Skip to main content
x

नाबर, सीताराम व्यंकाजी

नाबर गुरुजी, शिक्षक

       सावंतवाडी संस्थानचे कुलकर्णी असलेल्या व्यंकाजी व उमा यांच्या तीन पुत्रांपैकी सीताराम हे एक होत. सीतारामचे वय ५-६ वर्षे असतानाच काळाने त्यांचे मातृछत्र हिरावून नेले. प्राथमिकपासून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीलाच झाले.

     सीतारामपंतास शिक्षणाची मनस्वी आवड होती. परंतु व्यंकाजींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सीतारामपंत मुंबईत दादर येथे शंकरराव राजाध्यक्ष या नातेवाईकांच्या घरी आले. ‘कमवा व शिका’ असा निर्धार करुन गुरुजी आपली वाटचाल यशस्वीरित्या पार करीत होते. किंग जॉर्ज इंग्लिश विद्यालयात २ वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. १९२१ मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून ते बी.ए. झाले.

      त्या काळी पदवीधराला चांगल्या पगाराची व मानाची नोकरी मिळणे सहज शक्य होते; परंतु गुरुजींच्या मनाला या गोष्टींची भुरळ पडली नाही. गुरुजी किंग जॉर्ज इंग्लिश विद्यालयामध्येच शिक्षक म्हणून प्रविष्ट झाले. १९१७ मध्ये इंग्लिश एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन पुढच्याच वर्षी गर्ल्स हायस्कूलची सुरुवात झाली.

       १९२१ मध्ये गुरुजी व त्यांचे सहकारी - मित्र बी.एन.वैद्य हे दोघे सोसायटीचे आजीव सदस्य बनले. हे दोघे रोज सकाळी व सुट्टीच्या दिवशी संस्थेसाठी निधी जमा करण्यासाठी कल्याणपासून विरारपर्यंत भटकत असत. या कार्यात सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी व संस्थेच्या चालक, शिक्षण विभागाचे अधिकारी व दानशूर महानुभावांचा सहभाग होताच. १९२४ ते १९३० या काळात नाबर गुरुजी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झाले. १९३३ मध्ये बी.एन. वैद्य संस्थेचे सचिव झाल्याने प्रशासनाचा मुख्य भार त्यांच्यावर पडला. १९३३ मध्येच नाबर व वैद्य असे दोघे किंग जॉर्ज इंग्लिश शाळेचे संयुक्त मुख्याध्यापक झाले. नाबर गुरुजींवर शाळा चालवण्याची मुख्य जबाबदारी आली. या इंग्लिश शाळेसाठी हिंदू कॉलनीत इमारत बांधली गेली. (१९२७) शाळा लवकरच नावारूपाला आली. शिक्षकांची गुणवत्ता सुधारू  लागली. नाबर अत्यंत कल्पक व उपक्रमशील होते. विद्यार्थी हेच त्यांचे दैवत होेते. शिक्षण लोकप्रिय होऊन जनतेचा सहभाग वृद्धिंगत व्हावा म्हणून नाबर यांनी शिक्षण - सप्ताह, प्रदर्शने, भूगोल, संस्कृत - दिन आणि प्रात्यक्षिके आयोजित केली. भूगोल, संस्कृत व इंग्रजी हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर, सुवाच्च असावे असा त्यांचा कटाक्ष होता. शिक्षकाच्या मनात विद्यार्थ्यांबद्दल प्रेम, नित्य अध्ययनशील असणे, माणुसकी जपणे हे महत्त्वाचे गुण असावेत असे त्यांचे म्हणणे असे.

       शिक्षण निरीक्षक वि.द.घाटे यांच्या विनंतीवरून नाबर व वैद्य गुरुजी बॉम्बे जिऑग्राफिकल असोसिएशनचे सचिव झाले. १९३५ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष घाटे हेच होते. घाटे व नाबर गुरुजी दोघांनाही भूगोल विषयात फार रस होता. किंग जॉर्ज इंग्लिश शाळेचा अवांतर उपक्रम म्हणून त्यांनी असोसिएशनच्या विद्यमाने व शिक्षकांच्या मदतीने भूगोलाचे प्रदर्शन आयोजित केले. उन्हाळ्याच्या सुटीत गुरूजींनी भूगोल शिक्षकांसाठी १० दिवसांचा विशेष अभ्यासक्रम आयोजित करून प्रो. धोंगडे, डॉ. कलोपेशी, प्रो. परदासानी यासारख्या विद्वान व तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने ठेवली. भूगोलावरील व्याख्याने व विषयाची अध्यापन पद्धत यांचे पुस्तक तयार करून गुरुजींनी त्याचे नाव भूगोल शिक्षकांसाठी उन्हाळी शाळा असे ठेवले. शिक्षण संचालकांनी या उपक्रमाचे कौतुक केलेच व पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान दिले.

      १९५० पर्यंत किंग जॉर्ज इंग्लिश शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर काम केल्यानंतर नाबर यांना दादर (पश्‍चिम) च्या पिंटो व्हिलातील बॉईज हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. या शाळेत ते १२ वर्षे कार्यरत होते. त्यांनी मुलांना व्यावहारिक शिक्षण देण्यासाठी काही अभिनव उपक्रम हाती घेतले. मुलांची संसद (पार्लमेंट) हे विशेष उल्लेखनीय. मुलांना जबाबदारी व कर्तव्याची जाण यावी म्हणून त्यांची संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बनवून त्यांच्याकडून विद्यार्थी - दिनाचे आयोजन केले.याचा उपयोग विद्यार्थ्यांत शिस्त राखण्यासाठी होत असे, त्यांचा शाळेच्या कार्यात वाढता सहभाग राही व आपुलकी निर्माण होई. आजचा सुविचार लिहिण्यास गुरुजींनी त्यांना प्रवृत्त केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली व त्याचा परिणाम दहावीच्या निकालात दिसू लागला. १९५९ मध्ये शाळेचे तीन विद्यार्थी राज्यात पहिल्या १० क्रमांकात आले. त्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिके मिळाली.

      नाबर यांनी शिक्षकांच्या मदतीने स्थायी निधी उभारून ५ वी पासून प्रत्येक वर्गात प्रत्येक विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख बक्षिसे व सुवर्णपदके देण्याची योजना आखून ती कार्यान्वित केली. सर्वोत्तम खेळाडूंचा देखील त्यात समावेश होता. शाळांच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी दुर्दम्य आशावादाने, कमालीच्या कळकळीने सहकाऱ्यांना सोबत घेऊन, अनंत परिश्रम घेतले. १६ एप्रिल १९६२ रोजी पिंटोव्हिला बॉईज हायस्कूलने त्यांचा सन्मान करून त्यांना कृतज्ञतापूर्वक मानपत्र अर्पण केले. ४२ वर्षांच्या अखंड सेवेनंतर जून १९६२ पासून ते निवृत्त झाले. गुरुवर्य नाबर सत्कार समितीने त्या प्रित्यर्थ निधी जमा केला. नाबर यांच्या संस्मरणीय सेवेविषयी कृतज्ञता म्हणून इंग्लिश एज्युकेशन सोसायटीने ५ सप्टेंबर १९८८ रोजी आयोजित समारंभात बाबा आमटे यांच्या उपस्थितीत बॉईज हायस्कूल (पिंटोव्हिला) चे नामांतर नाबर गुरुजी विद्यालय केले.

- वि. ग. जोशी

नाबर, सीताराम व्यंकाजी