Skip to main content
x

नेमाडे, भालचंद्र वना

    भालचंद्र वना नेमाडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. आई गिरिजाबाई आणि वडील वना हे नेमाडेंच्या आत्मविष्कारात्मक लेखनाचे स्रोत आहेत. नेमाडेंनी सन १९५५ मध्ये भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एस.एस.सी. केले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाततून १९५९ मध्ये बी.ए. केले. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून भाषाविज्ञान या विषयात सन १९६१ मध्ये एम.ए. केले. सन १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए. (इंग्रजी) केले. सन १९८१मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी केली. सन १९९३ मध्ये जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट प्रदान करून सन्मान केला. सन १९६४ पासून १९९८ पर्यंत अहमदनगर-धुळे-औरंगाबाद-लंडन-गोवा-मुंबई असा त्यांच्या अध्यापकीय पेशाचा प्रवास आहे. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषाविज्ञान, शैलीविज्ञान, भाषांतर, तौलनिक साहित्य, भारतीय साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य हे त्यांच्या अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय. 

नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयवादी पुरस्कार करणारे लेखक असल्यामुळे त्यांची बहुतांश ग्रंथरचना मराठी भाषेतच झालेली आहे. ‘मेलडी’ (१९७०) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह, ‘देखणी’ (१९९१) हा दुसरा कवितासंग्रह, ‘कोसला’ (१९६३), ‘बिढार’ (१९७५), ‘हूल’ (बिढारचा दुसरा भाग २०००), ‘जरीला’ (१९७७), ‘झूल’ (१९७९) ह्या कादंबर्‍या. ‘साहित्याची भाषा’ (१९८७), ‘टीकास्वयंवर’ (१९९०), ‘तुकाराम’ (इंग्रजी १९८०), ‘दी इंफ्ल्यूअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी:अ सोशिओलिंग्विस्टिक अँड स्टाइलिस्टिक स्टडी’ (इंग्रजी १९९०) हे समीक्षाग्रंथ.

कोसला या कादंबरीचे हिंदी, गुजराती, कन्नड, असामिया, पंजाबी, उर्दू, उडिया, इंग्लिश, बंगाली आदी भाषांमध्ये भाषांतरे प्रकाशित. नेमाडेंच्या वाङ्मयीन कारकिर्दीत साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), साहित्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार (२००१) असे विविध मानसन्मान नेमाडेंना प्राप्त झालेले आहेत.

भालचंद्र नेमाडे हे विसाव्या शतकातील साठोत्तर कालखंडात गाजलेले आणि मराठी साहित्यविश्वात क्रांती करणारे गुणवंत आणि नामवंत असे देशीय मराठी साहित्यिक आहेत. सम्यक वास्तववाद, देशीयत, लेखकाची नैतिकता, नवनैतिकता, जीवन आणि साहित्याचा एकास एक संबंध; अशा मूल्याभावांचा प्रसार आणि प्रचार आपल्या व्रतस्थ चौकस आणि तिरकस परंतु स्वयंभू लेखनशैलीने करून, मराठी साहित्यविश्वात मूल्यभावांचे सर्जन करणारा सर्जनशील लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.

नेमाडेंच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, आकर्षक शैली, परंपरेची मोडतोड करणारी ऐतिहासिक पद्धती, थोरामोठ्यांचा तुच्छतापूर्वक ससंदर्भ उल्लेख, कोणत्याही विधानामागे त्यांची असलेली विचक्षण चिकित्सक दृष्टी, ऐतिहासिक परिप्रेक्षात त्यांनी मांडलेला मूल्यविचार; अशा अनेक वैशिष्ट्यांसह नेमाडे गेल्या पन्नास वर्षांपासून साहित्यविश्वात अत्यंत लोकप्रिय असलेले वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची कोसला ही कादंबरी आजही जागतिक वाङ्मयात चर्चेत आहे.

नेमाडेंचा मूळ पिंड हा कवीचा आहे. नेमाडेंच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाल्याचे दिसते. ‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता फर्गसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. नंतर १९५८ ते १९६८ च्या दरम्यान छंद, रूप, अथर्व, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, मराठवाडा, युगवाणी अशा महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांतून नेमाडेंच्या कविता प्रकाशित झाल्या. वाचा प्रकाशनातर्फे १९७० मध्ये ‘मेलडी’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. लघुपत्रिका चळवळीची सैद्धान्तिक पायाभरणी करणारे चळवळे म्हणून, अशोक शहाणे  आणि भालचंद्र नेमाडे हे लेखक मुख्य मानले जातात. पुन्हा वीस वर्षांच्या कालावधीनंतर १९८७ पासून १९९१ पर्यंतच्या काळातील एकूण २० कविता नेमाडेंनी गोव्याच्या वास्तव्यात लिहिल्या. कोकणातील पोर्तुगीज संपर्कातून त्या निर्माण झाल्यामुळे तिथल्याच संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणार्‍या ‘देखणी’ या शीर्षकाने त्यांनी ह्याच कवितासंग्रहात समाविष्ट केल्या. कवितेच्या भाषेच्या अमली द्रव्याखाली आपले सगळे व्यक्तिमत्त्व अटीतटीने उभे करून नेमाडेंनी ह्या कविता लिहिल्या आहेत. जगण्याचे मूल्य हे सर्वोच्च मूल्य आहे असे नेमाडे मानतात. तोच मूल्यविचार आपल्या देशीय भाषिक परंपरेतून नेमाडेंनी काव्यात मांडला आहे. देशीय भाषेच्या आणि शैलीच्या प्रयोगांमुळे त्यांच्या कवितांना स्वयंभू लय सापडली. नेमाडेंची कविता संत लोकपरंपरेशी रक्ताचे नाते जोडताना दिसते.

नेमाडे ओळखले जातात ते त्यांच्या १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोसला’ कादंबरीमुळे. कोसला कादंबरीतून महाविद्यालयीन तरुणाचे भावविश्व समर्थपणे चितारल्यामुळे आणि शिकणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्यात कोसलातील नायक पांडुरंग सांंगवीकरचे प्रतिबिंब आढळत असल्यामुळे, कोसला कादंबरी अत्यंत लोकप्रिय ठरली. काळाच्या सीमाही त्यांनी पुसून काढल्या. आजही कोसलातील पांडुरंग सांगवीकर तरुणांना आपलाच युवा नायक वाटतो. कोसला ही आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब असल्याचे प्रत्येक युवकाला वाटते.

कोसलाची एकूण शैली ही भाषिकदृष्ट्या आणि आशयदृष्ट्या साठोत्तर कालखंडापासून तर आजतागायत संमोहित करणारी ठरली आहे. कोसलाचे मराठी वाचकांना आणि लेखकांना इतके आकर्षण निर्माण झाले की, तरुण कादंबरीकारांच्या पुढील पिढीने कोसलासदृश्य कादंबरीची एक स्वतंत्र परंपराच मराठीत निर्माण केली. नेमाडेंची लेखनातील कुवत कोसलाने सिद्ध केली. मराठी अभिरुची आणि संस्कृती ह्यांसाठी कोसला ही एक मानदंड ठरली. कोसलाने केवळ मराठी मनेच भारावली नाही, तर अनेक भारतीय आणि इंग्रजी भाषांतही कोसलाच्या आवृत्त्या निघाल्या. भाषांतरे झाली. ‘कोसला म्हणजे नेमाडे’ अशी ख्याती आहे.

नेमाडेंनी कोसलाची निर्मिती केली ती वयाच्या चोविसाव्या-पंचविसाव्या वर्षी. कादंबरीचा रूढ पारंपरिक साचा टाळून देशीय-महानुभाव, संत, शाहिरी, चिपळुणकरी-फुले अशा जुन्या-नव्या शैलींचा आकर्षक वापर त्यांनी कोसलामध्ये केला. कादंबरीच्या रूपबंधाबाबत संभ्रम निर्माण झाल्याच्या काळात कोसला आल्यामुळे अनेक मान्यवर समीक्षकांनी- पु.ल. देशपांड्यांपासून ते नरहर कुरुंदकरांपर्यंत सर्वांनीच कोसलाची बरी-वाईट दखल घेतली.

कोसलानंतर तब्बल १२ वर्षांनी, १९७५ मध्ये नेमाडेंनी जाहीर केलेल्या कादंबरी चतुष्ट्यातील पहिली कादंबरी ‘बिढार’ प्रकाशित झाली. लगेच १९७७ मध्ये ‘जरीला’ आणि १९७९ मध्ये ‘झूल’ ह्या दोन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. ह्या तिन्ही कादंबर्‍या म्हणजे नेमाडेंच्या आयुष्यातील अनुभवांचा आणि आत्मविष्कारांचा प्रचंड तपशील होय. नेमाडेंनी कोसलाचे वळण टाळून पुन्हा देशीय शैलीव्यवस्थेतूनच नव्या-नव्या शैलींचा शोध घेतला आणि अस्तित्ववाद, वास्तववाद, जीवनवाद, सौंदर्यवाद, अतिवास्तववाद, वसाहतवाद वगैरे आधुनिक परंतु इंग्रजी साहित्यातूनच मराठीत आलेल्या वाङ्मयीन मूल्यांना देशीय शैलींचा आणि देशीय जीवन-जाणिवांचा संदर्भ देत कादंबरी लेखन केले.

तरुणपण, बेकारी, सर्वत्र आढळणारी खराबी, कारेपण, प्रेमाकर्षण, भोवतालच्या समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, समाजातील मूल्यर्‍हास, अस्तित्वाला हादरवून टाकणार्‍या जाणिवा, नोकरीतील आणि शिक्षणक्षेत्रातील कमालीची बकाली, समाजातील आणि नात्यातील गुंतागुंत आणि त्यातून स्वतःचा समांतर मार्ग निवडून भोवतालच्या सर्व माणसांना तपासत फिरणारा भटक्या नायक चांगदेव पाटील; नेमाडेंनी समर्थपणे उभा केला. शेवटच्या ‘झूल’ कादंबरीत चांगदेव पाटील सृष्टीच्या सानिध्यात आपले जीवसत्त्व शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याची स्थितीही चक्रधरासारखी होते. आपले दहा-बारा वर्षांचे संन्यस्त आणि तटस्थ जीवन निरीक्षण मांडत मांडत चांगदेव पाटील झूलच्या शेवटी एका थांब्यावर विसावतो. याच कादंबरीत चांगदेवाचा सहप्रवासी परंतु चांगदेवापेक्षा अधिक चळवळ्या आणि सामाजिक असलेला नायक नामदेव भोळे प्रवेश करतो. नेमाडेंची हिंदू ही महाकादंबरी ही त्यांच्या साहित्यातला मानाचा तुरा म्हणता येईल. 

नेमाडे जसे द्रष्टे कादंबरीकार आहेत तसेच ते द्रष्टे समीक्षकही आहेत. ‘टीकास्वयंवर’ या ग्रंथातील विविध समीक्षालेखांतून त्याचा प्रत्यय येतो. त्यांचा पहिला सडेतोड लेख ‘निरस्तपादपे देशे: श्री.के.क्षीरसागर यांचा वादसंवाद’ हा रहस्यरंजनच्या ऑक्टोबर १९६१ च्या अंकात प्रसिद्ध झाला. एका पोरसवदा लेखकाने मराठीतल्या दिग्गज असलेल्या समीक्षकालाच उखडावे, ही बाब चिंतनीय ठरली. लघुपत्रिका चळवळीचाही तो प्रारंभ होता. लघुपत्रिकावाल्यांनी अनेक वाङ्मयीन महात्मे पहिल्या चेंडूतच बाद करण्याचा जोरदार सपाटा सुरू केला. नेमाडेंनी दुसरा बाँम्ब टाकला, तो आपल्याच ‘वाचा’ या लघुपत्रिकेत- ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ या समीक्षा लेखात. त्यांनी मराठीतील लहानमोठ्या सर्वच लेखकांच्या ननैतिक वाङ्मयीन व्यवहारांवर परखडपणे टीका केली. ती अनेकांना खानदेशी मिरचीसारखी झोंबली. एकूण १९६०पासून १९९०पर्यंतच्या तीस वर्षांत नेमाडेंनी जे काही स्फुट स्वरूपात टीकालेखन केले, त्याचा गंभीर परिणाम विसाव्या शतकातील साठोत्तर मराठी वाङ्मयीन संस्कृतीवर झाला आणि नेमाड्यांच्या मूल्यांच्या आणि शैलीच्या प्रभावातच टीकालेखनाची पुढे एक मोठी परंपरा मराठीत निर्माण झाली. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या कठोर आणि आक्रमक शैलीचा जोरदार प्रभाव नेमाडेंच्या टीकाशैलीवर दिसून येतो.

कादंबरीविषयीचा मूल्यविचार, देशीय भाषाविषयक मूल्यविचार, साहित्यातील देशीयता, लेखकाची नैतिकता आणि बांधिलकी, लेखकाच्या सांस्कृतिक संवर्धनाचे आणि उत्तरदायित्वाचे विश्‍लेषण, वारकर्‍यांची शैली चिकित्सा, इंग्रजीचा मराठीवरील प्रभाव, दलित साहित्यविषयक विवादास्पद मते, भारतीयांचे इंग्रजी लेखन, अनुवादित कविता आणि अनुवादकांचे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व अशा अनेक विषयांसह नेमाडेंनी दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, ना.धों.महानोर, नारायण सुर्वे, विंदा करंदीकर, इंदिरा संत, पुं.शि.रेगे अशा अनेक मोठ्या दिग्गजांवर आणि आपल्या समकालीनांवर परखडपणे टीका-लेखन केले. मराठीत समीक्षाही नाही आणि सौंदर्यशास्त्रही नाही आणि जे समीक्षक आहेत, ते शेंबडे आहेत; अशीही टोकदार टीका नेमाडेंनी ह्याच ग्रंथात केलेली आहे. शिवाय प्रसारमाध्यमे ही निर्बुद्ध लोकांच्या हाती असून त्यांना आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचेही नेमाड्यांना वाटते. मराठीतील लघुकथा हा केवळ वर्तमानपत्रांचे आणि मासिकांचे रकाने भरणारा एक क्षुद्र वाङ्मयप्रकार आहे, असे नेमाडेंचे मत प्रसिद्ध आहे. उपयोजित आणि सैद्धान्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर मराठी साहित्याची चौकस आणि चिकित्सात्मक मीमांसा करणारा एक अत्यंत महत्त्वाचा समीक्षाग्रंथ म्हणून टीकास्वयंवरचा उल्लेख करावा लागतो.

गेल्या पन्नास वर्षांपासून व्रतस्थपणे कविता-लेखन, समीक्षा-लेखन, कादंबरी-लेखन, साहित्याची-भाषा-शैली यांविषयक लेखन करीत असतानाच; नेमाडेंना राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक आणि वाङ्मयीन क्षेत्रांतील दिग्गज आणि तज्ज्ञ, विद्वान आणि द्रष्टा मानले जाते. जर्नल ऑफ कन्टेम्पररी थॉट-इलिनॉय या त्रैमासिकाच्या विन्टर २००० च्या अंकात तसेच वर्ल्ड लिटरेचर टुडे या त्रैमासिकाच्या १९९८ च्या समर अंकात जॉन ऑलिव्हर पेरी या समीक्षकाने गेल्या पन्नास वर्षांत भारतातून नवे वैचारिक काय आले आहे, याचा निर्देश करताना, देशीवाद आणि भालचंद्र नेमाडे एवढाच सुस्पष्ट निर्देश केला आहे. मराठी साहित्यविश्वात वाङ्मयीन क्रांती करणारा समकालीन लेखक म्हणून नेमाडेंचा विचार केला जातो.

२०१४ साली नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली त्यांना भारत सरकारचा ‘ पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

- डॉ. किशोर सानप/ आर्या जोशी 

नेमाडे, भालचंद्र वना