Skip to main content
x

पाध्ये, काशीनाथ अनंत

बाबा पाध्ये

काशीनाथ अनंत उपाध्याय तथा बाबा पाध्ये हे धर्मसिंधुकार विद्वान लेखक आणि अठराव्या शतकाच्या शेवटी पंढरपूर क्षेत्राचे सर्वेसर्वा म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे मराठीत प्रचारात आला, असे पंढरपूरकर मानतात.  हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावचे. या वंशजांना संगमेश्वरमधील ७२ गावांचा अग्रहार (जोसीपण) दिलेले होते. मूळ पुरुष काशीनाथपंताना लोक सार्वभौम विद्वान मानत होते. त्यांना यज्ञेश्वर आणि अनंत अशी दोन मुले होती. पैकी यज्ञेश्वर धोैतमार्गात निष्णात ज्योतिषी होते आणि व्याकरणामध्ये पारंगत होते. अनंताचार्यांचा कल ईश्वरभक्तीकडे अधिक होता. त्यांच्यामध्ये सात्त्विक वृत्तीचे अनेक गुण होते. कोकणातील आपली जन्मभूमी सोडून अनंतभट्ट पंढपुरात श्रीविठ्ठल सेवेत दाखल झाले. त्यांना काशीनाथ उर्फ बाबा नावाचे चिरंजीव होते. वडिलांच्या मृत्यूनंतर बाबांनी पंढरपुरातच अध्ययन केले.

बाबांच्या २-३ रचना ज्या संस्कृतात आहेत, त्यांपैकी ‘धर्मसिंधु’, ‘विठ्ठलस्तवराज’, ‘विठ्ठल ऋग्मंत्रसार’ आणि ‘विठ्ठल भूषण ग्रंथ’ हे लोकांना माहीत झाले. पैकी शेवटचे तीन ग्रंथ लहान असून पुण्याच्या मराठी हस्तालिखित केंद्रात त्यांची हस्तलिखिते आहेत. शके १९१२ साली धर्मसिंधु रचला. जो अजरामर झाला. धार्मिक व्यवहारासाठी आवश्यक अशा सर्व विषयांचा विचार या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. हा ग्रंथ तयार करताना निर्णयसिंधु, पुरुषार्थ चिन्तामणि, कालमाधव हेमाद्रि, कालतत्त्वविवेचन, कौस्तुभ, स्मृत्यर्थसार या धर्मशास्त्रीय ग्रंथांचा परामर्श घेतला आणि कित्येक ठिकाणी स्वत:ला योग्य असा निर्णय पूर्वासूरींच्या मताविरुद्ध घेतला आहे. बाबा पाध्ये यांच्या धर्मसिंधुचा शास्त्रार्थ काशीपासून रामेश्वरापर्यंत आजही स्वीकारला जातो. बाबांचे बंधू विठ्ठलपंत पाध्ये यांनी हा ग्रंथ काशीला विद्वानांच्या अवलोकनासाठी नेला होता. वाराणसीच्या पंडित परिषदेसमोर ग्रंथ परीक्षणार्थ ठेवला. सर्व पंडितांनी ग्रंथ अधिकृत-शास्त्रीय-उत्तम असल्याचा निर्णय एकमताने दिला. विशेष म्हणजे या ग्रंथाची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली.

धर्मसिंधूचे तीन विभाग आहेत. पहिल्या व दुसऱ्यामध्ये, वर्षातील बारा महिन्यांत येणाऱ्या धर्मकृत्यांसंबंधी कालनिर्णयपूर्वक विचार-विमर्श केला आहे. तिसऱ्या विभागात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन उपविभाग आहेत. त्यांमध्ये सोळा संस्कार, नित्य-नैमित्तिक कर्मे, अग्निहोत्रादी विधी, मूर्तीची अर्चना, गृहारंभ, गृहप्रवेश, प्रवास, इत्यादी व्यावहारिक गोष्टसंबंधीही धार्मिक सल्ला त्यांनी दिला आहे. नंतर त्यांनी कलियुगाच्या अनुषंगाने वर्ज्य-अवर्ज्य गोष्टींचे सांगोपांग विवेचन केले आहे. चातुर्वर्ण्य, व्यक्तिजीवनातील ब्रह्मचर्यादी चार आश्रमांचे सांगोपांग वर्णन केले आहे. हा ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये असून त्याचे मराठीकरणही बापुशास्त्री मोघे यांच्याकडून करवून घेऊन जावजी दादाजी यांनी ग्रंथाचे मराठी रूपांतर ८४ वर्षांनंतर प्रसिद्ध केले. काशीनाथ-तथा बाबा पाध्ये यांचे हे कार्य समोर ठेवून गेल्या शतकात मुंबईचे महामहोपाध्याय पां.वा.काणे यांनीही असाच ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ नावाचा सात खंडाचा ग्रंथ इंग्लिशमधून लिहिला. तो पुढे भांडारकर संस्थेने प्रसिद्ध केला.

बाबांनी पंढरपुरात एक संस्कृत पाठशाळादेखील चालविली होती. पेशव्यांकडून या पाठशाळेला सालीना बाराशे रुपये असे द्रव्यानुदान दिले जात होते. बाबांच्या पाठशाळेत सोलापूरचे शाहीर राम जोशी दोन वर्षे संस्कृत शिक्षणासाठी राहिले होते, असे त्यांनी स्वत:च्या चरित्रात म्हटले आहे. त्यांच्या लावण्यांत २-३ क्षेत्रवर्णनपर संस्कृत लावण्या आढळतात. एका तमासगिराचे कीर्तनकारात रूपांतर करण्यात बाबांचा आशीर्वाद उपयोगी पडला. पुढे बारामतीला संतकवी मोरोपंत पराडकर यांच्या अनुग्रहाने ते केवळ कीर्तनकार पुराणिक बनले. त्यांनी शाहिरीचा डफ मोरोपंतांसमोर फोडून प्रतिज्ञा घेऊन तमासगिरी सोडली.

बाबा श्री विठ्ठलचे महान भक्त होते. वडिलांचा, अनंतरावांचा वारसा त्यांनी चालवला. विठ्ठल मंदिरातील नित्य आणि नैमित्तिक उपचारांना बाबांनी पद्धत घालून दिली. ती आज दीड-दोनशे वर्षांनंतरही तशीच चालू आहे. विठ्ठलासमोर सकाळ-संध्याकाळ स्वरचित संस्कृत आरत्या ते म्हणत. लोकांनी ही प्रथा उचलून धरली. बाबांची निष्काम सेवा, भक्ती आणि शिस्त यांमुळे ऐन मुसलमानांच्या त्रासात, उपद्रवात श्री विठ्ठलमूर्ती सुरक्षित सुखरूप राहिली. बाबांच्या एका संस्कृत विठ्ठल स्तोत्रात श्रीमूर्तीचे वर्णन करताना तिच्या छातीवर मंत्र असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या माढे गावातील विठ्ठलमूर्तीशी तिचे साम्य जुळले गेले. त्यावर मधल्या काळात बरीच चर्चा झाली.

बाबांची विद्वता आणि सदाचार यांमुळे पंढरपूर नगरवासीय त्यांना गुरुस्थानी मानीत. त्या वेळी विठ्ठलाखेरीज अन्य देवतांचे महत्त्व वाढू द्यायचे नाही, असा पंढरपूरकरांचा निश्चय होता. चंद्रभागातीरावर रास्तेवाड्यासमोर तुका विप्राच्या वाड्यात दत्तमूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न काही रामदासी भक्तांनी केला. त्यावर पंढरपूरवासीयांनी बहिष्कार टाकला. या भक्तांना उपवास घडला, भिक्षाच मिळाली नाही. पुढे विठ्ठलाच्या साक्षात्काराने बाबांनी वाद सोडवला. दत्तमूर्ती उभी राहिली. एकमुखी शालिग्रम दगडाची सुंदर मूर्ती पंढरपूरचे वैभव ठरले. (पाहा - सेतुमाधवराव पगडी: समर्थ रामदास आणि संप्रदाय)

पंढरपुरात आल्यावर विठ्ठल दर्शनानंतर भक्तगण बाबांच्या दर्शनासाठी जात. त्यामध्ये विद्वान पंडित, राजे-राजवाडे यांचा समावेश असे. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी संन्यास स्वीकारला होता. पंढरपूर येथील कासार घाटाजवळ कासार धर्मशाळेशेजारी काशिनाथ पाध्ये यांचा मठ आहे. तेथे बाबा यांच्या आई-वडिल यांच्या समाध्या आहेत. सभागृहाच्या मध्यभागी बाबांची समाधी आहे. ही वास्तू अलीकडे वादामुळे बराच काळ दुर्लक्षिली होती. आता तेथे समर्थ संप्रदायाचा मठ आहे.

वा.ल. मंजूळ

पाध्ये, काशीनाथ अनंत