Skip to main content
x

पाटील, विश्वास महिपती

     विश्वास महिपती पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ले ह्या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे आई-वडील नेर्ल्याला शेती करीत. वडील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते व क्रांतिसिंह नाना पाटलांशी त्यांचा चांगला परिचय होता. नेर्ले येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यावर विश्वास पाटलांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सांगली जिल्ह्यातील कोकरूड या गावी झाले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. खांडेकर, अत्रे, कुसुमाग्रज हे त्यांचे आवडते लेखक होते. इतिहासात त्यांना विशेष रुची होती. ग्रामसंस्कृतीचे सूक्ष्म निरीक्षण, तमाशासारख्या लोककलेचा बालपणी झालेला परिचय आणि संवेदनशीलता व निर्मितीक्षमता ह्यांची देणगी ह्यांमुळे दहावीत असतानाच विश्वास पाटलांनी कथा-लेखनाला सुरुवात केली. त्याच वेळी ‘तरुण भारत’च्या वासंतिक अंकातील त्यांच्या ‘कायदा’ ह्या कथेला पारितोषिक मिळाले. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून बारावीपासून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पाटील १९८२ साली शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. १९८६ साली एल्एल.बी. झाले. १९८३पासून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. पुढे आय.ए.एस श्रेणीत त्यांना बढती मिळाली. महाराष्ट्र शासनाने नंतर मुंबईच्या गोरेगाव येथील चित्रनगरीचे साहाय्यक उपमहाव्यवस्थापक म्हणून पाटलांची नेमणूक केली. रायगड जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना विश्वास पाटलांनी मलनिस्सारण मोहीम यशस्वीपणे राबवली.  मुंबईचे (उपनगर) जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले .

शिक्षण घेत असताना पाटलांनी कथा-लेखन केले. ‘मराठा’, ‘बिल्वदल’ आदी नियतकालिकांत त्यांनी कथा लिहिल्या. १९८०साली त्यांचा ‘कलाल चौक’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘क्रांतिसूर्य’ (१९८४), ‘अंबी’ (२००४) ह्या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्यावर पाटलांना कादंबरीकार म्हणून आपल्या लेखनाची नस सापडली. ऐतिहासिक, सामाजिक, ग्रामीण, राजकीय अशा विविध विषयांवर त्यांनी परिश्रमपूर्वक कसदार आणि वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीलेखन केले. त्यांच्या एकूण साहित्यकृती आहेत- ‘पानिपत’ (१९८८), ‘पांगिरा’ (१९९०), ‘झाडाझडती’ (१९९१), ‘महानायक’ (१९९८), ‘चंद्रमुखी’ (२००४), ‘संभाजी’ (२००५) या आहेत. याशिवाय ‘पानिपत’ कादंबरीच्या कथावस्तूवर आधारित ‘रणांगण’ (२०००) हे नाटक लिहिले. ‘नॉट गॉन विथ द विंड’ (२००८) हे मराठी-इंग्रजी-हिंदी चित्रपटांवरील आस्वादक समीक्षा-लेखांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

पेशव्यांचे राजकारण आणि पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या पानिपत कादंबरीने पाटलांना महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. १७६१साली मराठे आणि अफगाण यांच्यामध्ये झालेल्या युद्धात एक लाख मराठे धारातीर्थी पडले. भाऊसाहेब, विश्वासराव, नजिबखान रोहिला, अहमदशहा अब्दाली, दत्ताजी शिंदे आणि मल्हारराव होळकर ह्या मराठे सरदारांची ठसठशीत व्यक्तिचित्रे, नाट्यपूर्ण प्रसंगांची निर्मिती आणि प्रवाही भाषा ही ‘पानिपत’ची ठळक लेखनवैशिष्ट्ये म्हणता येतील .

‘पांगिरा’ आणि ‘झाडाझडती’ ह्या दोन कादंबर्‍यांचे विषय महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी निगडित आहेत. प्रेमचंदांच्या ‘गोदान’ कादंबरीशी तुलना करण्यात आलेल्या ‘पांगिरा’मध्ये पाटलांनी बदलत्या राजकीय परिस्थितीचे, औद्योगिकीकरणाच्या प्रभावाचे, पंचायत राज्यातील ग्रामव्यवस्थेचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे. महाराष्ट्रातील सहकारी सोसायट्यांचा खेड्यांतील उद्योग-व्यवसायांवर, कृषिसंस्कृतीवर कसा विपरीत परिणाम होतो, याचे दर्शन घडणार्‍या ‘पांगिरा’ची तुलना फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मैला आँचल’ ह्या गाजलेल्या कादंबरीशीही केली जाते. ‘झाडाझडती’ ही धरणग्रस्तांच्या विपन्नावस्थेचे, त्यांच्या हलाखीचे नि वेदनेचे चित्रण करणारी कादंबरी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे अधिकारी म्हणून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम करीत असता पाटलांना ‘झाडाझडती’चा विषय सापडला. ‘धरण म्हणजे मरण’ ह्या शब्दांत धरणग्रस्तांच्या हालअपेष्टांचे वर्णन करणारे पाटील धरणग्रस्तांमध्ये राहिले. एका संवेदनशील प्रशासकीय अधिकार्‍याने शब्दांकित केलेल्या ‘झाडाझडती’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. समग्र भारतीय कादंबर्‍यांत ‘झाडाझडती’ ही श्रेष्ठ दर्जाची कादंबरी म्हणून उल्लेखिली जाते. 

‘महानायक’ ही १९९८ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नाट्यमय आणि संघर्षपूर्ण जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे परस्पर संबंध, त्या वेळेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य लढा, आझाद हिंद सेनेतील नेताजींच्या सहकार्‍यांनी केलेला त्याग, तत्कालीन वास्तवाला असलेले विविध आयाम, सुभाषबाबूंची मानसिक, भावनिक आणि वैचारिक आंदोलने, त्यांचा दारुण अन्त आदींचे तपशीलवार कथन ही ‘महानायक’ कादंबरीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. १४ भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या १००० पृष्ठांच्या या कादंबरीच्या निर्मितीसाठी पाटलांनी प्रचंड मेहनत घेतली. शेकडो हस्तलिखितांचे व मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी भाषांतील ग्रंथांचे वाचन; नेताजींच्या जपानमधील सहकार्‍यांच्या मुलाखती; ब्रह्मदेश, जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, थायलंड येथील प्रवास ह्या सामग्रीच्या आधारे सिद्ध झालेल्या ‘महानायक’चा गौरव बंगालीमधील श्रेष्ठ कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांनी मुक्तकंठाने केला .

शिवछत्रपतींचे पुत्र संभाजीराजे यांचे जीवन वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्रातील अनेक इतिहास संशोधकांनी, बखरकारांनी आणि लेखक-नाटककारांनी संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपापल्यापरीने शोध घेण्याचा प्रयत्न केला . त्यांच्यातील बर्‍याच जणांनी संभाजीराजांची व्यक्तिरेखा कल्पित, मलिन आणि विपर्यस्त बनवली असल्यामुळे अस्सल ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाला वस्तुनिष्ठपणे न्याय देण्याचा प्रयत्न पाटलांनी 'संभाजी' या कादंबरीतून केला . संभाजी राजांचा व्यसनीपणा, रंगेलपणा, त्यांच्या जीवनातील कलुषाचे स्थान, संभाजीराजांचा शोकान्त आणि त्यांची वीरवृत्ती यांसंबंधी तटस्थ भूमिकेतून अभ्यास करून पाटलांनी संभाजी-चरित्र वाचकांसमोर ठेवले . त्यासाठी प्रमुख व दुय्यम व्यक्तिरेखांचे सूक्ष्म चित्रण रोमहर्षक, नाट्यपूर्ण प्रसंगांची व परिणामकारक वातावरणाची निर्मिती पाटलांनी केली . संभाजीराजांच्या आयुष्यावर आजपर्यंत झालेल्या लेखनापेक्षा संभाजीराजांवरील ह्या कादंबरीचा वेगळेपणा मनावर निश्चितपणे उमटतो.

तमाशा आणि लोककला हे पाटलांच्या कुतूहलाचे आणि आवडीचे विषय . महाराष्ट्राचे प्रचलित राजकारण त्यांनी जवळून पाहिले आहे. त्यातून ‘चंद्रमुखी’ ही तमाशातील कलावतीच्या जीवनावरील कादंबरी आकारास आली. चंद्रमुखी, बॅरिस्टर दौलतराव देशमाने, सासवडकर, दमयंती, सुचेता पंडित (पंतप्रधान), बत्ताशा, लालन, बांगडी शेठ, नाखवा शेठ ह्या विविधधर्मी पात्रांची निर्मिती तमाशा व लावण्यांचे सादरीकरण नाट्यपूर्ण क्वचित चमत्कृतिपूर्ण घटनांची निर्मिती आणि स्वत: लेखकाने लिहिलेल्या लावण्यांचा समावेश यांमुळे ‘चंद्रमुखी’ ही लोककलाकारांच्या जीवनाची परवड आणि दैन्य चित्रित करणारी  एक वाचनीय कादंबरी ठरली .

पानिपत युद्धावरील प्रसंग ८०० पृष्ठांत शब्दांकित करणार्‍या पाटलांनी ‘रणांगण’ या दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून सादर करून आपले नाट्य-लेखन कौशल्य सिद्ध केले . ‘रणांगण’चा विषय ऐतिहासिक असला तरी पाटलांनी नाटकाच्या आधारे विद्यमान राजकीय वास्तवावर सूचक भाष्य केले .

चित्रपट आणि इंग्रजी कादंबर्‍यांचा मागोवा घेणार्‍या लेखांचे ‘नॉट गॉन विथ द विंड’ पाटील यांचे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाचा इंग्रजी, हिंदी आणि मराठी चित्रपटविषयक व्यासंग दिसून येते. ‘क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेन्ट’, ‘गॉन विथ द विंड’, ‘अ‍ॅना कॅरोलिना’, ‘ऑथेल्लो’, ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द गुड अर्थ’, ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’, ‘मुघल-ए-आझम’, ‘सामना’ आदी गाजलेल्या चित्रपटांचा आस्वादक परिचय घडवून देणार्‍या पाटलांनी मूळ साहित्यकृती कादंबरी वा नाटक यांचे चित्रपटात ‘माध्यमांतर’ कसे होते; याचे रसपूर्ण विवेचन ह्या पुस्तकातील लेखांत केले .

ऐतिहासिक, राजकीय व ग्रामीण कोणताही विषय असो पाटील आपल्या व्युत्पन्नतेची आणि बहुश्रुतपणाची जोड त्याला देतात. निरनिराळ्या विषयांची आव्हाने स्वीकारणार्‍या पाटलांना निर्मितीबरोबरच कल्पकतेची साथ लाभली आहे. प्रशासन सेवेतील जबाबदारीचे काम करताना गेल्या पंचवीस वर्षांत कादंबरीसारख्या कथनात्मक वाङ्मय प्रकारात मौलिक भर घालणारे विश्वास पाटील मराठीतील आघाडीचे वाचकप्रिय लेखक आहेत. त्यांनी भारतीय पातळीवरही स्वत:चे स्थान निर्माण केले .

पाटील यांच्या  ‘झाडाझडती’ या कादंबरीसाठी  मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना  १९९२ साली लाभला .

- वि. शं. चौघुले/ आर्या जोशी 

पाटील, विश्वास महिपती