Skip to main content
x

निकम, सुकदेव मानाजी

               सुकदेव मानाजी निकम यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मौजे निंबाळे येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. घरचीच शेती असल्याने त्यांनी शेतीविषयीच्या सर्व समस्या जवळून पाहिल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी, तर माध्यमिक शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झाले. ते १९६०मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली व त्यानंतर लगेचच नोकरीला सुरुवात केली. नोकरीचा बराच काळ धुळे येथील कृषी महाविद्यालयात गेला. याच काळात त्यांनी संशोधनाद्वारे एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांनी १९७८ ते १९८८ या काळात जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र येथे कृषिविद्यावेत्ता म्हणून करडई पिकावर संशोधन केले. त्यात करडई पीक घेताना पेरणीची वेळ, प्रति हेक्टरी बियाणे, खतांचा वापर, आंतरपीक पद्धती यावर त्यांनी संशोधन करून शेतकर्‍यांना उपयुक्त शिफारशी केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी ठिकठिकाणी कृषी मेळावे आयोजित करून या भागात करडर्ई पिकाच्या वाढीसाठी कामगिरी केली.

              निकम यांनी केलेल्या संशोधनावर आधारित ५० पेक्षा अधिक घडीपत्रिका आणि ३५ पेक्षा अधिक पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये पथदर्शक गहू प्रकल्प शिरपूर तालुक्यात सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर राबवला. त्याची जबाबदारी निकम यांच्यावर होती. प्रकल्पात सरासरी ४० ते ६० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन झाल्याचे दिसून आले. ते २००० मध्ये सेवानिवृत्त झाले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

निकम, सुकदेव मानाजी