Skip to main content
x

नारळकर, नारायण गणेश

       नारायण गणेश नारळकर यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. जुनागडच्या बहाउद्दिन महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान विषय घेऊन ते बी.ए. झाले व त्याच महाविद्यालयामध्ये फेलो म्हणून काम करू लागले. तेथील प्रा. महादेव मल्हार जोशी यांचा नारळकरांच्या विचारांवर व जीवनावर मोठा परिणाम झाला आणि शिक्षकच व्हायचे असे त्यांनी ठरविले व खामगावच्या शाळेत ते शिक्षकाची नोकरी करू लागले. याच शाळेतून नारळकरांना ऊर्फ नानांना प्रशिक्षणासाठी जबलपूरला पाठविले. मार्च १९१८ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची एल. टी. पदवी मिळविली. त्यांची नेमणूक अकोला हायस्कूलमध्ये झाली. पूर्वीच ते एम. ए. झाले होते. त्यांना सरकारी नोकरी नको होती.  प्रा. द. रा. घारपुरे यांनी सुचविले म्हणून  नाना पुण्यात ‘शिक्षण प्रसारक मंडळी’त सामील झाले. न्यू पूना कॉलेज (आजचे एस.पी. महाविद्यालय) १९१६ मध्ये सुरू झालेले होते. महाविद्यालयाबरोबरच नानांना नूतन मराठी विद्यालयातही शिकविण्याचे काम दिले. नाना उत्तम शिक्षक होते. मुलांविषयी त्यांना प्रेम होते. अल्पावधीत त्यांची ख्याती पसरली. दुसऱ्या महाविद्यालयाचे विद्यार्थीही त्यांच्या तासाला गर्दी करीत. इंग्रजीप्रमाणेच तर्कशास्त्र हा त्यांचा हातखंडा विषय होता. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनासाठी दिशा मिळत असे. ग्रंथालय, तत्त्वज्ञान मंडळ, यु. टी. सी. महाविद्यालयाचे नियतकालिक यातही त्यांना विशेष रस होता.

      १९३६ मध्ये संस्थेची गरज म्हणून एस.पी. महाविद्यालयामधून मुख्याध्यापक म्हणून नूतन मराठी विद्यालयात त्यांना जावे लागले. तेथे गेल्या गेल्या त्यांचे कार्य वेगाने सुरू झाले. उत्तम सहकारी शिक्षक त्यांनी तयार केले. शिक्षणाबरोबरच सहली, संमेलने, बलोपासना, विद्यार्थी भांडार, विक्रय कला, सामान्यज्ञान असे विविध उपक्रम नानांनी सुरू केले. मुलांसाठी विकासाची नवनवीन दालने त्यांनी खुली केली. शाळेतील स्वदेशी भांडार, टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कॉमर्स इन्स्टिट्यूट, शिक्षक संघटना अशा अनेक क्षेत्रांना त्यांनी योगदान दिले. त्यामुळे नूतन मराठी विद्यालयातील मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली.

      १९४१ मध्ये संस्थेने नानांना मुंबईतील ‘पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स’चे प्राचार्यपद दिले. त्यांची तेथील एक वर्षाची कारकीर्दही अविस्मरणीय ठरली. त्यापुढे काम करणे विद्यापीठाच्या नियमांत बसणारे नव्हते. नानांची शिक्षक म्हणून नोकरी येथेच संपली.

       विमा व्यवसायाची आवड असल्याने १९४३ मध्ये ‘वेस्टर्न इंडिया विमा कंपनी’च्या मुंबई शाखेचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांची विमा कंपनीतील कारकीर्दही यशस्वी ठरली. मुंबई शाखा त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या क्रमांकावर गेली. आदर्श विमा विक्रीचे पाठ त्यांनी दिले. नवी माणसे तयार केली, जुन्यांना नवी दृष्टी दिली. अनेक नवे उपक्रम राबविले. १९५६ मध्ये आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाले. वयामुळे त्यांनी पुढे निवृत्ती घेतली.

      - डॉ. सविता भावे

नारळकर, नारायण गणेश