Skip to main content
x

पारनेरकर, रामचंद्र प्रल्हाद

पारनेरकर महाराज

     रामचंद्र प्रल्हादपंत पारनेरकर या साक्षात्कारी महापुरुषाचा जन्म मातु:श्री यमुनाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे आडनाव ‘गुरू’ असे होते. यांचे घराणे मूळचे पारनेरचे! रामचंद्राचे नाव शाळेत घालताना गुरू आडनावाऐवजी ‘पारनेरकर’ असे लावले गेले आणि तेच रूढ झाले.

     रामचंद्र महाराजांना इंदुरी पद्धतीने ‘रामूभय्या’ म्हणत. त्यांचे बहुतेक जीवन इंदूर येथेच गेले. एक दिवस रामूभय्या नेहमीप्रमाणे एकटेच फिरायला गेले. सायंकाळचे नीरव व निर्जन असे शांत वातावरण होते. त्या वेळी त्यांना सुस्पष्ट अनाहत ध्वनी ऐकू आला : ‘ॐ गं गणपतये नम:॥’ हा अनाहत जप पुन:पुन: ऐकू येत होता. या ध्वनीने त्यांना आपली उपास्य देवता आणि देवता मंत्र कळला.

     रामूभय्याने शालेय जीवनातच अनेक विषयांचा व्यासंग केला. शेकडो ग्रंथ वाचले. त्यांची धारणाशक्तीही जबर होती. प्राचीन आणि अर्वाचीन शास्त्रांचा त्याने व्यासंग केला.

     विज्ञान,अर्थशास्त्र इत्यादी विषयही समजावून घेतले. त्यांच्या एका वर्गमित्राची सराफी पेढी होती. मित्राचे वडील त्यांच्या मुलाला रत्नपरीक्षा शिकवीत! ते ऐकून-ऐकून रामूभय्या रत्नपारखी झाला. त्यातही तो कुशल झाला. पुढे-पुढे तर सराफ बाजारात त्याच्या मताला किंमत आली. अशा आधुनिक विद्याशाखांचा त्याने उत्कृष्ट परिचय करून घेतला होता.

     श्री गणेशाच्या उपासनेबरोबर त्यांची योगसाधनाही चालू होती. याच सुमारास, १९३८ साली त्यांनी अमळनेरच्या वासुदेवराव धर्माधिकारी यांची कन्या मनकर्णिका हिच्याशी विवाह केला. त्यांची योगसाधनेतही उत्कृष्ट प्रगती झाली. इतकी की, त्यांना ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र दिसू लागला. म्हणजे ‘पश्यन्ति’ वाणीवर जप होऊ लागला. ‘ऋषिर्दर्शनात्’ असे सूत्र आहे. ज्याला (मंत्र) दर्शन होते, तो ऋषी! म्हणजे पारनेरकर ऋषी झाले.

     यानंतर रामचंद्र पारनेरकर यांना तेजस्वी, पण शीतल अशा प्रकाशाचे अनुभव येऊ लागले. विशेष असे की या प्रकाशाला स्पर्श, सुगंध आणि स्वादही होता. त्यांची सहज समाधी लागू लागली. काही काळानंतर रामचंद्र पारनेरकर यांना श्री गणेशाचे सगुण, साकार दर्शनही झाले. प्रकाश दर्शन हा निर्गुण साक्षात्कार होता. म्हणजेच सगुण आणि निर्गुण असे दोन्ही साक्षात्कार झाले. एवढेच नव्हे तर अनेक देव-देवतांची आणि संत-महात्म्यांची दर्शने झाली.

     पारनेरकर महाराज म्हणत, जीवन हे कोडे नाही. ती कला आहे. ते म्हणत, ‘‘विश्वातीत ते शिवतत्त्व, विश्वात भरून राहिलेले ते ईश्वररूप विष्णुतत्त्व आणि विविध जडचेतनात्मक रूपे हे ब्रह्मतत्त्व. या तीनही तत्त्वांत स्वरूप-संबंध आहे. ही तीन भिन्न तत्त्वे नाहीत!’’ या ‘पूर्णवादा’च्या चिंतनात ‘मायावादा’ला स्थान नाही. मायावाद, जीवन आणि कर्मे ही अज्ञानजन्य व म्हणूनच त्याज्य ठरवितो. डॉ. पारनेरकरांचे तत्त्वज्ञान वेद आणि विज्ञान या दोहोंना स्पर्श करते. ते जीवनाच्या अंगोपांगांना स्पर्श करते. त्यांचा बौद्घिक, विज्ञानसिद्ध, अर्थशास्त्रीय, सुखाचा संसार करीत आध्यात्मिक उन्नती साधणारा असा दृष्टिकोन अनेकांना आकर्षित करणारा ठरला. त्यांचे ‘परिचय’, ‘परिसरात’, ‘संघर्ष’ आणि ‘अभिनव अभंग’ असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

     त्यांच्या शिष्यवर्गामध्ये किंवा चाहत्यांमध्ये ग.त्र्यं माडखोलकर, महामहोपाध्याय पांडुरंग गोस्वामी, बनारस हिंदू विद्यापीठाचे श्री. गोडे, लोकनायक अणे, श्री.के.क्षीरसागर, नरहर कुरुंदकर, रामभाऊ दाते, सेनापती बापट अशी नामांकित मंडळी होती.

     ५ डिसेंबर १९४८ रोजी त्यांना पीएच.डी. ही उपाधी प्राप्त झाली. अशा रीतीने भौतिक विद्वत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योगशास्त्रीय आध्यात्मिक अनुभूती यांचा स्पर्श झालेली ही विभूती होती. ‘‘पारनेरकर यांचा ‘पूर्णवाद’ हा मराठीत भारतीय तत्त्वज्ञानाचा उत्कृष्ट असा शास्त्रीय ग्रंथ झालेला आहे. प्रत्येक प्रकरणातून आलेल्या शास्त्रीय विषयाचे विवेचन यथार्थ असून, ग्रंथकाराने मांडलेला पूर्णवाद हा तत्त्वज्ञानात अगदी नवा असा शास्त्रीय वाद असून तो श्रुतिप्रमाण आहे, असे माझे या ग्रंथासंबंधी मत झाले आहे.’’ (न्यायरत्न नारायणशास्त्री वाडीकर ; २ नोव्हेंबर १९४७)

     ‘विद्वद्रत्न रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर’, इंदूर :

     ‘‘शिव, विष्णू आणि विश्व या तत्त्वांचा पूर्णपुरुषाशी स्वरूपसंबंध आपण प्रतिपादिला आणि ज्ञान-कर्म-उपासना या साधनत्रयींपैकी कोणतेही एक साधन करून भागणारे नाही; साधनत्रयींवर सारखाच भर द्यावयास हवा हे या सिद्धान्ताने पटवून दिले. याबद्दल व्यास- आश्रमातील आबालवृद्ध ऋणी आहेत.’’ (शंकरराव व्यास, व्यास आश्रम, इंदूर ; १८ नोव्हेंबर १९४७)

 — डॉ. वि.य. कुलकर्णी

पारनेरकर, रामचंद्र प्रल्हाद