Skip to main content
x

नरिमन, फली सॅम

फली सॅम नरिमन यांचा जन्म म्यानमारची (पूर्वीचा ब्रह्मदेश) राजधानी यांगॉन (रंगून) येथे झाला. त्यावेळी ब्रह्मदेश हा ब्रिटिशांकित भारताचाच एक भाग होता. त्यांचे वडील सॅम हे न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनीच्या रंगून शाखेचे व्यवस्थापक होते.

फली यांचे सातव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण रंगूनलाच झाले. त्यानंतर १९४१मध्ये जपान दुसर्‍या महायुद्धात उतरला आणि जपानी हवाई दलाच्या विमानांनी रंगूनवर बाँबहल्ले सुरू केले. तेव्हा नरिमन कुटुंबाने अगोदर उत्तर ब्रह्मदेशातील मंडाले या शहरी स्थलांतर केले. नंतर रंगून पडल्यानंतर तेथे परत जाणे शक्य नसल्याने ही मंडळी आणखी उत्तरेकडे निघाली आणि रस्ते, जंगले, नद्या-नाले पार करीत, खडतर प्रवास करून भारतात आधी इंफाळ येथे पोहोचली आणि पुढे दिमापूर व कलकत्तामार्गे दिल्लीला पोहोचली. काही काळ दिल्लीत राहिल्यानंतर फली यांना शिमला (सिमला) येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये ज्युनियर केंब्रिजच्या वर्गात प्रवेश मिळाला. अगोदर ज्युनियर केंब्रिज आणि नंतर १९४४मध्ये सीनियर केंब्रिज या परीक्षा ते उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी फली मुंबईला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. १९४८मध्ये ते सेंट झेवियर्समधून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. फलींच्या वडिलांची इच्छा त्यांनी आयसीएसच्या परीक्षेस बसावे, अशी होती. परंतु फलींचा ओढा कायद्याकडे असल्याने त्यांनी त्यास नकार दिला आणि मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथून १९५०मध्ये ते एलएल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी अ‍ॅडव्होकेटची परीक्षाही उत्तीर्ण झाले. नोव्हेंबर १९५०मध्ये त्यांनी सर जमशेदजी कांगा यांच्या हाताखाली वकिलीस सुरुवात केली.

दोन दशकांहून अधिक काळ नरिमन यांना मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणेच मुंबईतील अन्य न्यायालये आणि पुणे व गोवा येथील न्यायालयांतही वकिलीचा अनुभव मिळाला. १९६७मधील प्रसिद्ध गोलकनाथ खटल्यात त्यांना सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याची संधी मिळाली. १९७२मध्ये त्यांची नियुक्ती अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल म्हणून झाल्यावर ते दिल्लीला गेले. वृत्तपत्रीय कागदावरील नियंत्रणाविरुद्ध टाइम्स ऑफ इंडियाने केंद्र सरकारविरुद्ध केलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात नरिमन यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. या याचिकेवरील न्यायालयाचा बहुमताचा निर्णय सरकारच्या विरुद्ध गेला. जून १९७५मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यावर तिच्या निषेधार्थ नरिमन यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

त्यानंतर नरिमन यांनी अनेक खटले लढवले. त्यांना अनेक सन्मान मिळाले. १९९१मध्ये बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९९१मध्येच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९९५मध्ये इंटरनॅशनल बार असोसिएशनच्या ह्युमन राईटस् इन्स्टिट्यूटच्या काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २००१ मध्ये आणि नंतर पुन्हा २००४मध्ये त्यांची याच इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते इंटरनॅशनल बार असोसिएशनचेही सक्रिय सदस्य आहेत.

१९९९मध्ये नरिमन यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी सहा वर्षांसाठी नियुक्ती केली. या सहा वर्षांत त्यांनी राज्यसभेच्या कामकाजात सक्रियपणे भाग घेतला. बिफोर मेमरी फेडस्..हे त्यांचे उद्बोधक आणि वाचनीय आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

डिसेंबर १९८४मध्ये भोपाळ येथे युनियन कार्बाइडच्या कारखान्यात गॅस-गळती होऊन जी दुर्घटना घडली, त्या संबंधीच्या खटल्यात नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयात युनियन कार्बाइडची बाजू मांडली होती. परंतु नंतर मात्र या कंपनीचे वकीलपत्र घेतल्याबद्दल त्यांनी जाहीर खेद व्यक्त केला. नरिमन यांना इंग्रजी साहित्याची आवड आहे. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. ते उत्तम वक्ते आहेत. सध्या फली नरिमन यांचे वास्तव्य नवी दिल्ली येथे आहे.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ :
संदर्भ : १. नरिमन, फली एस.; ‘बिफोर मेमरी फेडस्’; हे हाऊस इंडिया, २०१०.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].