Skip to main content
x

नृसिंहसरस्वती, महाराज

नृसिंहसरस्वती महाराज यांना भाविक दत्तावतारी संत मानतात. अनेक वर्षे भारतभ्रमण करून अखेरीस ते १८७३ साली आळंदीस आले व पुढे कायमचेच आळंदीकर बनून राहिले. आळंदी येथे येण्यापूर्वी ते अनेक वर्षे पंढरपूरमध्येही वास्तव्य करून होते. नृसिंहसरस्वती महाराज म्हणजे विद्वत्ता, योगसामर्थ्य आणि रसाळ भजन यांचा सुरेख संगम होता. आळंदीला येताच त्यांनी सर्वांना आपल्या भजनप्रेमाने वेडे करून टाकले. भजनाच्या जोडीला ते ज्ञानेश्वरी, नाथभागवत या ग्रंथांवर प्रवचन करीत. त्यांची निरूपणपद्धती सहज, सोपी व आकर्षक होती. त्यांच्या नित्य प्रवचनाला आळंदीकर भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत होते. आळंदीत त्यांनी नवचैतन्य निर्माण केले. शांकरभाष्य, उपनिषदे यांचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्याकडे दर्शनास येणार्‍या भाविकांना ते संत ज्ञानेश्वर समाधीच्या दर्शनास पाठवीत, अशी त्यांची संत ज्ञानदेवांवर अपार श्रद्धा होती.

त्यांनी इंद्रायणीला सुंदर घाट बांधला, तसेच गोपाळपूर भागात श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर बांधले. संत ज्ञानदेव समाधी मंदिरात संत मुक्ताबाई यांचे मंदिर बांधले. १८८१ मध्ये त्यांनी मुक्ताई मंदिराचे काम पूर्ण केले. या मंदिराचा तुळशीवृंदावनाजवळचा एक खांब त्यांनी स्वत:च्या श्रमदानाने बांधला. त्यांनी इंद्रायणी नदीकिनारी एका ओळीत चौदा वृक्षांचे रोपण केले. नृसिंहसरस्वती महाराजांनी १८८१ मध्ये संत ज्ञानेश्वर रथोत्सव सुरू केला. त्यासाठी त्यांनी सुंदर रथ तयार करून घेतला. फुलगाव येथे त्यांच्या प्रयत्नांनी व प्रेरणेने माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. या कार्यात महाराजांचे भक्त श्री धोत्रे यांनी पुढाकार घेतला होता.

महाराजांनी अनेक प्रकारची काव्यरचना केलेली आहे. त्यांनी रचलेले श्रीज्ञानेश्वराष्टकस्तोत्रम्अत्यंत प्रसिद्ध आहे, तसेच त्यांचे ऋणमोचनस्तोत्रभाविकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेले आहे. माणूस जन्माला येतो ते आई-वडिलांचे व भूमीचे ऋण घेऊनच. अशा अनेक ऋणांतून मुक्त होण्याचा प्रयत्न हे त्याचे आद्य कर्तव्य आहे अशी महाराजांची शिकवण होती. त्यासाठी त्यांनी ऋणमोचनस्तोत्रलिहिले.

भाविकांमध्ये जनजागृती केली; तसेच महाराजांनी रचलले गोविंदाष्टकम्’, ‘गुरुपरंपरास्तोत्रसुद्धा भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध असून आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे ही स्तोत्रे नित्यनेमाने म्हटली जातात. नृसिंहसरस्वती महाराजांचा शिष्यवर्ग खूप मोठा असून तो देशभर पसरलेला आहे. संत अण्णासाहेब पटवर्धन, संत देव मामलेदार, श्री राधाकृष्ण स्वामी, श्री विष्णुमहाराज रहिमतपूर, श्री सच्चिदाश्रम स्वामी-लोणार, श्री आपदेव महाराज-नागपूर हे महाराष्ट्राच्या संत मंडळीतील मान्यवर संत नृसिंहसरस्वती महाराजांचे शिष्य होत. महाराजांना अक्कलकोट स्वामी समर्थांची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती. सिद्धींचा त्याग करून भाविकांना आत्मज्ञान देण्याचा संदेश स्वामींनी महाराजांना दिला. १८६२ ते १८७४ अशी बारा वर्षे महाराजांचे वास्तव्य पंढरीत होते. तेथे त्यांना आळंदीस जाऊन ज्ञानदेवांच्या क्षेत्रात राहण्याचा विठ्ठलाचा दृष्टान्त झाला व पुढे १८७४ ते १८८६ पर्यंत महाराजांनी आळंदीत वास्तव्य केले. आळंदीतही अनेक प्रकारची समाजोपयोगी कार्ये करून त्यांनी १८८६मध्ये इंद्रायणी काठी योगसमाधी घेतली.

विद्याधर ताठे

नृसिंहसरस्वती, महाराज