Skip to main content
x

पाचलेगावकर, नरसिंह राजाराम

पाचलेगावकर महाराज

     रसिंह राजाराम पाचलेगावकर यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येेथे झाला. एकदा परमहंस परिव्राजकाचार्य श्री.माधवाश्रम सरस्वती स्वामी, कुलकर्णी यांच्या घरी आले व त्यांनी नरसिंहाचा ऋणानुबंध कथन करून आपला संप्रदाय आणि मुलाचा कार्यभाग लक्षात घेऊन त्याचे नाव ‘संचारेश्वर’ ठेवले व ते आपल्या ठायी निघून गेले. बाल नरसिंह चंचल, चपळ व खोडकरही होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याची मुंज झाली. सवंगड्यांना जमवून भजन-पूजन करण्यात व खेळ खेळण्यात तो दंग असे. निसर्गाशी तल्लीन होणे, भावसमाधी लावून बसणे हा त्याचा छंद होता. नरसिंह बाराखड्या आणि पंधरावा पाढा शिकला आणि मग त्याने शाळेला रामराम केला.

     नरसिंह निर्भय, तसाच धाडसी होता. दुर्गुणांची चीड असल्याने त्याने गावठी दारू विकणाऱ्याच्या दारूत एकदा माती कालवली व दोन दिवस गावात कडक दारूबंदी घडवून आणली. नवव्या वर्षी त्याने नागपंचमीला आईसमोर खरा नाग आणून ठेवला. आई घाबरली, तेव्हा नरसिंहाने स्वत: त्याची पूजा केली.

     ओंढे नागनाथचे ज्योतिर्लिंग व नर्मदातीरीच्या ओंकारेश्वराच्या पूजेच्या वेळी त्याने गळ्यात जिवंत नाग घातले. त्यामुळे भाविक व चिकित्सक त्याच्यापुढे नतमस्तक होत. या बालकामध्ये काही अलौकिक, विलक्षण सामर्थ्य आहे, असे लोकांना वाटे. प्रबळ मानसिक शक्तीच्या साहाय्याने नरसिंहाने अनेक सर्पदंशग्रस्तांना जीवदान दिले.

     गावच्या शंकर मंदिरासमोर रसरशीत निखाऱ्यावर चालण्याचे प्रयोग होत. अस्पृश्यता निवारण आणि अन्य प्रसंगी या बालमहाराजांनी हे प्रयोग केले. १९२८ साली पुण्याच्या डेक्कन मैदानावर साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या उपस्थितीत, हजारो लोकांसमोर या बालमहाराजांसमवेत शेकडो लोक धगधगत्या अग्नीवरून चालत गेले होते; परंतु कुणालाही इजा झाली नाही. बालमहाराजांच्या सामर्थ्यामुळे निखाऱ्यांची दाहकता बाधत नसे. अनेक व्याधिग्रस्त जनांच्या जीवनात त्यांनी सशास्त्र उपचाराने आनंद निर्मिण्याचे कार्य केले. ही सेवा ते विनामूल्य करीत.

     याच दरम्यान नरसिंहावर द्वितीय दत्तावतार श्री नरसिंह  सरस्वतींचा अनुग्रह झाला. सर्वसंग परित्यागासह ईश्वरचिंतनी राहण्याचा विचार नरसिंह यांच्या मनात तीव्र बनला.

     धाकट्या भावाची मुंज झाली तेव्हाच आपल्या मामांना त्यांनी अविवाहित राहण्याचा निश्चय बोलून दाखविला होता. ‘निर्वैर: सर्वभूतेषु’ हाच त्यांचा आचार व सर्वात्मभाव ही जीवननिष्ठा होती. आपले तन- मन- धन ईश्वरार्पण करून मानवमात्राचे कल्याण करणे ही त्यांची प्रेरक शक्ती ठरली. पाचलेगावी रुद्र - स्वाहाकाराचा संकल्प बोलून दाखवताच शेकडो लोक मदतीस आले. पाच दिवसांच्या यज्ञात कीर्तनकार, कथाकार, पुराणिक एकत्र जमले व पाचलेगावकर महाराजांनी धर्मप्रचार इच्छेनुसार साधला. त्यामुळे न्याय, नीती, समाज, राष्ट्र व धर्मासाठी जगण्याचे नवे विचार लोकांमध्ये पसरले. या प्रसंगी बाळ महाराजांचे वय अवघे तेरा वर्षे होेते.

     निजामाचे सरदार श्री. शिवराजबहादूर यांच्याकडून महाराजांना जी रोकड व जो नजराणा आला, ती सारी संपत्ती महाराजांनी गोरगरिबांना वाटली. निजामाने त्यांच्यासाठी अनेक सनदा दिल्या. पर्यटनात महाराजांनी श्री मुक्तेश्वराची पालखी काढली. ती पालखी सखाराम महाराजांच्या लोणीस (विदर्भ) पोहोचून परत येई. लोक या कार्यक्रमास अनेक गावांतून व शहरांतून येत.

     समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता, ब्रिटिशांचे अत्याचार, निजामाने षडयंत्र रचून हिंदूंना बाटवून मुसलमान करण्याचे कारस्थान हे सर्व पाहून महाराज व्यथित होत. जनता अन्यायाचा प्रतिकार करत नाही आणि भोळसट कल्पनांनी उदास, निराश व हताश झालेली पाहून महाराजांना क्लेश होत. त्यांनी परभणी जिल्ह्यात कळमनुरी येथे डिसेंबर १९२६ मध्ये विराट (संहिता स्वाहाकार) धर्मस्थळ महायज्ञ केला. त्या सोहळ्यात शेतकरी, कामकरी व अन्य जनसामान्य लोकांसह संत गाडगेबाबा, करवीरपीठस्थ जगद्गुरू शंकराचार्य स्वामी विद्याशंकर भारती (डॉ. कुर्तकोटी) हजर होते. पाचलेगावकरांच्या प्रभावाने असा सुंदर सोहळा संपन्न झाला म्हणून डॉ. कुर्तकोटींनी पाचलेगावकर महाराज (वय चौदा वर्षे) यांचा गौरव केला. यज्ञाच्या पूर्णाहुती प्रसंगीच महाराजांना असे वृत्त समजले, की स्वामी श्रद्धानंदांचा भारताच्या राजधानीत अब्दुल रशीद या मुसलमानाने खून केला.

     महाराजांनी खूप विचार करून लोकांच्या लक्षात आणून दिले, की ‘कुर्रान-ए-शरीफ’मधील आयात २,३,४,८,९ इत्यादी ठिकाणचा काही विशिष्ट भाग मुसलमान समाजात ही मनोवृत्ती निर्माण करण्यास कारणीभूत आहे. अन्यधर्मीय मूर्तिपूजक ‘काफर’ असून त्यांचा छळ करून त्यांना मुसलमान बनण्यास भाग पाडले, तर ते मोठे पुण्यकर्म, धर्मकार्य होय. त्यामुळे ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळतो. कुराणाची ही शिकवण यास कारणीभूत आहे.

     महाराजांनी भारत समर्थ व ऐश्वर्यसंपन्न करण्यासाठी विषमता नष्ट करून समर्थ रामदास व शिवछत्रपती यांचा आदर्श समोर ठेवायला हवा असे प्रतिपादन केले. त्यांनी युवक दले व व्यायामशाळा स्थापन केल्या.

    जून १९२८ मध्ये महाराजांनी डॉ.मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली विराट धर्मपरिषदेचे आयोजन केले, म्हणून निजामाने महाराजांना वीस वर्षांसाठी निजाम स्टेटमधून हद्दपार केले. महाराजांनी बॅ. सावरकरांची भेट घेतली. नागपूर ते कुरुंदवाड आणि मुंबई ते हैदराबाद असे दौरे काढले. महाराजांच्या लोकजागृतीच्या कार्याची प्रशंसा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी केली. १९३०-३२ च्या कायदेभंग चळवळीत महाराजांनी अज्ञातवासात राहून झंझावाती प्रचार केला. मोतीलाल नेहरू, डॉ.हेडगेवार, महात्मा गांधी, जिवाजीराव महाराज शिंदे,काकासाहेब राणे वगैरेंशी त्यांचा जवळचा संबंध होता. १९४६ मध्ये खामगाव येथे त्यांची पू.माधवाश्रम स्वामींशी भेट झाली. त्या वेळी माधवाश्रम स्वामी १२५ वर्षांचे होते. त्यांनी निर्वाणीची भाषा सुरू करून आपली सर्व संपदा महाराजांच्या हवाली केली. पाचलेगावकर महाराजांचे हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मुंबईला उपचारांसाठी नेले. परंतु, १६ ऑगस्ट १९८६ रोजी, वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी श्रीसंत पाचलेगावकर हे धगधगते अग्निकुंड शांत झाले.

 — वि.ग. जोशी

पाचलेगावकर, नरसिंह राजाराम