Skip to main content
x

पाटील, चंद्रकांत नागेश

     चंद्रकांत नागेश पाटील यांचा जन्म आंबाजोगाई येथे झाला. शिक्षण औरंगाबाद येथे झाले. मराठवाडा विद्यापीठातून १९६५मध्ये वनस्पतिशास्त्रात एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात व विद्यापीठात विज्ञान विषय शिकविणार्‍या आणि वनस्पतिशास्त्र व जीवशास्त्र या विषयांवर इंग्रजी व मराठी भाषांतून पुस्तके लिहिणार्‍या पाटील यांचा प्रथमपासून ओढा होता तो कवितेकडे.

     १९६० नंतरच्या पिढीच्या महत्त्वाच्या कवींमध्ये आज पाटील यांचा समावेश केला जातो. बदलत्या वाङ्मयविश्वाची दखल घेऊन त्याचा मागोवा घेणारा व अनुवाद मार्गानेही मराठी वाङ्मयाची समृद्धी वाढविणारा हातभार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

     ‘पुन्हा कविता’ (१९६५) या १९६०नंतरच्या कवितेचे प्रातिनिधिक दर्शन घडविण्याचे व महत्त्वपूर्ण संकलनाचे संपादन व त्यांची विश्लेषक अभ्यासपूर्ण प्रस्तावना यांतून साठनंतरच्या कवितेविषयीचा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो. कवितांचे संपादन करताना त्यांनी ना.धों.महानोर यांचे साहाय्य घेतले. याच प्रकारचे संपादन त्यांनी ‘पुन्हा एकदा कविता’ (१९८२) या संग्रहाच्या रूपाने प्रकाशित केले. ‘निस्संदर्भ’ (१९७३), ‘इत्थंभूत’ (१९९२), ‘बायका आणि इतर कविता’ (१९९३) या संग्रहांतील कवितांमुळे त्यांचे नाव रसिकांपुढे व समीक्षकांपुढे ठळकपणे आले.

     पाटील यांच्या कवितेत परंपरावादी काव्यात दिसणारा हळवेपणा नाही. सामाजिक जाणिवेत व राजकीय वास्तवतेत ते नेमकेपणाने टीकाटिप्पणी शब्दांकित करतात. मानवी अस्तित्वाचा, सर्जनाचा त्यांचा शोध अथकपणे चालू असताना दिसतो. ‘बायका आणि इतर कविता’ या संग्रहात स्त्री-पुरुषांतील नातेसंबंधांचा त्यांनी धांडोळा घेतला आहे. स्त्रीमुक्ती कालखंडातल्या एकूणच कवितांमध्ये हा संग्रह त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

     एक चिकित्सक अनुवादक म्हणून पाटील यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी मराठी कवितेच्या हिंदी अनुवादाचे आणि हिंदीतल्या महत्त्वाच्या कवितांचे व नाटकांचे मराठीत अनुवाद करण्याचे काम केले आहे.

     ‘रसगंधर्व’ (नाटक १९७९), ‘भूखंड तापू लागलाय’ (कविता १९८३), ‘सूरज के वंशधर’ (मराठी दलित कवितेच्या हिंदी अनुवादाचे संपादन १९८२), ‘मगध आणि नंतरच्या कविता’ (१९९५), ‘तमस’ (कादंबरी १९८९), ‘समकालीन हिंदी कविता’ (१९७१), ‘तरी एकाकीच’ (कविता १९९३), तीन पंजाबी नाटके (१९९७), ‘तिची स्वप्ने’ (संपादन व अनुवाद १९९७), असे अत्यंत महत्त्वपूर्ण अनुवाद व संपादने त्यांनी केली आहेत.

    अनुवाद हे नवसर्जन कसे होऊ शकते, याचा वस्तुपाठ त्यांच्या कृतीतून दिसतो. हिंदी भाषेवर असलेले त्यांचे विलक्षण प्रभुत्व त्यांच्या अनुवादातून प्रत्ययास येते. भालचंद्र नेमाडे लिखित ‘तुकाराम’चा त्यांनी केलेला अनुवाद त्यादृष्टीने पाहण्यासारखा आहे.

     ‘आणि म्हणूनच’ (१९८८), ‘विषयांतर’ हे समीक्षात्मक लेखन तसेच ‘चौकटीबाहेरचे चेहरे’ (१९९०) हा व्यक्तिचित्रांचा संग्रह त्यांच्या बहुआयामी लेखनाचा प्रत्यय देतो.

- संपादित

पाटील, चंद्रकांत नागेश