Skip to main content
x

मुंजे, बाळकृष्ण शिवराम

      बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म बिलासपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिलासपूर येथेच झाले. १८८८ मध्ये माध्यमिक परीक्षेत त्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले. पुढे ती परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. इंटरमीजिएटची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १८९८ मध्ये ते 'एल.एम.अँड एस' ही परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. लगेच डॉ.मुंजे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळाली.

     नोकरीत गर्क असताना त्यांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा योग आला. तेथे बोअर जमातीशी इंग्लंडचे युद्ध चालू होते. बोअर जमातीची सरशी होत होती. सेठ सुकातवाला यांनी जाहिरात देऊनही कोणी भारतीय डॉक्टर तेथे जाण्यास तयार होईना. तेव्हा अँग्लो इंडियनचीच निवड करावी लागेल असे ते खेदाने म्हणाले. तेव्हा मुंजे आणि त्यांचे मित्र डॉ.पारधी,डॉ.जतकर आणि डॉ.गाडगीळ हे आफ्रिकेत जायला तयार झाले. मुंबईत महिना बाराशे रुपये उत्पन्न मिळत असूनही त्या सर्व डॉक्टरांनी रु.२५०/- पगारावर वैद्यकीय अधिकारी म्हणून जायचे ठरवले.

     दरबन येथे गेल्यावर ते मोहनदास गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांच्याकडे उतरले. गांधीजींप्रमाणे मुंजे यांनाही काळे-गोरे हा भेद जाणवला. पण मुंजे यांच्या सैनिकी पोशाखामुळे त्यांना त्रास कमी झाला.

     युद्ध संपल्यानंतर त्यांचे मित्र पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. मुंजे मात्र भारतात परतले. १९०१ पासून नागपूर येथे ते नेत्रवैद्य म्हणून स्थायिक झाले. ते संशोधकही होते. त्यांनी कसाई खान्यातील शेळ्या-बोकडांची मुंडकी मिळविली. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची नवी पद्धत शोधून काढली. त्यामध्ये कौशल्य प्राप्त केले.चरक,सुश्रुत यांचे ग्रंथ अभ्यासले व नेत्रचिकित्सेवर त्यांनी संस्कृत भाषेतून ग्रंथ लिहिला.

     मुंजे यांनी १९०४मधील काँग्रेसच्या अधिवेशनात ‘रिफॉर्म्ड ओपिनियन ऑन हिंदू सोशल रिफॉर्म्स’ या विषयावर एक निबंध सादर केला. लोकमान्य टिळकांनाही तो आवडला. टिळकांचे विचार नागपूरमध्ये दृढ करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिवाजी महोत्सव सुरू केला.

     १९०५मध्ये बंगालची फाळणी झाली आणि भारतभर असंतोष उसळला. सुरतच्या काँग्रेस अधिवेशनाच्यावेळी काँग्रेस पुढार्‍यांतील मतभेद वाढीस लागले. जहाल आणि मवाळ असे स्पष्ट गट दिसू लागले. टिळकांच्या विचारांनी भारून मुंजे राजकारणात ओढले गेले. त्यांनी आपला डॉक्टरी व्यवसाय आखडता घेतला. टिळक मंडालेहून परतले. त्यानंतर पहिले महायुद्ध सुरू झाले. या संधीचा फायदा घ्यावा आणि सरकारला पाठिंबा देऊन मिळेल तो देशाचा लाभ करून घ्यावा असा टिळकांचा विचार होता. सैन्याची दारे उघडतील आणि सैनिकी शिक्षणाची सोय होईल त्याचा फायदा घ्यायचा.

     दादासाहेब खापर्डे, अणे, डॉ.हेडगेवार यांनी टिळक विचारप्रणाली नागपूर प्रांतात वाढवली. टिळकांनंतर काँग्रेसचे नेतृत्व म.गांधींकडे गेले. मुंजे यांनी तेव्हाही कायदेभंग चळवळ, जंगल सत्याग्रह यांमध्ये भाग घेतला होता. विहीरीचे पाणी आटवून मीठ तयार केले, वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाड चालविणे या दोन्ही आंदोलनांसाठी जनतेला प्रवृत्त केले.

     याच काळामध्ये त्यांनी आपले कार्यक्षेत्र बदलले. १९२० नंतर मुसलमान व हिंदू यांच्यात धर्मावरून, त्यातील आचारविचारांवरून वारंवार तेढ निर्माण झाली. पुढे त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या दंगलींत होऊ लागले म्हणून हिंदू महासभेची स्थापना झाली. मुंजे यांनी हिंदुमहासभेत वेगवेगळी पदे भूषवली. १९२७ ते १९३० या काळात मध्यवर्ती असेंब्लीचे ते सभासद होते. तेथे त्यांनी अनेक विषय मांडले. सैनिकी शिक्षण व सैन्याचे हिंदीकरण या विषयांवर त्यांनी आग्रहाचे प्रतिपादन केले. शाळा-महाविद्यालयांतून सैनिकी शिक्षण सक्तीचे करावे असा ठरावही त्यांनी मांडला होता.

     सैन्यावर होणाऱ्या खर्चाचे अभ्यासपूर्ण विवेचन करून त्यातून भारतीय वैमानिक तयार होण्यासाठी एकही पैसा खर्च होत नाही हे त्यांनी दाखवून दिले. इतकेच  नव्हे, तर इंग्लंडमधील स्टॅण्डर्ड कॉलेज, बुलविच कॉलेज व डेहराडून कॉलेज येथे सैनिकी शिक्षणासाठी हिंदुस्थानातून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यासाठी समितीवर व्हॉइसरॉयने डॉ.मुंजे यांची नेमणूक केली होती आणि याच काळात भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कलकत्ता, मद्रास, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी वसतिगृह काढण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यांची ही कल्पनाच पुढे ‘भोसला सैनिकी शाळे’च्या रूपात साकार झाली.

     काँग्रेसने  गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. तेव्हा भारतातील हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मुंजे विलायतेला गेले. परिषदेनंतर सर्व प्रतिनिधी परतले; परंतु डॉ.मुंजे मात्र फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया या देशांतील लष्करी शिक्षणाची पाहणी करण्यासाठी गेले. त्यांनी ड्रिस्डेन व म्युनिक येथील सैनिकी संस्थांची माहिती करून घेतली. प्रसिद्ध जर्मन सेनानी फील्ड मार्शल मॅकेन्सन यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली. इटलीत त्यांनी सैन्य आणि सैनिकी शाळा पाहिल्या. युरोपमधील सैन्यबळ आणि सैनिकी शिस्त यांमुळे प्रभावित होऊन भारतात सैनिकी शाळा स्थापण्याचा त्यांनी निश्चय केला.

     त्यांनी सैनिकी शिक्षणाचा अभ्यास करून मुंबईला जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वतंत्र हिंदुस्थानच्या संरक्षणाची व्यवस्था’ या विषयावर भाषण दिले. काळाची गरज ओळखून राष्ट्रीय विचारांनी प्रेरित अशा ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून वयाच्या चौसष्टाव्या वर्षी १९३७मध्ये त्यांनी भोसला सैनिकी शाळा (भोसला मिलिटरी स्कूल) सुरू केले. नाशिकजवळ एकशे पंचवीस एकर जमिनीवर हे विद्यालय आहे. तत्कालीन तीन लाख रूपये खर्च करून हे विद्यालय उभारले गेले आहे.

     शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ५जून१९३७ रोजी या शाळेचे उद्घाटन झाले. या शाळेच्या स्थापनेसाठी अंमळनेरपासून कराची व लाहोरच्या व्यापार्‍यांपर्यंत आणि निजामापासून ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडून त्यांनी आर्थिक सहकार्य मिळवले. डॉ.मुंजे यांचे वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी नाशिक येथेच निधन झाले.

     - रोहिणी गाडगीळ

     - भारद्वाज रहाळकर

मुंजे, बाळकृष्ण शिवराम