Skip to main content
x

नाटेकर महेंद्र

       हेंद्र नाटेकर यांचा जन्म वडाचे पाट ता. मालवण या खेडेगावात झाला. जन्मगावी चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आजोळी ‘सातेरी मांड’ येथे त्यांनी स्थलांतर केले. त्यांचे मामा लोकांना होडीत बसवून ने-आण करण्याचे काम करीत. महेंद्र त्या कामात मामांना मदत करीत असत. १९४४ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 

      अभ्यासाप्रमाणे ते खेळातही आघाडीवर असत. वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत सर्व बक्षिसे पटकावित असत. सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे हे त्यांचे वर्गमित्र. त्यांच्या सुसंस्कारांचा व सुंदर वळणदार हस्ताक्षराचा महेंद्रावर अतिशय चांगला परिणाम झाल्याचे ते स्वतः नमूद करतात. पुढे वाणिज्य विभागात प्रवेश घेऊन ‘कॉलेज ऑफ कॉमर्स तथा गोखले महाविद्यालय, कोल्हापूर’ येथे त्यांनी आपल्या करियरला सुरुवात केली. शिक्षण घेत असतानाच त्यांना सॉर्टरची नोकरी मिळाली. गोखले महाविद्यालयामध्ये असताना तेथील मराठी, हिंदी वाङ्मय मंडळे, क्रीडा, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन निवडणुका यामध्ये त्यांनी सक्रीय भाग घेत यश संपादन केले.

     ८ जून १९६४ पासून ‘प्रागतिक माध्यमिक विद्यालय’, मालवण येथे महेंद्र नाटेकरांनी शिक्षकी जीवनाची सुरुवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या चारही भाषा ते शिकवित. १९६७ मध्ये संस्थेने प्रतिनियुक्तीवर त्यांना बी.एड. महाविद्यालय सांगली येथे पाठविले. बी.एड. परीक्षा झाल्यानंतर ते पुनश्च शाळेत रुजू झाले. विद्यालयाचा अकरावीचा निकाल २० टक्क्यापर्यंत खाली आला होता. हा निकाल वाढविण्यासाठी, शाळा सुरू होण्यापूर्वी सुट्टीच्या दिवसात अधिक तास घेऊन अध्यापन करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांकडून पाच-सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. भरपूर लिखाण करुन घेतले. त्यामुळे शाळेचा एकूण चांगला निकाल लागला. नाटेकर हे अतिशय शिस्तप्रिय व उत्तम अध्यापक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. १९७१ मध्ये त्यांनी एम.ए. केले. त्याचबरोबर बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळातही प्रावीण्य मिळविले.

     यानंतर त्यांची कणकवली महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सकाळचे महाविद्यालय करून स्वखशीने दुपारी महाविद्यालयामध्ये ९ वी, १० वीला ते हिंदी शिकवित. महाविद्यालयात हिंदी प्राध्यापकाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हिंदी विषय घेऊन एम. ए. केले.

      त्याचवेळी हिंदी विषय घेऊन पण इंग्रजी विषय सोडून एस.एस.सी. झालेल्या १०० प्राथमिक शिक्षकांना इंग्रजी शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला. या सर्व शिक्षकांची प्रारंभापासून तयारी घेत एका वर्षात एस.एस.सी. उत्तीर्ण केले. त्यासाठी त्यांनी रात्री सात ते नऊ या वेळात त्यांचा अभ्यास घेतला. म्हणजेच सकाळी महाविद्यालय, दुपारी शाळा व रात्री इंग्रजी शिकवणी असे कार्य चालू होते. हे रात्रीचे वर्ग एकही पैसा न घेता नाटेकरांनी शिकविले.

      कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्यपद सोडल्यानंतर त्यांना न्यू इंग्लिश स्कूल, कळसुली येथे मुख्याध्यापक म्हणून नोकरी मिळाली. हे गाव कणकवलीपासून दहा कि.मी. वर आहे. येथील शाळेची अवस्था चांगली नव्हती. येथील प्रशालेचा कारभार शिस्तबद्ध व्हावा, शैक्षणिक दर्जा सुधारावा, बोर्डाचा निकाल जास्तीत जास्त लागावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचबरोबर शिक्षकही चांगले चारित्र्यसंपन्न व्हावे व शाळेबरोबरच परिसराचाही विकास व्हावा यासाठी त्यांनी आवश्यक ते कठोर निर्णय घेतले. शिक्षक, लेखनिक, शिपाई यांच्यासाठी आचारसंहिता तयार करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली. कळसुलीचा निकाल जो जेमतेम ४०-५० टक्के लागत असे तो १००टक्के लागला.

      यानंतर १९७४ पासून ते जांभवड्याच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. या शाळेची अवस्था तर फारच बिकट होती. परंतु त्यांनी आत्मविश्वासाने चित्र बदलायला सुरुवात केली. सद्हेतूने कार्य करताना काही मंडळी पुढे येऊन मदतही करीत असत. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले जांभवड्याचेच पां. वि. ऊर्फ अप्पा मडव हे त्यापैकीच एक. त्यांच्या प्रयत्नाने उच्च माध्यमिकतेची परवानगी मिळून ११ वी व १२ वी चे वर्ग सुरू झाले. त्यांनी शैक्षणिक बरोबरच सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शाळेची परिस्थिती सुधारली.

       जांभवडे पंचक्रोशीपर्यंत थेट अशी बारमाही वाहतूक सुरू व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रसंगी कणकवली पंचायतीसमोर उपोषणही केले.

       कालांतराने जांभवडे येथील शाळेचा एस.एस.सीचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागू लागला. उच्च शैक्षणिक दर्जा व उत्तम शिस्त म्हणून कुडाळ, कणकवली तालुक्यातून जांभवडे येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची रीघ लागू लागली आणि शेवटी ‘अ‍ॅडमिशन संपली’ म्हणून बोर्ड लिहावे लागले!

       १९९२ मध्ये त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. जांभवडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल उत्तम लागतो, हे आता सर्व जिल्ह्याला माहीत झाले होते. त्यामुळे अनेक शाळांचे मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांच्या प्रशालेला भेट देत असत. त्यांची प्रशाला मार्गदर्शन केंद्र बनली होती. अनेकजण त्यांच्याकडून शाळा निकालाचे तंत्र व मंत्र शिकून घेत. सर्वोत्कृष्ट निकाल हे नेहमी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी घेतलेल्या नियोजनबद्ध कष्टाचे फलित असते. यासाठी अर्थातच उत्तम शिस्त, उत्कृष्ट व्यवस्थापन याची जोड असावी लागते. त्यांच्या जांभवडे येथील प्रशालेच्या बाबतीत नेमके हेच घडले आणि ‘राज्यातील उत्तम व्यवस्थापन असलेली शाळा’ असे प्रशस्तीपत्रक व रु.१०,०००/- रोख पारितोषिक देऊन शासनाने प्रशालेचा गौरव केला. त्याचवेळी बस्त्याव परेरा यांनी नाटेकर यांना शाळेसाठी एक एकर जमीन दान केली.

       याच सुमारास त्यांचे शैक्षणिक लिखाण दै. रत्नागिरी टाईम्स, दै. सागर, दै. रत्नभूमी, महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल या स्थानिक वृत्तपत्रात चालू होते. त्या बरोबरच त्यांचे अध्यात्मिक वाचन चालू होते. जांभवडे, कवणकवली परिसरात ‘ज्ञानेश्वरी’वर प्रवचन करण्याचा परिपाठही त्यांनी चालू ठेवला होता.

      याच सुमारास त्यांची कोकण विकास महामंडळावर संचालक, निराधार व स्वयंरोजगार समितीवर सदस्य व जिल्हा दक्षता समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही नेमणूक झाली.

      त्याचवेळी १९९२ मध्ये, त्यांनी जांभवडे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवून, त्यात ते यशस्वी झाले. त्यांची जिल्हा परिषदेतील ‘विरोधी पक्षनेता’ म्हणून कारकिर्द गाजली.

      १९९२ मध्ये त्यांचे ‘ज्वलंत ग्रामीण शिक्षण’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. तसेच विविध मासिक व वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. त्यातील निवडक लेखांचे ‘शिक्षण विचार धारा’ पुस्तकही प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षणीय उपक्रम सुरू केले. शाळा सुरू होण्यापूर्वी, शिक्षक वर्गात येण्यापूर्वी, एखादा शिक्षक गैरहजर असल्यास त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पाढे, श्लोक, पाठ्यपुस्तकातील कविता म्हणायच्या.

       इंग्रजीच्या तासाला सर्वांनी (शिक्षकांसहीत) इंग्रजीतच बोलायचा प्रयत्न करणे. मालवणीबरोबरच शुद्ध मराठीत बोलण्यावरही त्यांचा कटाक्ष असे. मराठीचे उत्तम संस्कारमय उतारे पाठ करून घेतले जात असत. त्यांच्या स्पर्धा घेतल्या जात. इंग्रजी गद्य परिच्छेदाचे पाठांतर करून घेतले जाई. शाळा सुटल्यावर प्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर पसायदान व त्यानंतर संस्कारक्षम गीते म्हटली जात. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही या सर्व उपक्रमांना उदंड प्रतिसाद मिळत असे.

       ‘काजू लावा, बांबू लावा, हापूस आंब्याची कलमे लावा. कोकणातून सोन्याचा धूर निघेल,’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांची पंचक्रोशीत प्रभात फेरी काढून जनजागृतीचे काम त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान पाच काजूची व पाच बांबूची, हापूस आंब्याची रोपे लावण्याची सक्ती केली होती. स्नेह संमेलनात अशा विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाई. प्रशालेतर्फे सुमारे पाच लाख रोपांचे रोपण करून संवर्धन केले. पर्यावरण संतुलन व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच दिले आणि आजही घरोघरी विद्यार्थ्यांना - पालकांना या उत्पन्नातून हजारो रुपये मिळत आहेत.

- प्रा. रमेश खटावकर

नाटेकर महेंद्र