Skip to main content
x

नाईक, पांडुरंग सातू

     पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म गोमंतकात म्हार्दोळ गावात झाला. त्यांचे वडील फूलविक्रेते होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे त्यांनी इयत्ता तिसरीपर्यंतच कसेबसे शिक्षण घेतले आणि पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आरास करण्याची कला ते वडिलांकडून शिकले. १९१३ साली त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरचा भार सांभाळण्यासाठी १९१६ साली पांडुरंग नाईक थेट दादासाहेब फाळके यांना भेटले. तेथे त्यांना सुतारखात्यात नोकरी मिळाली. मात्र सुतारकामासह त्यांनी त्या काळात पडतील ती कामे केली आणि त्याच काळात कॅमेऱ्याच्या हालचालींकडेही त्यांनी लक्ष दिले. ‘सावित्री’ या चित्रपटानंतर त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या कंपनीतली नोकरी सोडली आणि ते ‘भारत विजय’ या नाट्यसंस्थेत सुतारखाते आणि रंगखाते विभागात काम करू लागले. काही दिवसांनी नाईक यांनी पाटणकरांच्या ‘पाटणकर फ्रेंड्स’ या चित्रसंस्थेत साहाय्यक छायालेखक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या अगोदर मूकपटाच्या जमान्यात मूकपटात विष्णुकुमार व्यासांच्या पेटीवादनाला तबलावादनाची साथही ते करत असत. चित्रकलेची आणि छायाचित्रकलेची आवड तर त्यांना पूर्वीपासूनच होती. नंतर त्यांनी ‘कोहिनूर फिल्म कंपनी’त काम सुरू केले. त्या काळात तेथे ‘अनसूया’ चित्रपटाचे काम सुरू होते. त्याचे छायाचित्रकार होते माणिकलाल पटेल. त्यांचे साहाय्यक छायालेखक म्हणून नाईक काम पाहू लागले. देव्हारे, दाबके, जोशी असे आघाडीचे छायाचित्रकार त्या काळी काम करत होते. त्यांच्याकडून नाईकांनी छायाचित्रकलेतले बारकावे समजून घेतले.

     लक्ष्मी पिक्चर्सनिर्मित ‘नीरा’ हा पांडुरंग नाईक यांनी छायालेखन केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘आशा’, ‘बुलबुले’, ‘परिस्तान’, ‘फातमा’ यांसारखे बरेच चित्रपट त्यांनी छायाचित्रित केले. ‘फातमा’ हा त्यांनी ट्रिक फोटोग्राफी केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाच्या छायालेखनावर चंदुलाल शहा खूश होते. पांडुरंग नाईक यांनी चंदूलाल शहांच्या ‘विश्‍वमोहिनी’, ‘राजलक्ष्मी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचे छायालेखन केले.

      पुढे शहा यांनी रणजित स्टुडिओची स्थापना केली आणि पांडुरंग नाईक यांना बोलावून घेतले. रणजितमध्ये त्यांनी अनेक मूकपटांचे आणि बोलपटांचे छायालेखन केले. १९३० साली त्यांनी इंग्लंडचा आणि  जर्मनीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी तिथले स्टुडिओ, छायालेखन, वातावरणनिर्मिती यांची पाहणी केली. तीन महिन्यांच्या या दौऱ्यात जर्मनीच्या ‘उफा’ या स्टुडिओत ते जाऊन आले. नंतर त्यांनी इंपिरियल फिल्म कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘इंदिरा एम.ए.’, ‘वाईल्ड कॅट ऑफ बॉम्बे’, ‘पुजारीन’ हे चित्रपट केले. ‘इंदिरा एम.ए.’ हा पांडुरंग नाईक यांचा सर्वात आवडता चित्रपट होता. रुबी मायर्स या त्यांची नायिका होत्या.

      नाईक यांची १९३५ साली बाबूराव पेंढारकरांशी भेट झाली. बाबूरावांनी त्यांच्यापुढे स्वत:ची फिल्म कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. संस्थेसाठी लागणारे भांडवल म्हणून शहा यांनी पंधरा हजार रुपये दिले आणि ‘हंस चित्र’ ही संस्था स्थापन झाली.

      पांडुरंग नाईक यांनी ‘हंस चित्र’ निर्मित ‘ज्वाला’ या चित्रपटाचे अप्रतिम छायाचित्रण केले. या चित्रपटातले गुहेचे देखावे चित्रित करणे ही पाडुरंग नाईक यांची कसोटी होती. पुढे पांडुरंग नाईक यांनी ‘धर्मवीर’, ‘प्रेमवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’, ‘सुखाचा शोध’, ‘देवता’ आणि ‘अर्धांगी’ या हंस चित्रच्या सगळ्याच बोलपटांचे चित्रण केले.

      कालंतराने ‘हंस’चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले होते. नवयुगनिर्मित ‘लपंडाव’, ‘अमृत’, ‘लग्न पाहावं करून’ या चित्रपटाचे छायालेखनही पांडुरंग नाईक यांनी केले. या चित्रपटांच्या यशात पांडुरंग नाईक यांच्या उत्कृष्ट छायालेखनाचा मोठा वाटा होता.

       ‘नवयुग’ सोडल्यानंतर पांडुरंग नाईक यांनी बाबूराव पेंढारकरांसमवेत ‘नवहंस चित्र संस्था’ स्थापन केली आणि ‘भक्त दामाजी’, ‘पहिला पाळणा’ आणि ‘पैसा बोलतो आहे’ या तीन चित्रपटांचे छायालेखन केले. त्याच सुमारास प्रभातच्या ‘लाखाराणी’ या बोलपटाचे छायालेखन केले. ‘पहिला पाळणा’ हा सामाजिक चित्रपट आणि ‘लाखाराणी’ हा पोशाखी चित्रपट होता. काव्यात्म छायाचित्रणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्या काळात अन्य छायाचित्रकार या चित्रपटाचा उल्लेख करत. नवहंस चित्र संस्थेवर बाबूराव पटेल यांनी ताबा मिळवला, तेव्हा पांडुरंग नाईक यांनी भागीदारी सोडली.

       पुढच्या काळात पांडुरंग नाईक यांनी ‘चूल आणि मूल’, ‘पगडी’, ‘आरती’, ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’, ‘प्यार का सागर’, ‘दूरकी आवाज’ असे अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले. भारत सरकारने निर्माण केलेल्या विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘लोकमान्य टिळक’ या पाऊण तासाच्या माहितीपटाचे छायाचित्रण पांडुरंग नाईक यांनी केले.

     पांडुरंग नाईक यांच्याकडे सुरेंद्र नाईक, राजू नाईक, अनंत कदम, जमशेद इराणी, व्ही. बाबासाहेब, कामत-घाणेकर, श्रीधर नाईक, रत्नाकर लाड अशा आघाडीच्या छायाचित्रकारांनी धडे गिरवले.

      मुंबईत पांडुरंग नाईक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मरणोत्तर मुंबई महानगर पालिकेने शिवाजी पार्क, रस्ता क्र. ५ चे ‘पांडुरंग नाईक मार्ग’ असे नामकरण करून त्यांच्या कामाचा गौरव केला.

- द.भा. सामंत

नाईक, पांडुरंग सातू