रमुख गुजराती साहित्यकृती पुढीलप्रमाणे - ‘बरेनी वसुलात’ (१९१४), ‘स्वप्नद्रष्टा’ (१९२५) या सामाजिक आणि ‘पृथ्वीवल्लभ’ (१९२१) व ‘भगवान कौटिल्य’ (१९२५) या ऐतिहासिक कादंबर्‍या. शिवाय ‘पुरंदर पराजय’ (१९२३) व ‘लोपामुद्रा’ (१९३३) ही पौराणिक आणि ‘डॉ. मधुरिका’ (१९३६) व ‘ब्रह्मचर्याश्रम’ (१९३१) ही सामाजिक व इतर नाटके. त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे.

    त्यांची इंग्लिश ग्रंथसंपदा अशी आहे - ‘गुजरात अँड इट्स लिटरेचर’ (१९३५), ‘आय फॉलो द महात्मा’ (१९४०), ‘अखंड हिंदुस्थान’ (१९४२), ‘द क्रिएटिव्ह आर्ट ऑफ लाइफ’ (१९४६), ‘पिलग्रिमेज टू फ्रीडम’ (१९६८), ‘सागा ऑफ इंडियन स्कल्प्चर’ (१९५९), ‘कृष्णावतार’ (१९६७) इ. ‘ईस्ट अँड वेस्ट’, ‘हिंदुस्थान रिव्ह्यू’, ‘भार्गव’ (गुजराती मासिक, १९१२), ‘यंग इंडिया (सहसंपादक १९१५), ‘गुजरात’ (सचित्र मासिक, १९२२), सोशल वेल्फेअर (साप्ताहिक, १९४०) ‘भवन्स जर्नल, (१९५४) इत्यादी नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन शेवटपर्यंत केले. हंस लिमिटेड ही संस्था त्यांनी १९३६मध्ये स्थापली. ही संस्था स्थापनात भारतीय भाषांतील मुख्य साहित्य हिंदीत आणण्यासाठी त्यांचे भाषांतर व संकलन करणे हा हेतू होता.

     मुनशी समाजसुधारकही होेते. पहिल्या पत्नी वारल्यानंतर त्यांनी १९२६मध्ये विधवा जैन स्त्रीशी पुनर्विवाह करून आंतरजातीय पुनर्विवाहाचा आदर्श समाजापुढे ठेवला. लालाभाई सेठ यांच्या विधवा लीलाबाई (१८९९-१९७८) या मुनशींच्या दुसर्‍या पत्नीही सामाजिक कामात व साहित्यात रस घेणार्‍या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने (१९३२-१९४०) त्यांना बंदिवासही घडला होता.

     खाद्यपेय आयोजनाचे शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय मुंबईत लीलाबाईंनी काढले. विविध सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांमध्ये लीलाबाईंनी महत्त्वाची पदे भूषवली होती. उदा. राज्यसभा, मुंबई विधिमंडळ, मुंबई महागरपालिका, हरिजन सेवक संघ, हिंदी विद्यापीठ वगैरे. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक पत्रके व स्फुट लेख लिहिले.

     त्यांची काही महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे - ‘रेखाचित्रो अने बीजा लेखे (१९२५), ‘कुमारदेवी’ (१९२९), ‘जीवनमंथी जडेली’ (१९३२), ‘रेखाचित्रो जुना अने नवा’ (१९३५) वगैरे अशा प्रकारे या दांपत्याने सामाजिक क्षेत्र, स्वातंत्र्यलढा, साहित्य आणि विविध संस्था-संघटना यात मोठे कार्य केले आहे.

     कन्हैयालाल मुनशी आणि पर्यायाने लीलाबाई यांची अधिक माहिती कन्हैयालाल यांच्या पुढील आत्मचरित्रपर व गौरव ग्रंथातून मिळू शकेल. ‘मारी विंजवबदर कहानी’ (के.एम. मुनशी, १९४३), ‘के. एम. मुनशी : हिज आर्ट अँड वर्क’ (डायमंड ज्युबिली व्हॉल्युम, (१९४७).

- संपादित

संदर्भ
१. मराठी विश्‍वचरित्रकोश; संपादक - कामत, श्रीराम पांडुरंग; विश्‍वचरित्र संशोधन केंद्र, गोवा
मुन्शी, कन्हैयालाल माणेकलाल