पाटील, संभू सदाशिव
संभू सदाशिव पाटील यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जनाबाई होते. त्यांचे शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले. शाळेत आपल्या व्रात्यपणामुळे झालेली मारहाण असह्य होऊन त्यांनी शिक्षणाचा नादच सोडून दिला. पाटील यांना ट्रॅक्टरचे विशेष आकर्षण होते. मोठे झाल्यावर त्यांनी वडिलांकडे ट्रॅक्टर घेण्याचा हट्ट धरला. वडिलांचा नकार मिळाल्याने पुढे कुटुंबातून ते विभक्त झाले आणि नंतर त्यांनी एक जुना ट्रॅक्टर घेेतला. एकदा ट्रॅक्टर बंद पडला व दुरुस्तीचा मोठा प्रसंग येऊन ठेपला. जवळच असलेल्या शिंदे गावातील एक युवक सैन्यदलात नोकरीला होता. त्याला दुरुस्तीचे काम यायचे. पाटील यांना ट्रॅक्टरचे सुटे भाग जवळपास कुठे मिळत नव्हते. त्यामुळे व्होल्टास कंपनीत दोघे गेले. तिथे सर्वच इंग्रजी बोलत असत, पण पाटील यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत अत्यंत परिश्रमाने ट्रॅक्टरविषयक इंग्रजी भाषेतील प्रतिशब्द आणि ज्ञान संपादन केले आणि त्याच्या बळावर ते तांत्रिक शिक्षण नसतानाही अमेरिकन ट्रॅक्टर दुरुस्त करायला लागले, त्यात ते निष्णातही झाले. त्यांनी जम्मू-काश्मीर पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून जुने ट्रॅक्टर आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
पाटील यांना गावातील सामाजिक, राजकीय जडणघडणीचा चांगलाच अभ्यास झाला होता. त्यांनी १९६२मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. जुनाट व बुरसट विचारांच्या नागरिकांनी मिळून त्यांचा पराभव घडवून आणला. पराभवाने खचायचे नसते या विचाराने वाटचाल सुरूच ठेवली आणि १९६७मध्ये पुन्हा निवडून येऊन त्यांनी सरपंचपद मिळवले. राजकारणातून समाजकार्य आणि समाजकार्यातून लोकसेवा करत पाटील यांची वाटचाल सुरू होती. १९९५मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. हरिजन बहुजन वस्तीतून हितचिंतकांनी पाटील यांचा अर्ज दाखल केला आणि ते तिथून निवडून आले. तसेच सरपंचपदही चालून आले. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांनी ते अधिकच प्रगल्भ झाले.
शाळेतून होणारी गळती थांबवण्याच्या उद्देशाने पाटील यांनी २५ मुले दत्तक घेतली होती, पण समाजकंटकांनी त्यांची ही योजना बंद पाडली. त्याप्रमाणेच पाटील यांनी सुरू केलेले पाळणाघरही समाजकंटकांनी बंद पाडले. शेतकऱ्यांच्या हिताचाही त्यांनी नेहमीच विचार केला. ते पर्यावरणप्रेमी म्हणून . कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क आल्याने त्यांनी स्वस्त व माफक दरात स्वतः विकसित केलेले सायकल कोळपे बनवून दिले, तर बोअरवेलमधील मीटर काढण्याचे यंत्रही त्यांनी विकसित केले आहे.
पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते जिल्हा उपाध्यक्षही होते. धुळे येथील सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठतर्फे त्यांना १९९९मध्ये धम्मभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते दिला, तर २००९मध्ये अंनिससाथी हा पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते दिला गेला.