Skip to main content
x

पाटील, शरद बाबूराव

       शरद बाबूराव पाटील यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मावळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले व पुढे त्यांनी उदगीर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी शेतीद्वारे समाजविकास साधण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहू शेती करताकरताच पाटील यांनी लाल कंधारी जातींच्या गोधनाचे संवर्धन करण्याचे ठरवले. देशी गोवंश संवर्धनाच्या माध्यमातून त्यांना गोमय व गोमूत्रापासून विविध उपपदार्थ निर्मितीची कल्पना सुचली व लोकोपयोगी उपक्रमांना मूर्तस्वरूप देण्यासाठी त्यांनी कृष्णा गोरक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी दत्तात्रेय प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून इतर पशुपालकांना दुग्ध व्यवसायास प्रवृत्त केले. त्यांनी स्वत:बरोबर इतरांच्याही समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना सरपंचपद मिळाले. या पदाची धुरा सांभाळताना त्यांनी वीज, रस्ते, शिक्षणाच्या सोई, जल-संवर्धन, पाणलोटविकास, वृक्षारोपण व रक्तदान इ. समाजोपयोगी कार्य करून आपल्या कामाची कक्षा वाढवली. त्याच दरम्यान विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद व क्रीडा मंडळाचे अध्यक्षपद, तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी चोखपणे सांभाळल्या.

शरद पाटील यांच्याकडे लालकंधारी जातीचा गोवंश उत्तमरीत्या पाळला जातो व लालकंधारी जातीचे पैदासकार म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. गोवंश संख्यात्मक दृष्टीने छोटा असला तरी गुणात्मकदृष्ट्या सरस आहे. त्यांच्याकडे ५ लालकंधारी गाई, ७ कालवडी व ३ गोर्‍हे एवढाच छोटा कळप असून त्यांची पैदास व संगोपन ते शास्त्रीय पद्धतीने करतात. मूळ गाईंसाठी ते नैसर्गिक पैदाशीचे तंत्र वापरतात, तर कालवडीसाठी ते कृत्रिम रेतन या तंत्राचा अवलंब करतात. संशोधनात ते निवड पद्धतीचा कटाक्षाने वापर करतात. त्यातूनच त्यांनी गोदुग्धाचे मान वाढवले आहे. त्यांच्याकडील लालकंधारी गाय १० ते १२ लीटर दूध देते व हे दुधाचे प्रमाण शेतकऱ्यांकडील संकरित गाईच्या सरासरीपेक्षाही जास्त आढळून येते. नैसर्गिक पैदाशीकरता वापरण्यात येणारे वळू ते दर तीन वर्षांनी कटाक्षाने बदलतात. त्यामुळे आंतरपैदास टाळली जाते व आंतरपैदासीमुळे पुढच्या पिढीत निर्माण होणारे दोष टळतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट लालकंधारी जनावरे आहेत, याची पावती त्यांच्या जनावरांना विविध प्रदर्शनांतून मिळालेल्या पारितोषिकांतूनच मिळते. त्यांना आतापर्यंत अखिल भारतीय प्रदर्शनात चार, महाराष्ट्र राज्य पातळीवर चार, तर स्थानिक पातळीवर २० पारितोषिके व प्रशस्तीपत्रे मिळाली. गोमूत्रावर ते आवश्यक प्रक्रिया करतात व शेतातील पिकांसाठी कीटकनाशक म्हणून त्यांचा प्रभावीपणे वापर करतात. तसेच गोमय व गोमूत्रापासून ते साबण, धूप इ. उपपदार्थ तयार करतात. हे उपपदार्थ तयार करण्यासाठी ते इच्छुकांना ८ दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना याबाबतीत साक्षरच नव्हे, तर प्रशिक्षित करतात. त्यांना २००४मध्ये वसंतराव नाईक पशुपालन व दुग्ध व्यवसाय पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना यशवंतराव चव्हाण शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कारसुद्धा  मिळाला. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र या संस्थेने त्यांना त्या संस्थेचा पहिला उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार देऊन गौरवले. त्यांना फेब्रुवारी २०११मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे  त्यांच्या उत्कृष्टरीत्या सांभाळलेल्या लालकंधारी जनावरांना विविध पुरस्कार, ढाली, चषके व पदके मिळाली आहेत.

- डॉ. नागोराव विश्‍वनाथ तांदळे

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].