नवाथे, चित्रा राजा
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत १९५० च्या दशकात दुर्गा खोटे, शोभना समर्थ, सुलोचना अशा दिग्गज अभिनेत्रींनी आपले साम्राज्य उभे केले होते. या मराठी तारकांच्या प्रभावळीत कोकणातील आचरा येथून आलेल्या कुसुम आणि कुमुद शांताराम सुखटणकर या दहाबारा वर्षांच्या बहिणीदेखील मराठी-हिंदी चित्रपटात, १९४५ च्या दरम्यान, चित्रपटातील वाढदिवस, लग्न, शाळा अशा समूहदृश्यांमधून बालकलाकार म्हणून झळकत होत्या. कुसुम आणि कुमुद या दोन बहिणी म्हणजे पुढे मराठी-हिंदी चित्रपटात गाजलेल्या अनुक्रमे चित्रा आणि रेखा. ग.दि. माडगूळकरांनी ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटाच्या वेळी कुसुमचे ‘चित्रा’ आणि कुमुदचे ‘रेखा’ असे नामकरण केले.
मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार. मुंबईत भवानीशंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे ७वीपर्यंतचे शिक्षण झाले आणि आर्थिक परिस्थितीमुळे चित्रा यांना विद्यामंदिराऐवजी चित्रमंदिरात प्रवेश करावा लागला. त्यांनी चित्रपट स्टुडिओचा उंबरठा ओलांडला आणि कलावंत म्हणून आपल्या वाट्याला आलेले काम यशस्वी करून दाखवले आणि ग.दि. माडगूळकरांनी दिलेले ‘चित्रा’ हे नाव सार्थ करून दाखवले.
कुसुम सुखटणकर म्हणजे चित्रा यांचे वडील मुंबईत एका कार्यालयात नोकरी करीत. आई घरीच असे. त्या वेळी दशावतार, मेळे, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, नारळीपौर्णिमा, दहीकाला अशा सण-उत्सवांतून कुसुम, कुमुद या बहिणीदेखील नृत्य, अभिनय पेश करत असत. त्यांचे वडील शांताराम सुखटणकर हेदेखील अधूनमधून रघुवीर सावकार, भार्गवराम आचरेकर, वसंत आचरेकर या आपल्या गाववाल्या स्नेहयांच्या मैत्रीमुळे त्यांच्या नाटकातून भूमिका करत असत. हीच कलेची पार्श्वभूमी लाभलेल्या या दोन चुणचुणीत आणि देखण्या मुलींचा अभिनय, त्यांचे नृत्यातील कसब पाहून त्यांना बालकलाकार म्हणून कामे मिळू लागली. त्या काळात त्यांना दिवसभराच्या कामासाठी रु. ५ मिळत. पुढे त्यांना होमी वाडियांच्या फिल्म कंपनीत प्रॉडक्शन इन्चार्ज असलेल्या तळपदे यांच्या ओळखीतून कामे मिळू लागली. विशेषतः संत चित्रपटात त्यांनी बऱ्याच भूमिका केल्या. बाबूराव पै यांच्या फेमस स्टुडिओमध्येही त्यांना कामे मिळू लागली. विश्राम बेडेकर, गोविंद घाणेकर, दिनकर पाटील, राजा परांजपे, ग.दि. माडगूळकर, राम गबाले अशा प्रथितयश आणि बड्या चित्रपट निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या पारखी नजरेतून त्या सुटल्या नाहीत. याच वेळी हंसा वाडकर या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीने ‘या दोन बहिणींना मोठी कामे द्या, त्या पेलतील’ असे राजाभाऊ परांजपे यांना सुचवले. त्यानुसार १९५१ साली ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रा यांना नायिका म्हणून मिळालेला पहिला चित्रपट होता. त्यांचे नायक होते विवेक. तो खूपच गाजला. त्यानंतर चित्रा यांनी ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘देवबाप्पा’, ‘गुळाचा गणपती’, ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘कोरीची पायरी’, ‘भैरवीर’, ‘छत्रपती शिवाजी’ अशा सुमारे पंचवीस चित्रपटांमधून मुख्य भूमिका साकारल्या. त्या काळातील विवेक, राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत अशा अभिनेत्यांसह त्यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला होता. चित्रा यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ या चित्रपटात काम केले. ‘टिंग्या’ हा चित्रपट त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केला, तो आजीची भूमिका साकारून. चित्रा यांच्या अभिनयातील विशेषता होती ती, त्यांच्यातील शहरी नायिकेला आवश्यक असलेले व्यक्तिमत्व आणि सौंदर्य. कोकणातील असूनही मुंबईसारख्या आधुनिक शहरात वाढल्यामुळे आपसूकच येणारा शहरी स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वास त्यांच्या भूमिकेतून दृश्यमान होत असे आणि त्यामुळेच श्रीमंत बापाची मुलगी, स्वाभिमानी स्त्री असा बाज असलेल्या भूमिकांसाठी त्यांच्याकडे पाहिले जात असे. म्हणूनच त्यांचा चेहरा शहरी नायिकेसाठी योग्य असा गणला जाई. चित्रा यांनी गुरू पार्वतीकुमार, सचिन शंकर यांच्याकडून नृत्यकला शिकून घेतली होती.
राज कपूर यांच्या ‘आह’ चित्रपटात सहदिग्दर्शक म्हणून राजा नवाथे काम करत होते. त्यातील एका गाण्यातील नृत्यात चित्रादेखील होत्या. तेथेच राजाभाऊ नवाथे यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि परिचयाचे रूपांतर विवाहबंधनात झाले. लग्नानंतर चित्रा यांनी चित्रपटातील कामे कमी केली आणि त्या गृहिणी बनल्या. परंतु अभिनयाची आपली आवड लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटानिया बिस्किटच्या जाहिरातीतील आजी साकारली. ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
आपला स्वतंत्र चाहता वर्ग चित्रा यांनी निश्चितपणे निर्माण केला होता. त्यामध्ये अनेक साहित्यिकांसह सर्वसामान्यांमधील असंख्य चाहते होते आणि आजही आहेत. ‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’, ‘करू देत शृंगार’, ‘कुणी छेडिली तार’, ‘इथेच टाका तंबू’, ‘नाच रे मोरा’ अशा कित्येक गाण्यांनी आजही चित्रपटरसिकांना नोस्टॅल्जिक केले आहे. मराठी चित्रपटांबरोबरच चित्रा यांनी काही नाटकेही केली आहेत. ‘तुझे आहे तुजपाशी’तील उषा, ‘लग्नाची बेडी’तील यामिनी इत्यादी भूमिकांवर त्यांनी आपली छाप उमटवली होती. मराठी नाट्य-चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी, गुजराथी चित्रपटांतही कामे केली.
चित्रा यांच्या चित्रपट-नाट्य क्षेत्रातील दखल वेळोवेळी घेण्यात आली. रसिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करून प्रेम व्यक्त केले आहेच, परंतु विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवण्यात आले आहे. राजा परांजपे प्रतिष्ठान, पुणे; अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ; नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल या पुरस्कारांसह ४५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१० सालचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ‘टिंग्या’ चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले .