Skip to main content
x

पाडगावकर, मंगेश केशव

      मंगेश केशव पाडगावकरांचा जन्म वेंगुर्ले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव आत्माराम पाडगावकर. मंगेश पाडगावकरांच्या आई रखमाबाई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज ह्यांच्या कविता वाचून दाखवत असत. त्यामुळे बालवयातच पाडगावकरांना लय, छंद, वृत्त यांची जाण नकळत येत गेली. आपला मुलगा मोठा कवी व्हावा, असे आईचे स्वप्न होते. आईच्या काव्यप्रेमाची परिणती नवव्या-दहाव्या वर्षात पाडगावकरांच्या काव्यलेखनात झाली. पुढे मुंबईत त्यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण विल्सन हायस्कूलमध्ये व विल्सन कॉलेजमध्ये झाले. वा. ल. कुलकर्णींच्या अध्यापनाचा आणि सहवासाचा परिणाम संवेदनशील पाडगावकरांवर झाला. त्याचप्रमाणे भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर या सौंदर्यवादी कवींच्या काव्याचा प्रभाव पाडगावकरांवर पडला. १९४९ साली पुण्यात झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात त्यांनी सादर केलेली ‘करि माझ्या दीप युगाचा रे’ ही कविता ऐकून विठ्ठलराव घाटे यांनी ‘उद्याचा कवी’ ह्या शब्दांत पाडगावकरांची प्रशंसा केली. मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. परीक्षेत मराठी-संस्कृत विषयात सर्वप्रथम येऊन पाडगावकर अनुक्रमे तर्खडकर सुवर्णपदकाचे आणि चिपळूणकर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. 

       मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक (१९५०); ‘साधना’ साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक (१९५३); कीर्ती महाविद्यालयामध्ये फेलो (१९५७); आकाशवाणी मुंबई केंद्रावर मराठी कार्यक्रमाचे निर्माते (१९५७-१९६०/ १९६४-१९७०); मध्यंतरी सोमय्या आणि मातुःश्री मिठीबाई महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख (१९६०-१९६४); युनायटेड स्टेट इन्फर्मेशन सर्व्हिस (युसिस) येथे मराठी विभाग प्रमुख (१९७०-१९९०);  अशा प्रकारे वेगवेगळ्या आस्थापनांत नोकर्‍या केल्यानंतर १९९१पासून पूर्णवेळ लेखन-व्यवसाय त्यांनी स्वीकारला.

       पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पाडगावकरांच्या स्वतंत्र काव्य निर्मितीला खरी सुरुवात ‘जिप्सी’ (१९५३) या संग्रहापासून झाली. पाडगावकरांच्या समग्र कवितेचे प्रामुख्याने भावकविता, राजकीय-सामाजिक विषयांवरील कविता व गीतकाव्य असे तीन टप्पे होतात. याशिवाय नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना पाडगावकरांनी केली .

     ‘निंबोणीच्या झाडामागे’ (१९५६) ह्या पाडगावकरांच्या एकमेव लघुनिबंध-संग्रहातील लघुनिबंध काव्यानुभवाच्या जवळ जाणारे आहेत. एखादी निसर्गस्थिती किंवा मनोवस्था जेव्हा पाडगावकरांच्या हृदयाचा कब्जा घेते, तेव्हा त्यांची उदास, व्याकुळ आणि काव्यात्म भाववृत्ती लघुनिबंधातून प्रकट होते. पाडगावकरांनी काव्यात्म वृत्तीने व संवेदनशीलपणे केलेले लघुनिबंध-लेखन भावविवश, भाबडे वा कृत्रिम होत नाही.

     ‘धारानृत्य’ (१९५०) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर असलेला पूर्वसुरींचा प्रभाव कालांतराने कमी होत गेला. पुढे मंगेश पाडगावकरांच्या कवितेचा बहुआयामी विकास झाला. सौंदर्यवेधी पाडगावकरांनी स्वतःला वेगवेगळ्या रचनाप्रकारांतून व्यक्त केले. पाडगावकर सश्रद्ध आणि आशावादी कवी आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या आरंभीच्या कवितांतून येतो. निसर्गदृश्याची विविध चित्रे रेखाटण्याची त्यांची असोशी होती . त्यांच्या कवितेत भावानुभूतीचा आणि निसर्गसुंदरतेचा अपूर्व संगम झाला आहे. ‘जिप्सी’ (१९५३), ‘छोरी’ (१९५७), ‘उत्सव’ (१९६२) या संग्रहांत या समन्वयाचे प्रत्यंतर येते. ‘छोरी’ आणि ‘उत्सव’ यांमध्ये प्रामुख्याने प्रेमकवितांचाच समावेश केला आहे. कवी जितक्या तरलतेने प्रेमानुभव अनुभवतो, तेवढ्याच तरलतेने तो कवितेत व्यक्त होतो. भा.रा.तांब्यांपासून सुरू झालेला गीतकाव्याचा विकास नंतर बोरकर-पाडगांवकरांनी केला. पाडगावकरांची भावप्रकृती मुळातच गीतानुकूल आहे. पाडगांवकरांच्या अनेक भावकविता स्वररचनेत गाता येऊ शकणार्‍या असल्या, तरी त्यांच्या गीतांचा स्वतंत्रपणे विचार करता येतो. आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या पाडगांवकरांच्या गीतांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ (१९८६) या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. गझल हा काव्यप्रकार हाताळताना उर्दूतील रचनासंकेत पाडगावकरांनी स्वीकारले असले, तरी त्यांची गझल-निर्मिती एक बंधयुक्त आविष्कार ठरते. म्हणूनच ती पाडगावकरांची भावगीत सदृश रचनाही ठरते. गेय रचनांशी नाते असणारी पाडगावकरांची बोलगाणी म्हणजे त्यांच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण आहे. ‘बोलगाणी’ (१९९०) ह्या संग्रहातील मुक्तरचना बाल-कुमारांसाठी आहेत, असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात बोलगाणी प्रौढांच्या जीवनातील रटाळ, खोचक, मिस्कील अनुभूतींचा आविष्कार ठरली आहेत.

        बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ (१९६४), ‘बबलगम’ (१९६७), ‘चांदोमामा’ (१९९२), ‘सुट्टी एके सुट्टी’ (१९९२), ‘वेडं कोकरू’ (१९९२), ‘आता खेळा नाचा’ (१९९२), ‘झुले बाई झुला’ (१९९२), ‘अफाटराव’ (२०००).

       पाडगावकरांच्या १९६६ साली प्रसिद्ध झालेल्या एका काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘विदूषक’. निसर्गाचे विभ्रम टिपणार्‍या, सौंदर्यलोलुप पाडगावकरांमध्ये जीवनाकडे तिरकसपणे पाहणारा, आयुष्यातील विरोध-विसंगती न्याहाळणारा, राजकीय-सामाजिक जीवनातील सोंगा-ढोंगांवर प्रहार करणारा तत्त्वचिंतक ‘भाष्यकार’ आहे. ‘वात्रटिका’ मधून (१९६३) श्रोत्यांचा हास्यपूर्ण प्रतिसाद मिळवणार्‍या पाडगावकरांनी ‘उदासबोध’च्या (१९९४) रूपाने सद्यःकालीन वास्तवावर खोचकपणे टीका-टिप्पणी केली आहे. आणीबाणीनंतर १९७८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘सलाम’ ह्या काव्यसंग्रहाने पाडगावकरांची भावकवी म्हणून रूढ झालेली प्रतिमा पुसून टाकली. सौंदर्यजीवी असलेले कविमन समाजकारण व राजकारण यांच्या जंजाळात अडकलेल्या जनसामान्यांच्या वेदना पाहून व्यथित झाले आणि ‘सलाम’च्या रूपाने त्या व्यथेला अवसर मिळाला. राजकीय आणि सामाजिक जाणिवांचा आविष्कार करणारी आपली कविता कोणताही पक्ष, इझम किंवा झेंडा घेऊन उभी नसून ही कविता म्हणजे आपल्या जीवनविषयक दारुण अनुभवांबद्दलचे प्रांजळ चिंतन आहे, या कवीच्याच भूमिकेचा प्रत्यय देणारी ‘सलाम’मधील उपहासपर कविता लोकप्रिय ठरली.

      केवळ शब्दांशी बांधील राहून काव्यलेखन करणार्‍या पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’ ह्या लघुनिबंध संग्रहाखेरीज गद्यलेखन केले नाही. मात्र संतसाहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान यांत रस असलेल्या पाडगावकरांनी मीरा, कबीर, सूरदास ह्या मध्ययुगीन संत कवि-कवयित्रींच्या रचनांचे अनुवाद केले आहेत. वस्तुतः कवितेचा अनुवाद करणे बरेच अवघड असते. पण मीरेच्या आणि कबिरांच्या मूळ पदांचे अनुवाद पाडगावकरांनी मूळ आशयाला बाधा न आणता केले आहे. हे काव्यानुवाद व शेक्सपिअरच्या ‘द टेम्पेस्ट’, ‘ज्युलिअस सीझर’ व ‘रोमिओ अ‍ॅन्ड ज्यूलिएट’ ह्या नाटकांच्या अनुवादांना पाडगावकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावना त्यांच्या व्यासंगाची आणि परिश्रमशीलतेची साक्ष पटवतात. ‘बायबल: नवा करार’ (भाषांतर व मुक्त चिंतन) ह्या अनुवादात पाडगावकरांनी येशूच्या चरित्रकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना स्वतःच्या स्वतंत्र चिंतनाची आणि मर्मदृष्टीची जोड दिली आहे. पाडगावकरांची ‘बोरकरांची कविता’ (१९६०), ‘संहिता’ (विंदा करंदीकरांची निवडक कविता) ही दोन महत्त्वाची संपादने आहेत. १९४७-१९४८ च्या सुमारास प्रारंभ झालेले पाडगावकरांचे काव्यलेखन ‘आनंदऋतू’ (२००४), ‘सूर आनंदघन’ (२००४), ‘मुखवटे’ (२००६), ‘गिरकी’ (२००८) या संग्रहांद्वारे पुढे सुरू राहिले. उत्तरकाळातील काव्याने त्यांचा हा नवा प्रवासही अभिजात प्रतिभेचे दर्शन घडवणारा ठरला. मराठी नवकवितेच्या प्रवाहातील पाडगावकरांच्या कवितेचे स्थान स्वतंत्र राहिले. त्यांच्या आगे-मागे कवितालेखन करणार्‍या पु.शि.रेगे, इंदिरा संत, विंदा करंदीकर, वसंत बापट, नारायण सुर्वे या कवि-कवयित्रींच्या काव्यापेक्षा प्रयोगशील पाडगावकर आपल्या भावमधुर गीतरचना व प्रभावी काव्यवाचनामुळे ‘रसिकांचे कवी’ ठरले; अनेक सन्मान-पुरस्कार-गौरव यांचे मानकरी झाले.

    महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे पुरस्कार पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ (१९५३), ‘छोरी’ (१९५७), ‘बबलगम’ (बालगीत संग्रह), (१९६७) या काव्यसंग्रहांना लाभले आहेत. पाडगावकरांना १९९० साली ‘महाराष्ट्र गौरव पुरस्काराने’ तर २००८ साली ‘महाराष्ट्र भूषण’ ह्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. याशिवाय त्यांना दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे प्रदीर्घ साहित्यसेवेबद्दल ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (१९९४), ‘भैरूरतन दामाणी पुरस्कार’ सोलापूर (१९९४), कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे ‘जनस्थान पुरस्कार’ (२००३), ‘सलाम’ काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ (१९८०) असे विविध पुरस्कार मिळाले. आपले कविमित्र विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्या समवेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत काव्यवाचनाच्या निमित्ताने फिरले आणि त्यांनी मराठी गेय कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी त्यांनी परदेश प्रवासही केला.  पहिल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे (चिपळूण, १९९८) अध्यक्ष पाडगावकर होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून काव्यलेखनाला सुरुवात करून ऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ पासष्ट-सत्तर वर्षे पाडगावकरांनी निष्ठेने काव्यसाधना केली; ‘शब्दांशी आणि गाण्याशी सतत इमान’ राखले. मंगेश पाडगावकरांचे मराठी काव्यदालनातील हे लक्षणीय योगदान आहे.

 २०१५ साली त्यांचे निधन झाले. 

- वि. शं. चौघुले

पाडगावकर, मंगेश केशव