Skip to main content
x

पाटील, शंकर बाबाजी

      शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण-कोडोली येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावी व गडहिंग्लज येथे झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये बी.ए. (ऑनर्स) संपादन करून, पुढे त्यांनी बी.टी.ची पदवी मिळवली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ते मुख्याध्यापक होते. समकालीन प्रसिद्ध साहित्यिकांशी त्यांचा सहवास होता. त्यांच्याशी दर्जेदार पुस्तकांविषयी चर्चा होई. इंग्रजी साहित्याचाही अभ्यास पाटील यांनी केला. ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘साहित्य’ यांसारख्या नियतकालिकांमुळे नववाङ्मयाच्या त्या सुरुवातीच्या काळात त्यांची वाङ्मयीन अभिरुची प्रगल्भ झाली.

ग.वि.अकोलकर, ग.प्र.प्रधान यांच्या सहकार्याने त्यांनी इयत्ता ८वी ते १०वी ह्या इयत्तांसाठी ‘साहित्य सरिता’ या वाचनमालेचे संपादन केले (१९६८). १९७२पासून मराठी आणि अन्य सहा भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

शंकर पाटील यांच्या कथांचे भारतीय व पाश्‍चात्त्य भाषांत अनुवाद झाले. ते आपल्या कथांतून व्यक्तिमनाचा पदर न पदर सहजपणे उलगडतात. त्यांची भाषा ही त्या कथांतून होणार्‍या अनुभवांची भाषा आहे. कथा-लेखनात ते सतत प्रयोग करीत राहिले, त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य नेहमीच टिकून राहिले. १९४७ पासून कथा-लेखनाला आरंभ करून जवळजवळ १७ वर्षांनी ते कादंबरीलेखनाकडे वळले. ‘टारफुला’चा अपवाद वगळता पाटील यांनी निष्ठेने कथा-लेखनच केले.

१९६४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘टारफुला’ कादंबरीचे लेखन तत्पूर्वी २-३ वर्ष ते करत असले पाहिजेत. ‘धग’ या कादंबरीचे परीक्षण करताना त्यांनी स्पष्ट व निर्भीडपणे म्हटले आहे, ‘१९६० सालातील मराठी कादंबरी लाज आणणारी आहे’. या विधानातील असमाधान ‘टारफुलां’च्या मुळाशी असले पाहिजे. ‘बनगरवाडी, फकीरा, धग’ ह्यांसारख्या मोजक्या रचना सोडल्या, तर इतर कादंबर्‍या नाविन्यामध्ये किंवा स्वप्नरंजनामध्ये हरवून गेल्या होत्या. नागनाथ कोतापल्ले यांच्या मते ‘टारफुलामध्ये कुठलीही एखादी व्यक्ती केंद्रस्थानी नाही. किंवा तिला नायक नाही... ते (लेखक) जाणीवपूर्वक व्यक्ती बदलत जातात, वातावरण बदलत जातात. परंतु गाव तेच आहे आणि संघर्षही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तोच आहे... केंद्रस्थानी कोण आहे, हे समजून न घेतल्यामुळे समकालीन समीक्षक घोटाळले. पाटलांना एका संपूर्ण खेड्याचे चित्रण करावयाचे आहे. संपूर्ण खेडे हे केंद्रस्थानी आहे. येथे सत्तासंघर्ष आहे.’ पाटलांचा प्रश्न आहे की सत्ता टिकवण्यासाठी अन्याय करणे हेच सत्तेचे रूप आहे का? सत्ता ही कल्याणकारी राहूच शकणार नाही का? तिने ‘टारफुला’च झाले पाहिजे का?

पाटलांच्या निवेदन शैलीतील ग्रामीण बोली सशक्त आशय पेलून धरते. या शैलीतून ते पात्रांच्या अंतर्विश्वाचा वेध घेतात. गांभीर्य व विनोद हे दोन्ही त्यांच्या निवेदनशैलीचे विशेष आहेत.

‘कथा अकलेच्या कांद्याची’ (१९८५), ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ (१९८५) आणि ‘गल्ली ते दिल्ली’ ही तीन वगनाट्ये, ‘पाऊलवाटा’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह तर ‘सत्याग्रही’ हे त्यांचे नाटक आहे. त्यांच्या ‘वळीव’ (१९५८) या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. नंतर ‘भेटीगाठी’ (१९६०), ‘बावरी शेंग’ (१९६३), ‘खुळ्याची चावडी’ (१९६४), ‘पाहुणी’ (१९६७) हे कथासंग्रह आहेत तर ‘फक्कड गोष्टी’ (१९७३), ‘खेळखंडोबा’ (१९७४), ‘ताजमहालामध्ये सरपंच’ (१९७७) हे विनोदी लेखन आहे. पाटील यांच्या लेखनात स्त्री-चित्रणाला प्राधान्य लाभलेले आहे. लोकप्रिय व गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांचे संवाद-लेखन व पटकथा-लेखन पाटील यांनी केले आहे. व्यंकटेश माडगूळकर व द.मा.मिरासदार यांच्यासह गावोगावी जाऊन त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले आणि ग्रामीण कथा सर्वत्र पोचवली.

पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ ह्या संस्थांमध्ये मोलाचे योगदान दिले. नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

- वि. ग. जोशी

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].