Skip to main content
x

पाटील, रामचंद्र गोविंद

            रामचंद्र गोविंद पाटील यांचे कार्यकर्तृत्व आणि भारतीय कुक्कुटपालन व्यवसाय दोन्हीही १९७० ते १९९० या काळात हातात हात घालून प्रगती करत राहिले.  कुक्कुटपालन व्यवसायाचे रूपांतर कुक्कुटपालन उद्योगात करण्याचे जनकत्व वेंकटेश्‍वर ग्रूप ऑफ हॅचरिज या संस्थेकडे जात असले, तरी या संस्थेच्या पाठीशी समर्पित पशुवैद्यांची जी फळी सत्तरीच्या दशकात उभी राहिली, त्यामध्ये रामचंद्र गोविंद पाटील हे प्रथम क्रमांकावर होते.

            रामचंद्र पाटील यांचे पशुवैद्यकीय पदवी (१९५९) व पदव्युत्तर (१९६४) शिक्षण मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय येथे झाले. कुक्कुटपालन व्यवसायाला अत्यंत घातक मानल्या गेलेल्या सूक्ष्म जिवाणूवर त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत विशेष अभ्यास केला. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या पशु-संवर्धन विभागाने कुक्कुटपालन क्षेत्रात प्रथम संशोधन अधिकारी आणि नंतर १९५९मध्ये साहाय्यक रोगअन्वेषण अधिकारी (कुक्कुट) या पदावर त्यांची नेमणूक केली.  पाटील यांनी शासकीय कुक्कुटपालन केंद्रे आणि शासकीय अनुदानप्राप्त खासगी कुक्कुटपालन केंद्रे येथे सालमोनेल्ला या रोगाचे निदान आणि उच्चाटन ही कामे पार पाडली. भारतीय वातावरणाला सर्वस्वी नवीन असलेल्या उच्च निर्मितीक्षम परकीय कोंबड्यांच्या जाती भारतात रुजवून अंडी व मांस उत्पादनात क्रांती घडवून आणली, त्या जाती रोगमुक्त होऊन येथे स्थिर व्हाव्यात यासाठी डॉ. पाटील यांनी केलेले प्रयत्न भारतीय कुक्कुटपालन व्यवसायाच्या इतिहासात नाेंंदले गेले आहेत.  कोंबडीपालन पद्धती, त्यांचे आहारपोषण, रोगप्रतिबंध, विक्री व्यवस्थापन या विषयीच्या कोणत्याही शास्त्रीय माहितीच्या आधाराशिवाय चालणारा आणि तरीही खेडोपाडी आपले अस्तित्व टिकवून ठेवणारा हा व्यवसाय योग्य आणि शास्त्रीय पद्धतीवर हाताळल्यास ग्रामीण अर्थकारणात प्रचंड क्रांती घडवून आणू शकतो याची जाणीव तत्कालीन शासकीय पशुवैज्ञानिकांना झाली आणि कुक्कुटपालन प्रशिक्षणाबरोबरच परदेशी जातीच्या उच्च उत्पादक कोंबड्या (व्हाइट लेग हॉर्न आणि रोड आयलंड रेडस्) भारतात आणून त्यांची अंडी व एक दिवसाची पिल्ले शेतकर्‍यांना पुढील पैदाशीसाठी देण्यास सुरुवात झाली. तसेच अर्बर एकर या अमेरिकन कंपनीला भारतात पुण्यातील तळेगावात कुक्कुट पैदाशीची परवानगी देण्यात आली. या कंपनीतर्फे १९६४मध्ये मांसल आणि अधिक अंडी देणार्‍या कोंबड्यांच्या जाती खासगी व्यावसायिकांना पुरवण्यास सुरुवात झाली.

            डॉ. बी.व्ही. राव याच काळात अर्बर एकर फार्मवर ८ वर्षे प्रमुख व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. याच कालावधीत डॉ. पाटील अर्बर एकरमध्ये शासकीय अधिकारी म्हणून सालमोनेल्ला परीक्षणासाठी जात असत. डॉ. पाटील यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाल्यामुळे  डॉ. राव यांनी वेंकटेश्‍वरा हॅचरिजच्या पहिल्या प्रक्षेत्र व्यवस्थापकपदी त्यांना नेमले. शासकीय सेवा सोडून डॉ. पाटील पहिल्या दिवसापासून वेंकटेश्‍वरा हॅचरिजमध्ये कार्यरत झाले. डॉ. राव यांचा विश्‍वास डॉ. पाटील यांनी सार्थ ठरवला व पुढील २५ वर्षे कुक्कुटपालनाच्या विविध विभागांत आपल्या कामाचा ठसा उमटवला. यशस्वी वाटचालीसाठी वेंकटेश्‍वरा हॅचरिजने सुरुवातीपासूनच जागतिक मानदंड अंगीकारले होते. यात उच्च प्रतीच्या नर-माद्यांचे (पेरेंट स्टॉक) संगोपन, पैदाशीत आणि उत्पादनात अग्रेसर ठरू शकणार्‍या पिलांची पैदास, शरीरवाढीच्या अनुषंगाने आहारपोषण, जैवरक्षकप्रणाली आणि लसीकरणाच्या माध्यमांतून रोगसंरक्षण, रोगनिदान व रोग प्रतिबंधात्मक सोयीसुविधा, इतर व्यावसायिकांसाठी उत्पादनपश्‍चात विक्री व्यवस्था या सार्‍यांचा समावेश होता. व्यावसायिक संलग्नतेमुळे अर्बर एकर कंपनीकडून या सर्व गोष्टींची वारंवार छाननी केली जात असे. उत्पादन क्षमतेच्या ९० ते ९२% उत्पादन देणार्‍या कोंबड्या वेंकटेश्‍वरा हॅचरिजने व्यावसायिकांना पुरवल्या. कमीत कमी मृत्युदर आणि खाद्यान्नावर किमान खर्च या वैशिष्ट्यांमुळे खासगी व्यावसायिकांनाही सरासरी २८० ते ३०० अंडी प्रतिवर्ष मिळू लागली. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी वेंकटेश्‍वरा हॅचरिजने अंड्यांची २५% बाजारपेठ काबीज केली.

            वेंकटेश्‍वरा हॅचरिजच्या स्थापनेआधी सालामोनेल्ला, सीआरडी आणि मरेक या रोगांनी खासगी व्यावसायिकांना जेरीस आणले होते. डॉ. पाटील यांनी या रोगापासून मुक्त आणि पहिल्याच दिवशी लसीकरण केलेली पिले वितरीत करण्याचा निर्णय घेतला आणि खासगी कुक्कुटपालकांना प्रचंड दिलासा मिळाला. अनेक प्रकारच्या लसी निर्माण करण्यासाठी डॉ. पाटील यांनी पुढाकार घेऊन वेंकटेश्‍वरा लसनिर्मिती संस्थेची स्थापना केली. यासाठी त्यांनी परकीय संस्थांशी संबंध प्रस्थापित केले, नामांकित भारतीय संस्थांतून शास्त्रज्ञांची आयात केली, त्यांना प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवले आणि अस्तित्वात असलेल्या संभाव्य कुक्कुटरोगासाठी लसनिर्मिती सुरू केली. अधिक परिणामकारक आणि दीर्घ काळ टिकणारी प्रतिबंधकशक्ती देणार्‍या तैलयुक्त लसी भारतात प्रथम निर्माण करण्याचे श्रेयही डॉ. पाटील यांना जाते. लसनिर्मितीसाठी जंतुविरहित अंडी आवश्यक असतात. पूर्वी ती आयात होत असत. हे क्षेत्रही डॉ. पाटील यांनी काबीज केले. परदेशी संस्थांच्या साहाय्याने अशी अंडी त्यांच्या प्रयोगशाळेत तयार होऊ लागली. जटिल प्रक्रियेद्वारे जंतुविरहित अंडी निर्माण करणारी वेंकटेश्‍वरा हॅचरिज ही एकमेव भारतीय संस्था असून या निर्मितीचे श्रेयही डॉ. पाटील यांनाच जाते.

            व्यावसायिकांना प्रशिक्षण, रोगनिदान आणि कुक्कुट उत्पादनांची विक्री हे व्यावसायिकांपुढील प्रश्‍न होते. ते जाणून डॉ. पाटील यांनी कुक्कुटपालन प्रशिक्षण संस्था, कुक्कुटरोग अन्वेषण प्रयोगशाळा, कुक्कुटमांस प्रक्रिया केंद्र आणि राष्ट्रीय अंडी विक्री समन्वय समिती यांची स्थापना वेंकटेश्‍वरा हॅचरिजमार्फत केली. या सर्व संस्था भावी कुक्कुटपालकांना अखिल भारतीय स्तरावर प्रशिक्षण देतात, रोग अन्वेषण प्रयोगशाळा निःशुल्क सेवा देतात, तर मांसप्रक्रिया केंद्र आणि अंडी समन्वय समिती विक्रीसंबंधी कार्य करतात. या क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय काम लक्षात घेऊन ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, पुणे या संस्थेने त्यांना डॉ. बी.व्ही. राव जीवनगौरव पुरस्कार दिला.

- डॉ. रामनाथ सडेकर

पाटील, रामचंद्र गोविंद