Skip to main content
x

मारिओ, मिरांडा

मारिओ जो कार्लो दो रोझारिओ द ब्रिटो मिरांडा

          व्यंगचित्रकार आणि प्रादेशिक जनजीवनाची तसेच शहरी जीवनाची वैशिष्ट्ये टिपणारे भाष्यकार मारिओ मिरांडा यांचा जन्म दमन येथे झाला. त्यांचे वडिल पोर्तुगीजांची सत्ता असलेल्या दमन गावचे प्रशासक होते.

मारिओ मिरांडा यांना लहानपणापासून चित्रे काढण्याची ऊर्मी होती. (त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी काढलेली चित्रे शेवटपर्यंत जपून ठेवली होती.) पुढे शाळेत आणि नंतर कॉलेजात गेल्यावर त्यांना डायरी रेखाटायची सवय लागली. शब्दांपेक्षा त्यांचे रेषेवर अधिक प्रेम होते. म्हणून रोज एक तरी चित्र डायरीत रेखाटल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यांनी १९४७ पासूनच्या अनेक डायऱ्या जपून ठेवल्या होत्या. आजूबाजूचे अनेक पक्षी, प्राणी, माणसे त्यांनी अक्षरशः ‘रेषाबद्ध’ करून ठेवली. त्यांच्या मते, त्यामुळे त्यांना स्वतःच्याच कामाची प्रगती तपासता आली. हा दैनंदिन सराव त्यांना खूप काही देऊन गेला. विशेषतः या डायऱ्या पाहूनच त्यांना प्रथम ‘करंट’ आणि नंतर ‘टाइम्स’मध्ये नोकरी मिळाली.

या डायरीत रेस्टॉरंट्स, हॉटेल्सची रेखाटने आहेत. काहींची कॅरिकेचर्स आहेत. अनेकांच्या चेहर्‍यावरचे हावभाव (राग, उत्सुकता, हास्य, कंटाळा, भांडण वगैरे) त्यांनी स्पष्टपणे रेखाटले आहेत. कुत्र्या-मांजरांचे चेहरे रेखाटतानाही त्यांतील हावभाव स्पष्टपणे जाणवतात. हीच कदाचित त्यांची व्यंगचित्रकार होण्याची सुरुवात असावी असे दिसते. काही रेखाटनांत तर चाळीस-पन्नास चेहर्‍यांची गर्दी दिसते. मारिओंना असलेले गर्दी रेखाटण्याचे आकर्षण तेव्हापासून असावे. ही सारी चित्रे पेनने रेखाटली आहेत.

आज ‘मारिओ’ म्हटल्यावर आपल्यापुढे जी चित्रे उभी राहतात, त्या साऱ्यांचे मूळ या डायरी स्केचेसमध्ये आहे. या काळात त्यांनी रेखाटलेली असंख्य पोर्ट्रेट थोडीशी कॅरिकेचरिंगकडे झुकलेली आहेत. या रेखाटनांतून मारिओंच्या लहानपणाचा व तरुणपणाचा काळ व गोव्यातील तत्कालीन वातावरण उभे राहते. चर्च, पाद्री, प्रार्थना, तरुणांचे एकमेकांशी वागणे, रेस्टॉरंटमधील वातावरण, व्हायोलिनवाले मास्तर आणि गाणारी लहान मुले, वाइनचे ग्लास हातात घेतलेले स्त्री-पुरुष, आठवड्याचा बाजार, मासे विकणाऱ्या कोळणी वगैरे वगैर

गोव्यात असताना मारिओंना फक्त कोकणी व पोर्तुगीज भाषा येत होती. इंग्रजीचा संबंध आला तो बंगलोरला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी १९४३ मध्ये मुंबईत प्रवेश केला. केवळ एक दिवस सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घालवल्यावर त्यांनी ताबडतोब सेंट्स झेवियर्समध्ये बी.ए आटर्सला प्रवेश घेतला. याला दुसऱ्या महायुद्धाची अखेर आणि स्वातंत्र्याची चळवळ ही सामाजिक पार्श्वभूमी होती. या साऱ्यातूनही त्यांनी स्केचिंग थांबवले नव्हते. पदवी मिळाल्यावर मुंबईत अनेक दिवस नोकरी मिळत नव्हती, तेव्हा ‘मुंबई’ विषयावरची पोस्टकार्ड स्केचेस विकून त्यांनी काही दिवस काढले. मुंबई सोडून ब्राझील व नंतर पोर्तुगाल किंवा पॅरिसला जायचेच त्यांच्या डोक्यात होते; पण तेवढ्यात ‘करंट’ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला आणि वर्षभराने ‘टाइम्स’नेही त्यांच्यासाठी दरवाजा उघडला. यथावकाश मिस फोन्सेका, गोडबोले, मिस निंबूपानी, बंडलदास इत्यादी पात्रांचा जन्म झाला व मुंबईला आणखी एक व्यंगचित्रकार मिळाला.

मारिओंनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा कालखंड मुंबईत घालवला. मुंबईची विविध रूपे त्यांनी रेखाटनाच्या माध्यमातून चितारली. इथली गर्दी, पाऊस, रेल्वे प्रवास, दोन इमारतींतील क्रिकेट, रस्त्यावरची प्रचंड रहदारी, घोड्यांच्या शर्यती, समुद्रकिनारे, पाणीपुरी, मोडकळीला आलेल्या चाळी, बॉलिवुड, दिवाळी -ख्रिसमससारखे सण,  उच्चभ्रू नाच-पाटर्या इत्यादी असंख्य विषयांवर मारिओंनी व्यंगचित्रे काढली आहेत.

मुंबईप्रमाणेच गोव्यातील वातावरणावरही मारिओंनी असंख्य नर्मविनोदी रेखाटने केली आहेत. मारिओंच्या काही चित्रांतून चक्क कोलाहल ऐकू येतो. उदाहरणार्थ, त्यांनी मार्केटचे काढलेले चित्र. वास्तविक, गोव्यातील कुठल्याही गावात सकाळच्या वेळी बाजारात दिसणारे प्रसंग यात आहेत. प्रसंग अगदी साधे आहेत; पण मारिओंनी या चित्रात अंदाजे (!) चाळीस स्त्री-पुरुषांची अर्कचित्रे काढली आहेत. पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा आणि हावभावही वेगळे व प्रसंगाला साजेसे आहेत. जणूकाही मारिओंकडे व्यंगचित्रे काढणारा कॅमेराच आहे!!

या चित्रात आरडाओरडा करणाऱ्या कोळिणी आहेत. त्यांच्याशी घासाघीस करणारी गिऱ्हाईक आहेत. मासा सायकलच्या कॅरिअरला लावून जाणारा गृहस्थ आहे (विशेष म्हणजे आपण सुस्थळी पडणार असल्याचा आनंद व समाधान प्रत्येक माशाच्या चेहऱ्यावर आहे!) खिशात ‘क्वार्टर’ ठेवलेले आंबटशौकिन गिऱ्हाईक आहे, तर गिऱ्हाईकाची वाट पाहणाऱ्या तरुण कोळिणींबरोबरच ठसठशीत चेहऱ्याची अननसवालीही आहे; तिचे दीड वर्षांचे मूल तिथेच खेळतेय, तर सहा वर्षांची मुलगी अबोलीच्या वेण्या विकतेय; मख्ख आंबेवाला दर कमी करत नाही म्हणून कावलेले मुंडासेवाले आपल्या नातवासह दिसताहेत. प्रत्येक पात्राची वेशभूषा अस्सल गोवेकराची आहे. केळीचे घड, सुपाऱ्या, सुकी मासळी लटकवलेली आहे; कोणाच्यातरी डोक्यावरच्या टोपलीत फणस, छत्री, पत्र्याचे रिकामे डबे आहेत, मधूनच डोकावणारी कुत्री व वळचणीला बसलेला कावळासुद्धा आहे. या साऱ्या रेखाटनात एक विलक्षण जिवंतपणा आहे आणि म्हणूनच या चित्राकडे नीट पाहिले तर मार्केटमधला कोलाहल ऐकूसुद्धा येतो ! मारिओंची हीच तर खरी खासियत आहे.

मारिओंनी असंख्य परदेश प्रवासही केले. त्यावर काढलेल्या शेकडो रेखाटनांची प्रदर्शनेही जगभर भरविली गेली आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री (१९८८), पद्मभूषण (२००२) व पद्मविभूषण (मरणोत्तर २०१२) या पुरस्कारांनी सन्मानित केलेे.

एकूणच मारिओ मिरांडा यांची व्यंगचित्रे अविस्मरणीय आहेत. मुंबईतला अमराठी उच्चभ्रू वर्ग कसा आहे हे मराठी माणसाला मारिओ मिरांडांच्या चित्रांमुळे कळले, असे थोडे गमतीने म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. मारिओ यांचे २०११ मध्ये गोव्यातील लाहोलिम या त्यांच्या गावी निधन झाले.

- प्रशांत कुलकर्णी

मारिओ, मिरांडा