Skip to main content
x

पाटील, मोतीलाल फकिरा

      मोतीलाल फकिरा पाटील यांचा जन्म तापी नदीच्या काठावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथे झाला. त्यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण प्रकाशा, शहादा येथे झाले. त्यांनी पदवी शिक्षण धुळे येथील कृषी महाविद्यालयात व पुढील शिक्षण पुणे येथे घेतले. ते १९७०च्या दशकात एम.एस्सी. (कृषी) झाले. त्यानंतर पाटील यांनी शेतीकडे लक्ष देण्याचे ठरवले.

      पाटील यांनी १९७१मध्ये तापी नदीवर ऑइल इंजिन बसवून सिमेंटच्या पाइपने पाणी उचलून शेती करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी एकरी १०२ टन उसाचे उत्पादन  घेतले. आपल्यासारखाच फायदा इतरांना व्हावा म्हणून त्यांनी अनेकांना बँकेतून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शंभर लिफ्टने बागायती शेती करण्यास सुरुवात केली. कोणाच्याही शेतातून कोणीही पाइपलाइन घेऊन जावी व कुणी भरपाई मागू नये ही संकल्पना त्यांनी त्या काळात राबवली. यामुळे सर्वच शेतकरी ४ ते ५ वर्षांत कर्जमुक्त झाले.

      पाटील यांनी तापीकाठच्या पडीक जमिनीचा उपयोग करता येईल म्हणून ती जमीन विकत घेतली. त्या वेळी अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु पडीक जमिनीचा विकास करता येईल असा त्यांना पूर्ण विश्‍वास होता. त्यांनी या पडीक जमिनीत कृषी पर्यटनाची अत्यंत चांगली संकल्पना रुजवली. त्यांनी बांबू, साग, नारळ, औषधी वनस्पती, आंबे, रामफळ यांची लागवड  केली. समतलचर पद्धत वापरून एकाच ठिकाणी दोन झाडे जगू शकतात हे त्यांनी सिद्ध केले. या सर्व परिसरात ३० ते ३५ हजार झाडे आहेत. या ठिकाणी त्यांनी मृदा, जल, हवा यांचा समन्वय साधला आहे. पाटील यांच्या या कार्यामुळे त्यांना २००२मध्ये वनश्री पुरस्कार मिळाला आहे.

      तापी काठावर जगवलेल्या झाडांनी २००६मध्ये आलेला महापूर रोखला. इतरांच्या शेतातून वाहून आलेला गाळ याच झाडांनी अडवला आणि तेथील शेती आपसूकच सुपीक झाली. शेतीबरोबरच सहकार, राजकारण, समाजकारणाचे पैलू त्यांच्या अंगी आहेत. ‘खेड्याचा विकास हाच देशाचा विकास’ हे मूलभूत सूत्र घेऊन ते आपली वाटचाल करत आहेत.

- दिनकर मोरे

पाटील, मोतीलाल फकिरा