Skip to main content
x

मुटाटकर, सुमती विश्वनाथ

सुमती विश्वनाथ मुटाटकर यांचा जन्म अनंत चतुर्दशीच्या दिवशी बालाघाट येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर अंबर्डेकर व आईचे नाव अन्नपूर्णाबाई होते. वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत असत. ते संगीताचे दर्दी होते. त्यांनी नामवंत कलाकारांच्या बैठकी व मैफली स्वत:च्या घरी घडवून आणल्या. अंबर्डेकर घराणे मूळचे दमोह जिल्ह्यातील हंटा गावचे आणि मुटाटकर घराणे सागरचे. सुमतीताईंचे सासरचे नाव नलिनी असले तरी माहेरच्या नावानेच त्या ख्यातनाम झाल्या.

शालेय शिक्षणात त्यांची कुशाग्र बुद्धीची चमक दिसू लागली. त्यांना मैदानी खेळ, चित्रकला, वाचन, लेखन व संगीताची आवड होती. वडिलांच्या बदलीमुळे शिक्षणात खंड नको म्हणून त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अमरावतीला विद्यार्थिगृहात पार पडले. त्या १९३३ साली प्रथम श्रेणीत मॅट्रिक झाल्या.  त्यांचा १९३४ साली इंटरला असताना विश्वनाथ मुटाटकरांशी विवाह झाला. त्या १९३७ साली मॉरिस महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. एम.ए.ची परीक्षा देणे राहून गेले; परंतु कायद्याच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या.

त्या १९३९ ते १९४२ पर्यंत सावळाराम मास्तरांकडे संगीत शिकल्या. नंतर लखनौहून पद्मभूषण डॉ. एस.एन.रातंजनकरांकडून त्यांनी अभिजात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. शिवाय ग्वाल्हेरच्या पं. राजाभैया पूछवाले यांच्याकडे ख्याल आणि टप्पा, धृपद, धमार, अष्टपदीचा सविस्तर अभ्यास केला. उस्ताद विलायत हुसेन खाँ साहेबांकडून त्या आग्रा घराण्याची ख्याल गायकी शिकल्या. त्यांनी रसूलनबाईंकडून ठुमरीची शैली आत्मसात केली. पं.अनंत मनोहर जोशी, गजानन जोशी, उस्ताद मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडून त्या अवघड व दुर्मिळ चिजा, तसेच गोविंदराव बर्‍हाणपूरकरांकडे पखवाजाची लयकारी  शिकल्या. चिकाटी व ज्ञानलालसेपायी जिथून मिळेल, तिथून ज्ञानार्जन करून सुमतीबाईंनी स्वत:ला समृद्ध बनविण्याचा ध्यास घेतला.

सातत्याने श्रम करून त्यांनी ‘संगीत निपुण’, ‘संगीताचार्य’ आणि लखनौ संगीत विद्यापीठातून ‘हिंदुस्थानी संगीताचे सांस्कृतिक आयाम’या विषयात डॉक्टरेट संपादन केली. त्यांनी विदर्भातून पहिल्या संगीताच्या डॉक्टर असा बहुमान मिळवला. आकाशवाणीच्या निरनिराळ्या केंद्रांवरून त्यांचे कार्यक्रम होत असत. बहुविध गीतशैलीवर त्यांचे प्रभुत्व असून पखवाज वाद्याच्या संगतीत धृपद-धमार गायनशैली हमखास पेश करणार्‍या त्या एकमेव महिला होत्या.

संगीत क्षेत्रात संशोधन व विपुल लेखन करणार्‍या डॉ. सुमती दिल्ली, राजस्थान व नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी.च्या परीक्षक होत्या. त्यांनी १९७२ मध्ये भारताच्या सांस्कृतिक विभागातर्फे नेपाळला भेट दिली. अनेक मासिके,  आकाशवाणी, पत्रिकांतून  त्यांचे कितीतरी विषयांवर लिखाण प्रकाशित झाले. आकाशवाणी, संगीत नाटक अकादमी, विद्यापीठे आदींमध्ये चर्चात्मक समालोचने व बहुविध संगीत कार्यक्रमांचे त्या आयोजन करत. त्यांनी अनेक उच्चपदे  भूषविली. उदा. कार्यक्रम निर्माती, आकाशवाणी (१९५३-६७), प्राध्यापिका, दिल्ली विद्यापीठ (१९६८-८१) इ. इंग्रजी व संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून त्यांनी बंगाली, गुजराती भाषांचाही अभ्यास केला होता. सुमतीबाईंचे यजमान विश्वनाथ मुटाटकर हे गणितज्ञ व नागपूरच्या सिटी महाविद्यालयामध्ये गणित विभाग प्रमुख होते. 

सुमतीबाईंनी रचलेल्या बंदिशींचे ‘गीतनिर्झरी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. तसेच ‘आस्पेक्ट्स ऑफ म्युझिक’, ‘सुजान’, ‘सुमति-संगीताभरणम्’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९७९), ‘पद्मश्री’ (१९९१), ‘संगीत रिसर्च अकादमी’ सन्मान (१९९२), ‘कालिदास’ सन्मान (२००१), इत्यादींनी त्यांना गौरविण्यात आले होते. कोलकाता येथे एक्याण्णवाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.  

वि.. जोशी

मुटाटकर, सुमती विश्वनाथ