Skip to main content
x

निकुम्ब, कृष्ण बलवंत

     कृष्ण बलवंत निकुम्ब यांचे शालेय शिक्षण सरकारी हायस्कूल, नाशिक येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापीठातून ते एम.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कर्नाटक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि लिंगराज महाविद्यालय, बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. तसेच कर्नाटक विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर केंद्रात निवृत्त मानसेवी प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

‘ऊर्मिला’ (१९४४), ‘उज्ज्वला’ (१९४५), ‘अनुबन्ध’ (१९६५), ‘अभ्र’ (१९७५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘पत्रं पुष्पम्’ हे मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘फणसाचं पान’ या गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे, आणि ‘साहित्य पराग’ हे अर्वाचीन मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. ‘साहित्यसमीक्षा’ हे समीक्षालेखन त्यांनी केलेले आहे. ‘पारख’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी संत नामदेव, संत तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, बी, इत्यादी कवींच्या काव्याचे मूल्यमापन केले आहे. हा ग्रंथ १९७३ साली प्रसिद्ध झाला आहे. ‘पावसाचं घर’ आणि ‘सायसाखर’ (१९५४) हे त्यांचे बालगीतसंग्रह असून ‘मृगावर्त’ (१९७०) या खंडकाव्याचे लेखनही त्यांनी केले आहे.

कृ.ब.निकुम्ब यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या सार्‍यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता. अपुर्‍या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे-जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक भावमधुर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भाव-भावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.

‘घाल घाल पिंगा वार्‍या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते. लोकान्तापेक्षा एकान्तात रमणारा काव्यप्रेमी, स्वप्नाळू, सौंदर्यासक्त कवी म्हणून निकुम्ब ओळखले जातात. अनेक संतकवींच्या, आधुनिक कवींच्या काव्याची आस्वादक समीक्षा करून त्यांनी या काव्यांचे मोठेपण रसिकांना जाणवून दिले आहे.

‘अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे, म्हणजे उंबराला फूल येणे’ अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देते.

- डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].