Skip to main content
x

पाध्ये, गणेश

णेश पाध्ये यांचा जन्म धुळे येथे झाला. त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती. गणेश आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील निवर्तले. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख या गावी मामांकडे राहून झाले. गणेश पाध्यांनी संस्कृत शिकावे अशी घरच्यांची इच्छा होती; पण त्यांचा ओढा संगीताकडे होता. त्यामुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडून ते बडोद्याला गेले. त्या वेळी बडोदा दरबारात फैज मोहम्मद आणि फतेह मोहम्मद हे दोघे गवई दरबार गायक म्हणून नोकरीत होते. गणेशपंतांनी त्यांची सेवा करून त्यांच्याकडून गायनविद्या मिळवली.

संत ब्रह्मीभूत बालकृष्णानंद स्वामी यांच्याकडून  पाध्यांनी टप्पा गायकीही शिकून घेतली. धृपद, धमार गायकीही अनेक गवयांकडून अत्यंत कष्टपूर्वक मिळवली. नंतर  ग्वाल्हेरला जाऊन उ. निसार हुसेन खाँ यांच्याकडून त्यांनी खास ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले.

या सर्व संगीत शिक्षणात एक तप घालवून ते पुण्यात आले. पुण्यातील पर्वती देवस्थानातील विष्णूच्या मंदिरात त्यांनी काही काळ गायनसेवा केली. कीर्तनकार हरिभाऊ कर्‍हाडकर, त्यांचे पुत्र शामराव पाध्ये, फडकेबुवा, हे त्यांचे मुख्य शिष्य. छोटा गंधर्वांना त्यांनी टप्पा गायकी शिकवली होती. 

गणेश पाध्ये एक उत्तम रचनाकारदेखील होते. त्यांच्या अनेक बंदिशींना पं.वि.ना.भातखंड्यांनी आपल्या क्रमिक पुस्तक मालिकांमध्ये स्थान दिले. याखेरीज औषध निर्मिती आणि सुगंधी तेल,अत्तरे वगैरे बनविण्यातही त्यांचा हातखंडा होता.

डॉ. सुधा पटवर्धन

पाध्ये, गणेश