Skip to main content
x

नागवडे, बाळासाहेब बबन

 

बाळासाहेब बबन नागवडे यांचा जन्म खामगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खामगाव व माध्यमिक शिक्षण उरळीकांचन येथे झाले. त्यांनी पुढील शिक्षण पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये घेतले.

नागवडे यांनी तांत्रिक अभियंता असूनही दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यासाठी त्यांनी स्थानिक बाजारातून आणि रास्त शेतकर्‍यांकडून संकरित गायी खरेदी करून नोव्हेंबरमध्ये २००९ मध्ये दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. नंतर दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी सर्व सोयीसुविधा असलेला सुसज्ज असा दुग्धोत्पादन प्रकल्प (डेअरी फार्म) प्रस्थापित केला. त्यांच्याकडे २७५ एच.एफ. संकरित गाई, २०० संकरित लहान वासरे, १८० संकरित कालवडी असा जनावरांचा कळप आहे. त्यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावरच भ्रूण हस्तांतरणाचा धाडसी प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेहून आयात केलेले आठ भ्रूण त्यांच्याकडील निवडक गाईंच्या गर्भाशयात हस्तांतरित केले. या कामी त्यांना अनेक पशुवैद्यांची मदत झाली. हे सगळे भ्रूण चांगल्या दर्जाचे व हस्तांतरणीय होते आणि त्याच क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीकडून ‘वर्ल्ड वाइड सायर्स’ अमेरिकेतून आयात केले होते. त्याचबरोबरीने त्यांनी वळूचे रेत असे आयात केले, की त्यापासून निर्माण होणार्‍या गर्भाच्या लिंगाची त्यांना माहिती असे व या  रेतापासून ९५% कालवडीच निर्माण होतील असा विश्‍वास वाटे, कारण ते सर्व लिंगनिश्‍चित वीर्य आयात होते व तेसुद्धा त्यांनी अमेरिकेहूनच केले. आयात केलेल्या रेतापासून वा भ्रूणापासून फळलेल्या येथील गाईंना झालेली संकरित वासरे आपल्या हवामानात व वातावरणात तुलनात्मकदृष्ट्या चांगली रुळतात. आयात केलेल्या सर्व भ्रूणांच्या वंशावळीचा अभ्यास केला असता असे दिसते की, त्यांच्या मातांनी एका वेतात १८००० लीटर दूध दिले असून त्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण ४.२% असते. त्यांच्या डेअरी फॉर्ममधून २५००-३००० लीटर्स दूध दररोज निर्माण केले जाते व त्यांच्याकडे रोज ३५ लीटर्स दूध देणारी गाय आहे.

फार्ममध्ये स्वत: नागवडे पशुखाद्य व खनिज मिश्रण तयार करतात. त्यातून खाद्याच्या खर्चात खूप बचत होते व पशुखाद्याची गुणवत्ता उच्च प्रतीची राखता येते, हे त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवले आहे. फार्मवर तयार केलेले पशुखाद्य २२ लीटर दूध देणार्‍या गायीला दिले तर फक्त रु.२०८/- खर्च येतो. जर विकतचे पशुखाद्य दिले तर  रु. ४५०/-च्या जवळपास खर्च येतो. आपल्याकडील गाई कुपोषित आहेत. याच गाईंना चांगल्या दर्जाचे व  गरजेइतके पशुखाद्य मिळाले, तर त्यांच्या दूध उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते, हे त्यांनी प्रात्यक्षिकातून सिद्ध केले आहे. नागवडे यांनी दुग्ध व्यवसायात नुकतेच आलेले व्यावसायिक व उद्योजक यांच्यासाठी ५ दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला. या प्रशिक्षण वर्गात अनुभवी, तसेच जाणकार पशुवैद्यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा दुग्ध व्यावसायिकांना खूप फायदा झाल्याचे नागवडे यांच्या लक्षात आले. त्यांच्या प्रक्षेत्रावर गाईसाठी ८५द२५ मीटर्सचे तीन गोठे, गाभण गाईसाठी वेगळा गोठा, कालवडींसाठी व वासरांसाठी स्वतंत्र शेड, त्याचबरोबर एकाच वेळी २४ गाईंच्या दोहनाची सोय असलेले २ मिल्क पार्लर इ. आधुनिक सोई आहेत. आवश्यक ते खाद्य घटक व तसेच खनिज घटक त्यांचा दर्जा तपासून विकत घेऊन मिश्रकाच्या साहाय्याने एकत्र करून स्वतः पशुखाद्य व खनिज मिश्रण तयार करतात.

नागवडे वासरे व कालवडींच्या वाढींकडे विशेष लक्ष, गाभण गाईंचे व्यवस्थापन तसेच दुधातील गाईंची विशेष काळजी, त्यांचा आहार व निगा, इतर रोजच्या व्यवस्थापनातील आवश्यक बाबी याकडेही बारकाईने लक्ष देतात व गाईंची उत्पादन क्षमता कायम राखतात. तसेच ते हिरव्या व वाळलेल्या चार्‍याच्या कुटीचे योग्य प्रमाणात मिश्रण, खनिज मिश्रणांचा दैनंदिन आहारात वापर, पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी, गाईंच्या माजावर लक्ष व त्यांचे योग्य वेळी कृत्रिम रेतन, तसेच आरोग्य रक्षणासाठी आवश्यक त्या तपासण्या, चाचण्या व वेळोवेळी रोगनियंत्रण कार्यक्रमाप्रमाणे विविध रोगांविरुद्ध प्रतिबंधक लसीकरण इ. तांत्रिक बाबींकडे लक्ष देतात.

स्वच्छ दूधनिर्मिती व व्यवस्थापनात संगणकीय प्रणालीचा वापर यामुळे त्यांचे प्रक्षेत्र एक आदर्श प्रक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच परिसरातील लांबचे शेतकरी त्यांच्या प्रक्षेत्रास भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतात. त्यांच्या शास्त्रोक्त पैदास व आधुनिक व्यवस्थापन यामुळेच त्यांच्या प्रक्षेत्रावरील गाईंची उत्पादन पातळी उच्च प्रतीची असून इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन अनुकरण करावे, अशाच प्रकारचे त्यांचे व्यवस्थापन आहे. त्यांना ‘वेंकटेश्‍वरा हॅचरीज ग्रूप’ उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार २०११ साली देऊन गौरव केला आहे.

-  डॉ. नागोराव विश्‍वनाथ तांदळे

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].