Skip to main content
x

पै, लक्ष्मण पंढरीनाथ

          गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत जन्मलेले, मुंबईत कलाशिक्षण घेतलेले, पॅरिसमधील कलात्मक वातावरणात दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगशील राहत पेंटिंग व प्रिंटमेकिंगच्या माध्यमात कलानिर्मिती आणि शिक्षणक्षेत्रासोबतच सातत्याने स्वत:ची कलानिर्मिती करणारे चतुरस्र व कल्पक कलावंत म्हणजे लक्ष्मण पै. गोव्याचे सौंदर्य, तेथील माणूस व निसर्गाचा विविधरंगी आविष्कार हा कायमच त्यांच्या कलानिर्मितीमागील प्रेरणास्रोत होता.
         लक्ष्मण पै यांचा जन्म गोव्यातील मडगाव येथे झाला. आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यातच झाले. त्यांनी १९४३ ते १९४७ या काळात मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६ मध्ये त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. ते गोवा मुक्ती संग्रमातही सहभागी झाले होते. त्यांचा विवाह १९६६ मध्ये पौर्णिमा यांचेबरोबर झाला.
       त्यांनी  आर्ट स्कूलमधले  अत्यंत प्रतिष्ठेचे ‘मेयो’ पदक मिळवले. त्यांनी १९४७ ते १९५१ या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षक म्हणून काम केले. या काळातील त्यांच्या कामावर अहिवासी व पळशीकर यांच्या भारतीयत्व जपणाऱ्या कलाशैली व वैशिष्ट्यांचा दूरगामी परिणाम झाला. परंतु पारंपरिक भारतीय लघुचित्रशैलीपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रयोगशील अशी चित्रशैली त्यांनी विकसित केली. त्यात रंग, रेषा व पोतांचे विविध प्रकारचे आविष्कार दिसतात.
      त्यांनी १९५० मध्ये स्वत:चे पहिले एकल प्रदर्शन बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सॅलोनमध्ये (सध्याचे आर्टिस्ट सेंटर) भरविले. यानंतर ते १९५१ मध्ये पॅरिस येथे गेले व सुमारे दहा वर्षे त्यांचे पॅरिसमध्ये वास्तव्य होते. तेथील वास्तव्यात त्यांनी विविध प्रकारे चित्रनिर्मिती केली. यात स्थिरचित्रे व निसर्गचित्रे अशा विषयांसोबतच भारतात विशेषत: गोव्यात अनुभवलेले लोकजीवन, समाजजीवन आणि भारतीय महाकाव्यांवरील चित्रमालिकाही होत्या. याशिवाय गांधी (१९५२), जयदेव (१९५४), बुद्ध (१९५९), कालिदास (१९६३), रामायण (१९५८ आणि १९७१) यांच्यावरील त्यांच्या चित्रमालिकांतून त्यांनी भारतीय विषय व भारतीय कलातत्त्वांचा प्रयोगशील आविष्कार सातत्याने केला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे असा आविष्कार करताना त्यांनी आपली मनोवृत्ती कायमच मुक्त ठेवली. साहजिकच फ्रान्समधील विविध प्रकारचे कलाविष्कार व त्यांतील प्रयोग यांचाही त्यांच्या कलानिर्मितीत विविध टप्प्यांवर प्रभाव आढळतो.
        तैलरंगांचा वापर करताना ते ब्रश, नाइफ अशा विविध माध्यमांचा वापर करीत. रंग लावणे, खरडणे, घासणे असे विविध प्रकार करीत. लयदार रेषा, तजेलदार रंग व त्यांचे काहीसे उत्स्फूर्त लेपन ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. काही वेळा ते त्यांच्या चित्रांत अक्षरांचाही वापर करीत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वत:च्या कलाकृतींची उभ्या हयातीत पाऊणशेहून अधिक स्वतंत्र कलाप्रदर्शने भरवली. यांतली नऊ पॅरिसमध्ये भरवली गेली. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने रू द सेन - पॅरिस (१९५२), गॅलरी ब्युऑक्स आटर्स - लंडन (१९५३), गॅलरी डब्ल्यू. गुर्लिट - म्युनिच (१९५३ व १९५७), गॅलरी डंकन - पॅरिस (१९५७), गॅलरी डॉफीन - पॅरिस (१९५९ व १९६०), सिल्पकॉर्न युनिव्हर्सिटी- बँकॉक (१९७०), नॅशनल आर्ट गॅलरी - क्वालालंपूर (१९७०), कालार्ट गॅलरी - सॅन फ्रान्सिस्को (१९९७) अशा अनेक ठिकाणी झाली. याशिवाय त्यांना पॅरिस बिनाले (१९६१), टोकियो बिनाले - टोकियो (१९६३), साओ पावलो बिनाले (१९६३) या प्रतिष्ठेच्या कलाप्रदर्शनांत आमंत्रित करण्यात आले होते.
       ते १९६१ मध्ये भारतात परतले व दिल्लीत स्थायिक झाले. यानंतर १९७७ ते १९८७ अशी दहा वर्षे ते गोव्याच्या ‘गोवा कॉलेज ऑफ आर्ट’ या नव्यानेच सुरू झालेल्या आर्ट स्कूलचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. संस्थेचे प्रशासकीय व शिक्षणाचे कार्य करीत असतानाच त्यांची स्वत:ची कलानिर्मितीही सातत्याने सुरू असे. ते निवृत्तीनंतर १९८७ मध्ये पुन्हा दिल्लीत परतले व तेथेच स्थायिक झाले.
      पॅरिसचे मॉडर्न आर्ट म्युझियम , वेस्ट बर्लिन म्युझियम , न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, नवी दिल्लीची नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, तसेच पंजाब, चेन्नई आणि नागपूरच्या म्युझियम्समध्येही त्यांच्या कलाकृती पाहायला मिळतात. पॅरिसमधल्या १९५१ ते १९६१ या काळातील त्यांच्या वास्तव्यात पॉल क्ली आणि मार्क शगाल यांच्या कलाकृतींमुळे ते प्रभावित झाले होते. त्यांना १९६१, १९६३ आणि १९७२ अशा एकूण तीन वर्षी ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांना १९८५ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने, तर १९९५ मध्ये ‘नेहरू’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. याखेरीज देशातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 
     पोर्सिलिनच्या भांड्यांवर अलंकरण करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले गेल्याने त्या शैलीने ते काही काळ प्रभावित झाले होते. त्यांच्या चित्रातल्या रेषेला एक लय आहे, तसेच काव्यात्मकतेचा स्पर्शही आहे. शिवाय त्यांची रेषा विलक्षण बोलकीही आहे. त्यांच्या चित्रांमध्ये निसर्गाच्या वृक्षाकारांचा आणि स्त्रीच्या आकारांचा बेमालूम मिलाफ झालेला दिसतो. त्यांनी सतारीच्या बोलांवर सादर झालेल्या रागदारीवर आधारित कलाकृतीही चितारल्या. आधुनिकता आणि परंपरा यांचे बेमालूम मिश्रण त्यांच्या चित्रांत पाहायला मिळते.
     लक्ष्मण पै यांना संगीतात रस होता. विशेष असे की, मनाने कलावंत असूनही विद्यार्थिदशेतच त्यांनी सत्याग्रहात व गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला होता. एवढेच नाही, तर तुरुंगवासही भोगला होता. कलाकाराला असलेले सामाजिकतेचे भान त्यात दिसून येते.

- श्रीराम खाडिलकर

पै, लक्ष्मण पंढरीनाथ