Skip to main content
x

नलावडे, अरुण जनार्दन

       श्‍वास’ या चित्रपटाला अभिनयाद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या अरुण जनार्दन नलावडे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील जनार्दन हे भारतीय नौदलामध्ये कामाला होते. तसेच ते कामगार चळवळींमध्ये कार्यरत होते. माटुंग्याच्या गोपी टँक हायस्कूलमध्ये अरुण यांचे प्राथमिक शिक्षण झाले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांची आई गावी गेल्यावर अरुण यांना मामाच्या घरी राहावे लागले. त्यांच्या मामा व काका यांना हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याचे वेड असल्यामुळे अरुण यांनाही त्यांच्या जोडीने चित्रपट पाहायला मिळत. चित्रपटासंदर्भात मामांशी साधलेला संवाद, चित्रपटाच्या तंत्राचे बारकाईने केलेले निरीक्षण, पाहिलेल्या चित्रपटांचे साभिनय केलेले कथन व उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे बालपणातच चित्रपटासंदर्भातले त्यांचे आराखडे निश्‍चित झाले.

         युनियन हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत असताना अरुण यांना स्नेहसंमेलनात ‘पंडित रविभूषण’ या नाटकाचा प्रॉम्प्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण आयत्या वेळेस नाटकाचा नायक आजारी पडल्यामुळे अरुण यांनी नाटकात नायकाची भूमिका केली. त्या वेळेस पायजम्याच्या सुटलेल्या नाडीचा ताण न घेता, प्रसंगावधान राखत त्यांनी नाटक पूर्ण केले व त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. या प्रसंगामुळे त्यांचा अभिनय करण्याचा आत्मविश्‍वास वाढला.

        आठवीत असताना दादर येथील छबिलदास शाळेतही अरुण यांनी स्नेहसंमेलनासाठी छोट्या नाटिका बसवल्या, त्यासाठी लेखन व दिग्दर्शन केले. बोरिवली येथील गोखले एज्युकेशन शाळेत नववीत असताना त्यांनी मित्र प्रदीप कबरे यांच्या सहकार्याने ‘कला शलाका’ नावाची संस्था स्थापन करून रमेश पवारांच्या ‘हंगर स्ट्राईक’, ‘सन अँड सँड’, ‘क्यू’, ‘उकिरडा’, ‘कोणं हसलं’ या एकांकिका केल्या. त्यात त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याची, दिग्दर्शकाची पारितोषिके मिळाली. रंगमंचीय कारकिर्दीत यशस्वी होत असतानाच ते शालेय जीवनात अयशस्वी ठरले, पण हार न मानता ते पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागले व पुढल्या वर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९७३ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळात मुंबईत आघाडीच्या ‘प्रबोधन’, ‘नानासाहेब फाटक’, ‘इक्सस’, ‘नॉइजी’, ‘नाट्यदर्पण’ यांसारख्या एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसे पटकावली.

       १९७४ मध्ये अरुण नलावडे यांना बी.ई.एस.टी.मधून नोकरीसाठी बोलावणे आल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तीन वर्षांच्या मोटार मेकॅनिकच्या प्रशिक्षणासाठी बी.ई.एस.टी.त रुजू झाले. याच काळात तेथे बंद पडलेली एकांकिका स्पर्धा नव्याने सुरू झाली आणि त्यांनी पहिल्याच वर्षी उत्कृष्ट अभिनेत्याचे व दिग्दर्शकाचे पारितोषिक पटकावले. चौदा वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी सहकारी व लेखक प्र.ल. मयेकर यांच्या नाट्यसंहितांचे दिग्दर्शन केले. दोन वेळा राज्य नाट्य स्पर्धेत कमी उंचीमुळे नाकारले गेल्यावर त्यांनी प्र.ल. मयेकर व अविनाश नारकर यांच्यासह बाहेरून राज्य नाट्य स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी त्यांनी ‘अथं मनूस जगन हं’ या नावाचे नाटक केले. हे नाटक यशस्वी झाल्यावर डॉ. श्रीराम लागूंनी या नाटकाचे ५० प्रयोग केले. याच दरम्यान अरुण यांची मच्छींद्र कांबळी यांच्याशी ओळख झाली व कांबळी यांनी त्यांना दिग्दर्शनासाठी ‘पांडगो इलोरे बा इलो’ हे नाटक दिले. या नाटकाने ९५० प्रयोग करण्याचा विक्रम केला. याबरोबरीनेच त्यांनी ‘पाहुणा’, ‘रानभूल’, ‘रातराणी’ यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यात अभिनयही केला, तर ‘गंमतजंमत’ या नाटकात त्यांनी एकूण तेरा भूमिका साकारल्या असून त्यातील प्रत्येक भूमिका जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान मांडणारी होती.

       अरुण नलावडे यांच्यावर श्रीराम लागू यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पडला आणि नेमके त्याच वेळी त्यांना श्रीराम लागूंसोबत ‘नटसम्राट’मध्ये आप्पा बेलवलकरांच्या जावयाची भूमिका मिळाली. ही भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने साकारली. यानंतर नलावडे यांना व्यावसायिक रंगभूमीवरील ‘वासूची सासू’ या नाटकातील ‘बंड्या’ची भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका लहान असली तरी त्यातल्या दारुड्याचा विनोदी भाव त्यांनी तंतोतंत अभिव्यक्त केला. दारू प्यायल्यावर शुद्ध येणाऱ्या, पण वास्तवात विरोधाभास निर्माण करणारी ही विनोदी भूमिकाही अरुण नलावडे यांच्या अभिनयकौशल्यामुळे लक्षात राहते. या नाटकानंतर हौशी रंगभूमीशी असणारे नलावडे यांचे नाते कमी झाले व त्यांची व्यावसायिक वाटचाल सुरू झाली.

      कलावैभवच्या मोहन तोंडवळकरांनी नलावडे यांना ‘कार्टी श्रीदेवी’ या वसंत सबनीसलिखित नाटकाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. यानंतर मात्र त्यांनी चित्रपटसृष्टीकडे आपला मोहरा वळवला. त्यांनी ‘स्पंदन’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘गोजिरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘श्री सिद्धिविनायक महिमा’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी प्रभावीपणे केले. ‘ही पोरगी कुणाची’ हा टेस्टट्यूब बेबी या वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित, गिरीश मोहिते यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात हवालदाराची भूमिका त्यांनी साकारली. संवेदनशील मनाचा हा हवालदार प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवणारा, सोज्ज्वळ मनाचा, माणुसकी बाळगणारा व मदत करणे पोलीस या नात्याने आपला हा नैतिक अधिकार आहे असा मानणारा हा भाबडा हवालदार बाप नसणाऱ्या मुलीचा स्वीकार प्रांजळपणे करण्यास तयार होतो, हा परंपरेला विरोध करणारा विचार नलावडे यांनी प्रेक्षकांसमोर ठेवला.

       अरुण नलावडे स्वत: दिग्दर्शित केलेल्या नाटक-चित्रपटामध्ये काम करत असताना त्या त्या संहितेचे वाचन करून कथानकातील सर्व पात्रे, त्यांच्या मनोभूमिका समजून घेतात. दिग्दर्शन व अभिनयासाठी लागणारा हा सर्व मनोव्यापार व अभ्यास पूर्ण झाल्यावरच ते आपल्या कामातून कलाकृतीला न्याय देतात. म्हणूनच त्यांच्या सर्व भूमिका संवेदनशीलपणे प्रेक्षकांपुढे येतात. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना नवा विचार देऊन जाते आणि त्या भूमिकेचे बारकावेही मांडते. आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसेच कलाकृतीत दिसतात, त्यांचाच आविष्कार कलाकृतीतून होत असतो, या साहित्य व समाज यांच्यातील अन्योन्यसंबंधाचे भान अरुण नलावडे यांच्याकडे असलेले दिसते. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला ‘श्‍वास’ या चित्रपटाचे द्यावे लागेल. त्यातली केशवराव विचारेंची भूमिका गावातल्या सर्वसामान्य माणसाची हतबलता दाखवत असतानाही आपल्या नातवाच्या आजारपणातील हळवेपणही दाखवून जाते, तसेच अडचणीच्या काळात आवश्यक असणारा कणखरपणाही दृग्गोचर करते. आपल्या भोवतालचे निरीक्षण हा अभिनयाचा व दिग्दर्शनाचा गाभा आहे, असे मानणाऱ्या अरुण यांनी या चित्रपटातील कोकणातील वृद्धाची भूमिका जशीच्या तशी उठवली आहे. त्यांच्या अभिनयातील सच्चेपणा व सहजता हे गुण त्यांनी भूमिकेच्या व व्यक्तिरेखेच्या बारकाईने केलेल्या अभ्यासात आढळतात. ‘श्‍वास’सारखा वास्तववादी चित्रपट चालणार नाही अशी चर्चा चित्रपटसृष्टीत चालू असतानाही अरुण नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेटाने हा चित्रपट केला व तो ऑस्करसाठी गेला, हे विशेष. याशिवाय त्यांनी ‘काय द्याचं बोला’ (२००४), ‘अकल्पित’, ‘क्षण’, ‘साडे माडे तीन’, या चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. त्यांनी दूरदर्शनवरील ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘गहिरे पाणी’, ‘अवघाचि संसार’ 'रेशीमगाठी', 'का रे दुरावा', 'लाइनलाइन',  इ. मालिकांमध्येही काम केलेले आहे. ‘टाईम प्लीज’, 'उशीर होतोय', 'रात्रआरंभ' अशी काही नाटकंही त्यांनी केली आहेत. 

        कलाकृतींची अभ्यासपूर्ण निवड, त्यावर केलेले दिग्दर्शीय काम व भूमिका साकार करण्यापूर्वी भूमिकेचा केलेला अभ्यास या सर्वांमुळे अरुण नलावडे यांचे चित्रपट निश्‍चितपणे यशस्वी ठरतात.

         - डॉ. अर्चना कुडतरकर

नलावडे, अरुण जनार्दन