Skip to main content
x

नातू, अनंत विश्वनाथ

    नंत विश्वनाथ नातू यांचा जन्म विदर्भातील अकोला येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोल्यातील जठार पेठेतील मॉडर्न शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी नागपूरला जायचा निर्णय घेऊन १९४२मध्ये ते नागपूरला आले. अनंतरावांचे ज्येष्ठ बंधू जे पुढे ‘स्वामी भाष्यानंद’ म्हणून ओळखले जाऊ लागले, ते नागपूरच्या रामकृष्ण मिशनमध्ये राहत असत. अनंतरावही त्यांच्याकडे रामकृष्ण मिशनमध्ये दाखल झाले.

     १९४५च्या सुमारास नातू यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला व ते ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’मध्ये अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी गेले; पण वायुदलासाठी त्यांना शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आले.

     मात्र भूसेनेत त्यांची निवड झाली. त्यांचे सैनिकी प्रशिक्षण बंगळूरच्या ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’त झाले. ऑक्टोबर १९४६मध्ये ते उत्तीर्ण होवून त्यांची नेमणूक फ्रंटियर फोर्स बटालियनमध्ये झाली. ही बटालियन तेव्हा वायव्य सरहद्द प्रांतात कार्यरत होती. २० ऑक्टोबर १९४७पर्यंत ते या बटालियन बरोबरच कार्यरत होते.

     आपल्या सैनिकी नोकरीच्या प्राथमिक वर्षांमध्ये पठाण सैनिकांवर अधिकारी म्हणून अनंत नातू यांना काम करावे लागले. या कालावधीत हा सैनिक कसा वागतो, कसा विचार करतो व त्याच्या सवयी या सर्वांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांना अभ्यास करता आला. आपल्या सैनिकी जीवनात पाकिस्तानी सैन्याशी निरनिराळ्या वेळी झालेल्या चकमकी व युद्धांदरम्यान अनंत नातू यांना त्याचा उपयोग झाला.

     भारतात २० ऑगस्ट १९४७ रोजी परतल्यावर नातू यांची नेमणूक फिरोझपूर येथे असलेल्या १/९ गुरखा रायफल या रेजिमेंटमध्ये झाली. १९४७ ते १९४९ या कालावधीत ते १/९ गुरखा रायफल या रेजिमेंटचे कंपनी कमांडर होते. याच काळात झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी छांब-नौशेरा भागात झालेल्या युद्धात भाग घेतला होता. पन्नासच्या दशकात २/९ गुरखा रायफलचे कंपनी कमांडर म्हणून त्यांनी काम पाहिले.

     फिरोझपूर येथील कालावधीत एरिक वाझ या संपूर्ण व्यावसायिक आणि अत्यंत प्रामाणिक व सच्च्या शिपाईगड्याचा ‘गुरू’ म्हणून त्यांना लाभ झाला. (हेच एरिक वाझ पुढे वायुसेनेच्या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ झाले.)

     त्यांनी १९५५मध्ये वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज मधून ‘स्टाफ कोर्स’ पूर्ण केला. त्यानंतर १९६०मध्ये त्यांची नेमणूक ४/९ गुरखा रायफल रेजिमेंटमध्ये झाली. त्यांच्यावर डेहराडून येथील एकोणचाळिसाव्या गुरखा रेजिमेंटच्या प्रशिक्षण केंद्रात बटालियन उभारणीची जबाबदारी देण्यात आली. भारत-चीन युद्धात बटालियनचे सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांची नेमणूक नेफा सरहद्दीवर करण्यात आली.

     आधी ते बटालियनचे सेकंड-इन-कमांड व नंतर ४/९ गुरखा रायफलचे कमांडिंग ऑफिसर म्हणून पाच वर्षे नेफा येथे राहिले. हा पाच वर्षांचा कालावधी अत्यंत कष्टप्रद होता. सैनिकांच्या प्रशिक्षणाची आणि भारत-चीन सरहद्दीवर गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

     कमांडची जबाबदारी पूर्ण झाल्यावर त्यांची नेमणूक ‘डिफेन्स अटॅची’ म्हणून काठमांडू येथील भारताच्या दूतावासात करण्यात आली. काठमांडू येथे नातू तीन वर्षे होते. या कालावधीत माजी गुरखा सैनिकांसाठी व त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यांतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी सैनिकांच्या मुलांसाठी काठमांडू येथे एक वसतिगृह चालू करण्यात आले.

     ‘डिफेन्स अटॅची’ म्हणून आपली यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यावर त्यांना ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि त्यांना ९३ इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडंट बनवण्यात आले. ही ब्रिगेड तेव्हा पूंछ येथे होती. १९७० ते १९७३ या कालावधीत त्यांनी हा पदभार सांभाळला.

     १९७१ मध्ये त्या वेळेच्या पूर्व पाकिस्तानात (आत्ताच्या बांगलादेशात) पाकिस्तानी सैन्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पाकिस्तानने जम्मू-काश्मीर भागात पूर्ण ताकदीने हल्ले चढवायला सुरुवात केली. यात छांब विभागात पाकिस्तानला काही प्रमाणात यश मिळालेही; परंतु पूंछ भागात मात्र नातू यांनी पाकिस्तानी सैन्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरविले.

     पाकिस्तानी सैन्याच्या काही चौक्याही त्यांनी काबीज केल्या. या अतुलनीय पराक्रमाबद्दल ब्रिगेडियर नातू यांना ‘महावीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. पूंछ वाचवण्याच्या ब्रिगेडियर नातूंच्या कामगिरीबद्दल काही वर्षांनंतर या भागातील एका ठाण्याला त्यांचे नावही देण्यात आले.

    यानंतर पंचेचाळिसाव्या इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडंट म्हणून त्यांनी चार महिने काम केले. नंतर लगेचच त्यांना मेजर जनरल म्हणून पदोन्नती देण्यात आली व त्यांच्याकडे ऐतिहासिक चौथ्या इन्फन्ट्री डिव्हिजनची (म्हणजेच ‘रेड ईगल डिव्हिजन’) धुरा सोपविण्यात आली. त्यांनी १९७३ ते १९७५पर्यंत हा पदभार सांभाळला. नातू १९७५ ते १९७९पर्यंत सोळाव्या कोअर’चे ‘चीफ ऑफ स्टाफ’ होते. नागरोटा व उधमपूर येथे या नेमणूका होत्या. या दोन्ही जागा पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाच्या होत्या.

    नातू ऑक्टोबर १९७९मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नाने निवृत्त भारतीय सैनिकांना घरपोच निवृत्तिवेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली. देशासाठी त्यांनी केलेले काम लक्षात घेऊन सरकारने त्यांना १९८०मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित केले.

    सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या पत्नी सुधाताई यांच्या मदतीने सामाजिक कार्यास सुरुवात केली. चाळीसगाव येथे त्यांनी विवेकानंद बालक मंदिराची स्थापना केली. याच कालावधीत त्यांनी माजी सैनिकाच्या पुनर्वसनाचे कामही केले. त्यांना १९९५मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देण्यात आला. ग्राहक पंचायतीपासून निसर्ग संवर्धनापर्यंत अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या मुलाचे चिरंजीव विजय नातू हे भूसेनेत ब्रिगेडियर पदावरती कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त त्यांचे दोन जावई, एक नातू, एक नात व दोन नात-जावई सैनिकी सेवेत रुजू आहेत.

    - विजय अनंत नातू

नातू, अनंत विश्वनाथ