नळकांडे, अरविंद नारायण
अरविंद नारायण नळकांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे झाला. त्यांनी बी.एस्सी पदवी संपादन केली . त्यांची शेतकरी चळवळ व जल-मृदा संधारण कार्य शेतकऱ्यांमध्ये अत्यंत प्रचलित झालेले दिसते . त्यांना ‘इंटरनॅशनल कमिशन ऑफ इरिगेशन व ड्रेनेज’ या संस्थेचा जागतिक पुरस्कार मिळाला. कमी खर्चात शेतीमधून जास्त उत्पन्न काढणे आणि पाण्याचा सुयोग्य वापर करणे हे त्यांचे काम शेतकऱ्यांमध्ये अत्यंत प्रचलित आहे. नळकांडे यांचे मुख्य काम जल संधारण व पाणलोट क्षेत्रामध्ये दिसून येते . ते आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून शेतीला पाणी देण्यासाठी त्याचा वापर करतात. या शेततळ्यामध्ये जमा होणारे पाणी पावसाचे किंवा उताराने येऊन जमलेले असते, त्यामुळे पाणी आणण्यासाठी खर्च होत नाही. नळकांडे यांची शेती दर्यापूर तालुक्यातील धामोडी गावामध्ये असून हा भाग खारपाणपट्टात येतो. या जमिनीचे वैशिष्ट्य असे की, उन्हाळ्यामध्ये मोठमोठ्या भेगा तिला पडतात आणि शेतकरी नेहमीच्या सवयीप्रमाणे उन्हाळ्यात नांगरणी करतात. त्यामुळे या खोल भेगा बुजून जातात. जूनमध्ये पहिला पाऊस आला, की ही जमीन फुलून जाते आणि पाणी खाली झिरपत नाही.
उन्हाळ्यात नांगरणी केल्यामुळे असे होते हे जाणून नळकांडे यांनी खारपाणपट्ट्याचा विकास करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना या जमिनीत नांगरट करू नका, अशा सूचना दिल्या आणि स्वतःही त्या अमलात आणल्या. नांगरट न केल्यामुळे शेतातील मोठमोठ्या भेगांमधून पाणी जमिनीत गेल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते आणि पाण्याबरोबरच काडी-कचरा जमिनीमध्ये जाऊन कुजून जातो. असे केल्यानंतर जमिनीवर उताराच्या विरुद्ध बांध टाकून पाणी अडवले जाते आणि याच पद्धतीने खालच्या बाजूला शेततळी तयार केली जातात. सामूहिकरीत्या केलेल्या शेततळ्यामध्ये पाणी साठते व खालच्या बाजूला विहिरीचेही पुनर्भरण होते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. अशा रीतीने कमी खर्चामध्ये पाण्याचे नियोजन केले जाते आणि जर पाऊस वेळेवर आला नाही, तर साठलेले पाणी वापरून झाडांना जगवले जाते. त्यामुळे पिकाची हानी टळते.
‘सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रिकल्चर आणि अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रिज’ या संस्थेने नळकांडे यांचे ‘प्रोड्यूसिंग मोअर विथ लेस रिसोर्स सक्सेस स्टोरीज ऑफ इंडियन ड्रायलँड फार्मर्स’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी शेतामध्ये उताराला आडवी पेरणी करून उत्पादनवाढीचा प्रयोग धामोडी येथे केलेला आहे. त्यांनी या गावातील सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अशाच प्रकारची पेरणी करण्यासाठी उद्युक्त केले. त्यांची शेतकऱ्यांना समतल बांधासाठी कंटूर आखून देण्यात मदत झाली आणि त्यामुळे संपूर्ण गाव जमिनीची धूप कमी करू शकले. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासही मदत झाली. पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी त्यांनी छोटीछोटी शेततळी तयार करून शेतकऱ्यांचा पिकवाढीसाठी फायदा करून दिला. नळकांडे यांची यशोगाथा कृषी खात्याच्या पुणे येथील ‘शेतकरी’ मासिकाने मे २००७ मध्ये प्रकाशित केली .